’ सात वर्षांच्या सौरभला अचानक उलटय़ा होऊ लागल्या व त्याच दरम्यान त्याच्या आईला त्याच्या दोन्ही डोळ्यांत तिरळेपणा जाणवू लागला. पंधरा दिवसांच्या आतच एम्.आर्.आय्. व शस्त्रकर्म झाले असता चौथ्या ग्रेडचा मेडय़ुलोब्लास्टोमा असल्याचे निश्चित झाले. रेडिओथेरपी व केमोथेरपीबरोबरच सौरभच्या पालकांनी त्याला आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. त्यामुळे त्याला या चिकित्सापद्धतीचे दुष्परिणाम जाणवले नाहीत तसेच त्याची प्रतिकारशक्ती सुधारल्याने गेली दोन वर्षे कॅन्सरचा पुनरुद्भवही झालेला नाही.
’ वयाच्या दुसऱ्या वर्षी ए.एम्.एल्. या प्रकारच्या ल्युकेमियाचे निदान झालेल्या सुमितलाही गेली चार वर्षे केमोथेरपीच्या जोडीला नियमित आयुर्वेदिक चिकित्सा चालू असल्याचे फलित म्हणजे त्याच्या शारीरिक, मानसिक व शैक्षणिक प्रगतीत झालेली लक्षणीय सुधारणा!
‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीनुसार बालविश्व हे कुटुंबात, समाजात आनंद निर्माण करणारे जग आहे. अशा या हसत्याखेळत्या विश्वात जेव्हा कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा प्रवेश होतो तेव्हा सारे कुटुंबच हादरून जाते. बालदमा, कुपोषण, कृमी, मुडदूस अशा अनेक बालरोगांपेक्षा बालकांतील कॅन्सर हा त्या बालकाची संपूर्ण आयुष्यभर पूर्ण काळजी घ्यायला भाग पाडणारा आजार आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपेक्षा बालकांतील कॅन्सरमध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढ व्यक्तींमधील कॅन्सरपेक्षा बालकांतील कॅन्सर झपाटय़ाने वाढतात, शरीरात जलद फैलावतात, मात्र केमोथेरपीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. कारणांचा विचार करता केवळ १० ते १५ टक्के बालकांतील कॅन्सरमध्ये आनुवंशिकता आढळते. तसेच कार्सनिोजेन म्हणजे कॅन्सरला हेतुभूत, वातावरणातील घटकांचा कॅन्सर निर्मितीतील सहभाग बालकांमध्ये नगण्य असतो.
बालकांमध्ये ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर, िलफोमा, नव्‍‌र्हस सिस्टीम म्हणजे मज्जावह संस्थेचे कॅन्सर, न्युरोब्लास्टोमा, विल्मस् टय़ूमर, रेटायनोब्लास्टोमा, ऑस्टियोसार्कोमा, इविगन्स टय़ूमर, ऱ्हॅब्डोमायोसार्कोमा, हिपॅटोब्लास्टोमा, जर्म सेल टय़ूमर, थायरॉईड ग्रंथीचा कॅन्सर व त्वचेचा कॅन्सर हे कॅन्सर अधिक प्रमाणात आढळतात. यांपकी ल्युकेमिया व िलफोमा या कॅन्सर प्रकारांचे वर्णन आपण मागील लेखांत पाहिले. न्युरोब्लास्टोमा हा सिंपॅथॅटिक नव्‍‌र्हस सिस्टीममध्ये होणारा कॅन्सर पाच वर्षांखालील बालकांत अधिक आढळतो. हा कॅन्सर शरीराच्या ज्या स्थानी निर्माण होतो त्यानुसार लक्षणे निर्माण होतात. सामान्यत: यात डोळ्याच्या, हाताच्या व संपूर्ण शरीराच्या अनियंत्रित हालचाली, मज्जारज्जूवर दाब आल्याने निर्माण झालेला पक्षाघात, पोट फुगणे, जुलाब होणे, ताप ही लक्षणे निर्माण होतात. शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपी या चिकित्सापद्धतींच्या साहाय्याने या कॅन्सरची चिकित्सा केली जाते.
विल्मस् टय़ुमर हा वृक्कामध्ये निर्माण होणारा कॅन्सर असून यात पोटात गाठ जाणवणे, पोट दुखणे, पोट जड होणे, मूत्राबरोबर रक्त पडणे, ताप व उच्चरक्तदाब ही लक्षणे दिसतात. शस्त्रकर्म व केमोथेरपी यांच्या साहाय्याने याची चिकित्सा केली जाते. रेटायनोब्लास्टोमा हा डोळ्यांमध्ये होणारा टय़ूमर असून ४० टक्के बालकांत हा आनुवंशिक म्हणजे विशिष्ट जनुकांतील बदल म्हणजे म्युटेशन झाल्यामुळे निर्माण होतो. यात डोळे लाल होणे, दृष्टी मंद होणे, डोळ्यावर पांढरा पापुद्रा येणे ही लक्षणे दिसत असून उग्र स्वरूप धारण केल्यास हा टय़ूमर अस्थी व अस्थिमज्जेत पसरतो. ऑस्टियोसार्कोमा हा अस्थींमध्ये निर्माण होणारा टय़ूमर असून सामान्यत: १० वर्षांपुढील बालकांत अधिक आढळतो. अस्थींवर सूज किंवा अर्बुद स्पर्शगम्य होणे, अस्थी दुखणे, कोणत्याही आघाताशिवाय अस्थिभंग होणे ही या प्रकारच्या कॅन्सरची लक्षणे असून सामान्यत: हा कॅन्सर बळावल्यास फुप्फुसात पसरण्याची संभावना असते. शस्त्रकर्म व केमोथेरपीच्या साहाय्याने हा कॅन्सर आटोक्यात ठेवता येतो. ऑस्टियोसार्कोमा झालेल्या बऱ्याच रुग्णांत कॅन्सर व्यक्त होण्यापूर्वी त्या स्थानी मार लागल्याचा इतिहास आढळतो. इविगन्स टय़ूमर हा ही ऑस्टियोसार्कोमाप्रमाणे अस्थींचा कॅन्सर असला तरी त्याच्या मूलपेशी ऑस्टिओसार्कोमापेक्षा भिन्न असतात. सामान्यत: हा टय़ूमर हात व पाय येथे व्यक्त होत असला तरी छाती, पृष्ठवंश, जबडा व कवटी येथेही काही वेळा व्यक्त होतो. सामान्यत: ज्या स्थानी हा टय़ूमर व्यक्त होतो तेथे वेदना होणे, सूज येणे व तेथील अवयवांच्या क्रियेत अडथळा निर्माण होणे ही लक्षणे या इविगन्स सार्कोमात निर्माण  होतात. केमोथेरपीने यात चांगल्या प्रकारे उपशय मिळतो.
ऱ्हॅब्डोमायोसार्कोमा या प्रकारच्या कॅन्सरमध्ये सामान्यत: आनुवंशिकता नसते. टय़ूमर शरीराच्या कोणत्याही भागात निर्माण होतो व ज्या अवयवात किंवा स्थानी निर्माण होतो त्याप्रमाणे लक्षणे व्यक्त करतो. केमोथेरपी व शस्त्रकर्म यांच्या साहाय्याने यावर उपचार केले जातात.
हिपॅटोब्लास्टोमा हा यकृतात निर्माण होणारा टय़ूमर सामान्यत: पाच वर्षांखालील बालकांत, जन्मत: कमी वजनाच्या बालकांत व हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेल्या बालकांत होण्याची संभावना अधिक असते. यात पोटात उजव्या बाजूला गाठ जाणवते व कॅन्सर बळावल्यास भूक मंदावणे, उलटय़ा, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यातही शस्त्रकर्म व केमोथेरपी लाभदायी ठरते. जर्म सेल टय़ूमर हे प्रजनन पेशींपासून निर्माण होणारे टय़ूूमर असून ते माकडहाड, वृषण, स्त्रीबीजाण्ड या प्रजनन अवयवांच्या स्थानी व उदरपोकळी व उरपोकळी या अन्य स्थानीही निर्माण होतात व त्या त्या स्थानानुसार लक्षणे व्यक्त करतात.
आयुर्वेदाच्या आठ अंगांपकी बालरोग ही स्वतंत्र शाखा असून काश्यपसंहिता व अष्टांगहृदय या ग्रंथांत बालकांची नसíगक जडणघडण व बालकांना होणारे व्याधी यांचे सविस्तर वर्णन केले आहे. गíभणी अवस्थेत किंवा स्तनपान चालू असताना मातेने केलेला चुकीचा आहार-विहार, कफ व क्लेद निर्माण करणारा बालकाचा आहार, कृमी व बालकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या विपरीत दैवी शक्ती म्हणजेच बालग्रह ही आयुर्वेदाने सामान्यत: बालरोगांची कारणे सांगितली आहेत. आयुर्वेदीय संहिताकारांनी बालकांना सुकुमार म्हणजे अतिशय नाजूक प्रकृती असलेले म्हटले आहे. या सुकुमारत्वामुळे, शरीराचे सर्व धातू परिपूर्ण झालेले नसल्याने व व्याधिप्रतिकारशक्ती मुळातच दुर्बळ असल्याने बालरोगांची चिकित्सा, त्यातही कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीची बालकांमधील चिकित्सा हे वैद्यवर्गापुढील आव्हान आहे. त्यातच दात येण्याच्या वयात सुदृढ बालकांमध्येही सर्दी – खोकला – जुलाब अशी लक्षणे वारंवार दिसत असल्याने या काळात कॅन्सर झाल्यास बालकांची चिकित्सा अधिक काळजीपूर्वक करावी लागते. दूध व तूप हाच बालकांचा प्रमुख आहार असल्याने सामान्यत: बालकांत स्निग्धगुणाचे – कफदोषाचे आधिक्य असते असे सूत्र आहे. त्यामुळे बालरोगांची चिकित्सा करताना कफघ्न, कृमिघ्न, जाठराग्नीचे पालन करणारी, व्याधिप्रतिकारशक्ती वाढविणारी चिकित्सा लाभदायी ठरते. बालकांच्या कॅन्सरमध्ये रक्त व अस्थिधातूला बल देणारे प्रवाळ भस्म, यकृताचे कार्य व पचन सुधारण्यासाठी कुमारी आसव, विकृत कफ- क्लेद व कृमिनाशासाठी बालचातुर्भद्र, संजीवनी वटी व सितोपलादी चूर्ण, सर्व धातूंना बल देणारे सुवर्णभस्म व मौक्तिकभस्म उपयुक्त ठरते. बालकांना औषधे घेण्यास सुलभ ठरावी व औषधाचे कार्यकारित्व वाढावे म्हणून औषध मधातून देणे हितकर ठरते. तसेच औषधाची मात्राही बालकाचे वय, व्याधी, प्रकृती यांचा विचार करून निर्धारित करावी लागते. संपूर्ण शरीरास नियमित अभ्यंग करणे, औषधी चूर्णाचे उटणे लावणे, कॅन्सरच्या प्रकारानुसार वैद्यकीय देखरेखीखाली कृमिनाशक, बल वाढविणारे अथवा कडू रसाच्या औषधांनी सिद्ध केलेले दुधाचे बस्ती देणेही हितकर ठरते. दूध, भात, तूप, भाज्या, मूग, मसूर, फळे, खजूर, अंजीर, चारोळी, मनुका, जरदाळू, बदाम हा योग्य प्रमाणतील सुकामेवा असा सात्त्विक व शक्तिवर्धक आहार, नियमित मदानी खेळ, कला-शास्त्र-वेदपठण अशा मनास व बुद्धीस पोषक गोष्टींची कास धरणे या सर्व गोष्टींचा साकल्याने परिणाम बालकाचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यावर होतो. बालकांमधील कॅन्सरसारख्या असाध्य व्याधींच्या प्रतिबंधासाठी माता-पित्यांनी अपत्यास जन्म देण्याचा विचार केल्यापासूनच पंचकर्म, आयुर्वेदोक्त रसायन चिकित्सा व पथ्यकर आहार-विहार यांच्या माध्यमातून शरीरशुद्धी, योगासन-सदाचार-सद्विचार यांच्या आचरणाने मन:शुद्धी यांचे आचरण करणे निश्चितच फलदायी ठरते.