तच्च नित्यं प्रमुंजीत स्वास्थ्यं येनानुवर्तते।
अजातानां – विकाराणां अनुत्पत्तिकरं च यत्।।
आहाराचारचेष्टासु सुखार्थी प्रेत्य चेह च।
परं प्रयत्नं आतिष्ठेत् बुद्धिमान् हितसेवने।।
या दोन सूत्रांत चरकाचार्यानी जणू व्याधिप्रतिबंधाचे मर्म सांगितले आहे. सुखकर आयुष्याची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकाने आहार, विहार, आचाराचे आयुर्वेदाने सांगितलेले नियम नियमितपणे व अतिशय काटेकोरपणे पाळावे, जेणेकरून स्वास्थ्यरक्षण होऊन व्याधी निर्माणच होणार नाहीत. आयुर्वेद हा शरीर व मनाचे स्वास्थ्य राखून आयुष्य कसं जगायचं हे सांगणारा वेद असल्याने या वैद्यकशास्त्रात व्याधींच्या चिकित्सेपेक्षाही आजार होऊच नयेत म्हणून दैनंदिन जीवनात काय काय करावे यावर अधिक भर दिला आहे. या सर्व नियमांना एकत्रितरीत्या स्वस्थवृत्त अशी संज्ञा आहे. आजकाल अधिक प्रमाणात आढळणारे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृद्रोग, कॅन्सर यांसारखे व्याधी, की जे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार लाइफ स्टाइल डिसॉर्डर्स या गटात मोडतात. त्यांच्यात स्वस्थवृत्ताचे पालन हीच प्रतिबंधात्मक चिकित्सा आहे, कारण या आजारांनी एकदा का शरीरात शिरकाव केला, की त्यांना आटोक्यात ठेवणे कठीण आहे. त्यामुळे ढ१ी५ील्ल३्रल्ल ्र२ ुी३३ी१ ३ँंल्ल ू४१ी या सूत्रानुसार स्वस्थवृत्ताचे पालन हेच हितावह आहे.
अहितकर आहार व विहार तसेच तंबाखू-दारू यांसारखी व्यसने, अ‍ॅस्बेस्टॉस- कापसाचे तंतू- विशिष्ट रसायने यांचा शरीराशी दीर्घ संपर्क अशी कारणे दीर्घकाळ घडल्यास वात-पित्त-कफ हे तीन दोष दूषित होतात, रस-रक्तादी ७ धातूंची शक्ती कमी होते, ते सारहीन होते व पर्यायाने आपापले प्राकृत कर्म करण्यास असमर्थ ठरतात. जाठराग्नी व धातूंचे अग्नी दूषित होतात. शरीरात मलभागाची निर्मिती व संचिती अधिक प्रमाणात होते व कालांतराने अवयवांमध्ये विकृती निर्माण होऊन त्या त्या अवयवांचे कॅन्सर निर्माण होतात. ही कॅन्सरनिर्मितीची शृंखला अल्पावधीत उद्भवत नाही, तर महिनोन्महिने, वर्षांनुवर्षे ही व्याधीनिर्मितीची प्रक्रिया शरीरात चालूच असते आणि म्हणूनच नित्यनेमाने स्वस्थवृत्ताचे पालन करणे आवश्यक आहे. स्वस्थवृत्तात प्रत्येक दिवशी पाळायचे नियम म्हणजे दिनचर्या, ऋतुबदलाचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून आचरायची ऋतुचर्या, भूक-तहान-मल-मूत्र अशा नसíगक संवेदनांचे योग्य वेळी पालन करणे , आहाराबाबतचे नियम पाळणे म्हणजे आहारविधान, झोप-चालणे-फिरणे-व्यायाम अशा विहाराचे विधिवत पालन, मनाच्या शुचितेसाठी सद्वृत्ताचे, यज्ञ-यागादी अनुष्ठानांचे पालन करणे, ऋतुसापेक्ष पंचकर्म करून शरीरशुद्धी करणे व नियमित प्रकृती-वयानुसार रसायन औषधांचे सेवन करणे या सर्व उपक्रमांचा समावेश होतो.
दिनचर्या व रात्रिचय्रेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शरीरस्वास्थ्यासाठी आचरायचे उपक्रम विशिष्ट क्रमाने सांगितले आहेत. पहाटे सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजे ब्राह्म मुहूर्त. साधारण पहाटे ४-४.३० दरम्यानचा हा काळ शारीरिकदृष्टय़ा वातदोषाचा काळ असल्याने मल-मूत्र या नसíगक संवेदनांची जाणीव व त्यांचे उत्सर्जन या काळात होते. रात्री लवकर झोपल्यास या वेळी झोप पूर्ण झाल्याने उठल्यावर ताजेतवाने वाटते, मन प्रसन्न असते, त्यामुळे हा काळ अध्ययन-अध्यापनास योग्य आहे, म्हणूनच या काळास ब्राह्म मुहूर्त म्हणतात. यानंतर हात-पाय-तोंड स्वच्छ पाण्याने धुऊन कडू-तुरट चवीच्या बकुळ, खदिर (कात), कडुिनब अशा औषधांच्या वस्त्रगाळ चूर्णाने किंवा या वनस्पतींच्या कोवळ्या देठाने दात घासावेत. याला दंतधावन म्हणतात. सकाळचा काळ हा कफदोषाचा काळ असल्याने तसेच रात्री निद्रावस्थेत तोंडात चिकट कफ साठत असल्याने दंतधावनासाठी कफाचा नाश करणाऱ्या कडू-तुरट चवीच्या औषधांनी दंतधावन करणे हितकर असते. यानंतर जिभेचे निल्रेखन करावे, जेणेकरून जिभेवर साठलेल्या कफाचे, मलाचे निर्हरण होते. मुखप्रक्षालन, दंतधावन व जिव्हानिल्रेखन या तीनही उपक्रमांमुळे तोंडाला चव येते व अन्नसेवनाची इच्छा होऊ लागते. तोंडाचे आरोग्य राखणाऱ्या या उपक्रमांनंतरचा दिनचय्रेतील उपक्रम म्हणजे डोळ्यांचे स्वास्थ्य सांभाळणारा अंजन उपक्रम. आपल्याकडे लहान मुलांच्या डोळ्यांत काजळ घालण्याची व स्त्रियांनी सौंदर्यप्रसाधन म्हणून काजळ घालण्याची पूर्वापार प्रथा आहे; परंतु डोळ्यांत काजळ घालणे हे सर्वच वयोगटांतील स्त्री-पुरुषांत डोळ्याचे विकार टाळण्यासाठी हितकर आहे. विशेषत: आजच्या कॉम्प्युटर युगात या उपक्रमाचे नित्य आचरण करणे आवश्यकच आहे. गाईचे तूप, एरंड तेल किंवा खोबरेल तेलात वात भिजवून त्याच्या ज्योतीपासून जमणारी काजळी स्वच्छ काचेच्या भांडय़ात साठवून काजळ तयार केले जाते. डोळा हा तेजमहाभूतप्रधान अवयव असून त्याला कफदोषामुळे विविध व्याधी होण्याची संभावना असते. नित्य अंजनामुळे डोळ्यांतील दूषित कफाचे निस्सरण होते व दृष्टी तीक्ष्ण होते. यानंतरचा दिनचय्रेतील उपक्रम म्हणजे नस्य. मागील लेखात आपण या उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली. मानेच्या वरच्या भागातील अवयवांचे, नाकाचे, कानाचे, घशाचे व मस्तिष्काचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तेलाचे किंवा तुपाचे प्रतिमर्श नस्य म्हणजे २ ते ३ थेंब नस्य उपयुक्त ठरते. कोमट पाणी, दूध, तिळतेल किंवा त्रिफळा काढय़ासारख्या औषधी काढय़ांच्या गुळण्या करणे म्हणजे गंडूष या उपक्रमाने तोंडातील कफाचा चिकटा नष्ट होतो, तोंडाला रुची येते, तोंडातील व्रण नष्ट होतात व पर्यायाने तोंडाचे आरोग्य चांगले राहून मुखाच्या कॅन्सरसारखे व्याधी होण्यास प्रतिबंध होतो. नस्य आणि गंडूष या उपक्रमांनी दूषित कफाचे नाक व मुखावाटे निस्सरण झाले असले, तरी उर्वरित कफाचा पूर्णत: नाश करण्यासाठी अगरु, देवदार, मोहरी, गुग्गुळ अशा कफनाशक औषधांची धुरी देणे यास धूम्रपान म्हणतात. धूम्रपान नाक किंवा तोंड यापकी कोठूनही केले तरी बाहेर सोडताना मुखावाटेच सोडावे. व्यायाम सकाळीच रिकाम्यापोटी करावा. शरीरास श्रम देणारे कर्म म्हणजे व्यायाम अशी आयुर्वेदाने व्यायामाची व्याख्या केली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या बलाच्या निम्माच व्यायाम करावा. सूर्यनमस्कार, मोकळ्या हवेत चालणे, पोहणे, सायकल चालविणे, मदानी खेळ खेळणे अशा प्रकारचे देशी खेळ व व्यायाम शरीराच्या सर्व स्नायूंना योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात श्रम करवितात व त्यामुळे शरीर पीळदार होते, श्वासोच्छ्वासावर नियंत्रण मिळते, भूक-पचन सुधारते व रात्री गाढ झोप लागते.
यानंतर आचरायचे अभ्यंग, उद्वर्तन व स्नान हे उपक्रम केवळ त्वचेचेच नाही, तर संपूर्ण शरीराचे आरोग्य सुदृढ ठेवणारे उपक्रम आहेत. तिळतेलाने किंवा औषधी सिद्ध तेलाने संपूर्ण शरीरास रोज अभ्यंग केल्यास त्वचा मुलायम होते, रोमरंध्रांतून तेलाचे शोषण झाल्याने त्वचेखालील अतिरिक्त मेदाचा नाश होतो, रक्तवाहिन्यांना मृदुता आल्याने रस-रक्त संवाहन सुधारते, वातवाही नाडय़ांच्या स्थानी असलेल्या वातदोषाचे शमन होते व या सगळ्याचा परिपाक म्हणून शरीराचे श्रम-थकवा नष्ट होऊन भूक-पचन-झोप व सगळ्याच नसíगक वेगांच्या संवेदना चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. अभ्यंगानंतर कोमट पाण्याने स्नान करताना त्रिफळा, मंजिष्ठा, अनंतमूळ, गवलाकाचरी अशा औषधांच्या वस्त्रगाळ चूर्णाचे उटणे साबणाऐवजी संपूर्ण शरीरास लावावे. ही औषधे द्रव्ये अतिशय कोरडी म्हणजे रूक्ष असल्याने अभ्यंगामुळे शरीरावर असलेला अतिरिक्त स्नेह निघून जातो व त्याचबरोबर दूषित कफदोष-मेदधातू यांचा क्षय होऊन शरीरास व सर्व अवयवांस स्थर्य म्हणजे प्राकृत आकार प्राप्त होतो आणि त्वचेची कांती सुधारते. यानंतर कोमट पाण्याने स्नान केल्यास शरीर व मन प्रसन्न होते. शरीराची ऊर्जा व बल वाढते, भूक लागते. यानंतर थंडीत उबदार लोकरी कपडे, उन्हाळ्यात हलके-सुती कपडे असे ऋतुसापेक्ष कपडे परिधान करणेही त्वचेच्या आरोग्यास हितकर आहे. यानंतर आहार सेवनाचे सर्व नियम पाळून व प्रकृती- वय- ऋतू यांचा विचार करून भोजन करणे व त्यानंतर अन्नाचे योग्य प्रकारे पचन व्हावे यासाठी त्रयोदशगुणी विडा की ज्यात कापूर, जायफळ, कंकोळ, लवंग, कात, सुपारी आहेत, त्याचे सेवन करावे.  आजच्या गतिमान युगात या सगळ्या गोष्टी जमणार कशा? असा सगळ्यांपुढील एक प्रश्न असतो; परंतु करमणुकीच्या साधनांच्या आहारी न जाता वेळेचे योग्य नियोजन केल्यास यातील बहुतांशी उपक्रम आपल्या जीवनशैलीचा एक भाग होऊ शकतात, कारण अशा प्रकारे दिनचय्रेचे पालन केल्यास सर्वच व्याधींचा प्रतिबंध होतोच; परंतु विशेषत: दंतधावन-गंडूष-नस्य-अंजन यांमुळे मुखाच्या, मस्तिष्काच्या- डोळ्याच्या कॅन्सरला अभ्यंग-उद्वर्तनाच्या नित्य आचरणाने त्वचेच्या कॅन्सरला प्रतिबंध होतो. यापुढील लेखात आपण कॅन्सर प्रतिबंधक अशा स्वस्थवृत्ताच्या उर्वरित उपक्रमांची माहिती घेऊ.