05 August 2020

News Flash

पौगंडावस्थेतील स्थूलता –

‘‘डॉक्टर पाहा ना, नीलेशचे वजन कितीही प्रयत्न केले तरी कमीच होत नाही. आम्हाला त्याच्या तब्येतीची फारच काळजी लागली आहे,’

| August 8, 2015 12:03 pm

‘‘डॉक्टर पाहा ना, नीलेशचे वजन कितीही प्रयत्न केले तरी कमीच होत नाही. आम्हाला त्याच्या तब्येतीची फारच काळजी लागली आहे,’’ सावंतकाकू सांगत होत्या. बारा वर्षांच्या नीलेशचे वजन कमी करण्याकरता सावंतकाकू आमच्या केंद्रात घेऊन आल्या तेव्हा त्याचा तो पुरीसारखा फुगलेला देह आणि पूर्णचंद्रासारखा (मून फेस)  चेहरा पाहूनच शंकेची पाल चुकचुकली. मित्रांची उंची वाढत होती पण नीलेशचे वजन आणि उंची वाढत नव्हती म्हणून सावंतकाकू गेले वर्षभर कुठल्यातरी वैदूने दिलेले भस्म त्याला देत होत्या. प्रथम नीलेशचे वजन वाढताना पाहून सावंतकाकू आनंदल्या. पण आता त्याचे वाढलेले वजन आटोक्यात येत नाही हे पाहून त्या चांगल्याच घाबरल्या. नीलेशच्या चाचण्या केल्या तेव्हा त्याची मूत्रिपडे पूर्णपणे निकामी झाल्याचे कळले. त्या भस्माची चाचणी केली असता त्यात स्टीरॉइड्स आढळली. आता या लहान मुलाकरता कायमस्वरूपी डायलिसिस किंवा मूत्रिपड प्रत्यारोपणाखेरीज उपायच राहिलेला नाही. मुलाच्या वाढीकरता असे चुकीचे उपाय केल्यामुळे त्याच्या आयुष्याचे किती नुकसान केले आहे हे सावंतकाकूंना कळेपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले होते.
जागतिक आरोग्य संघटनेने १० ते १९ वष्रे हा ‘पौगंडावस्थेचा’ काळ ठरवला आहे. आज या वयोगटामधील मुलांच्या स्थूलतेने उग्र रूप घेतले आहे. लहान वयात मुले स्थूल होतात तेव्हा त्यांच्या चरबीच्या पेशी अतिप्रमाणात तयार होतात आणि पुढील आयुष्यात त्यांची संख्या कधीच कमी होत नाही. त्यांचा आकार फक्त कमी-जास्त होत राहतो.  स्थूलतेमुळे येणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, वंध्यत्व, कर्करोग, संधिवात या आजारांची बीजे लहान वयातील स्थूलतेमुळे रुजतात आणि जन्मभर हे शत्रू आपली पाठ सोडत नाहीत.
आज जगभर ‘स्थूलता’ हा सर्वात वेगाने पसरणारा आजार ठरला आहे आणि त्याचे प्रमुख कारण आहे आपली बिघडलेली जीवनशैली. काळ जसा पुढे जातो तसे जीवनामध्ये काही बदल होणे अपरिहार्य आहे. पण आज फास्ट आणि जंकफूड, व्यायामाचा आळस आणि स्मार्ट फोन, संगणक, टीव्ही यांच्या अतिवापरामुळे मिळणारी अपुरी झोप यांचा शरीरावर अतिशय घातक परिणाम होत आहे.
शाळा आणि अनेक प्रकारचे शिकवणीवर्ग यांमुळे मुलांचा १० ते १२ तासांचा वेळ घराबाहेर जातो. त्या वेळी घरी बनवलेले अन्न न खाता वडापाव, सामोसा, चायनीज भेळ, बर्गर, पावभाजी असे चटकदार पदार्थ खाऊन मुले आपली भूक भागवतात. दोन जेवणांमध्ये शीतपेये, चॉकलेट, आइस्क्रीम, फळांचे रस, चिप्स हा त्यांचा नाश्ता होतो. या वाढीच्या वयामध्ये त्यांना ‘भस्म्या’ रोग लागलेला असतो आणि त्यांची भूक भागवण्याकरिता जंकफूड  किंवा  फास्टफूड न देता योग्य प्रमाणात उष्मांक असलेले, प्रथिनेयुक्त सकस अन्न देणे जरुरी आहे. यासाठी पालकांनीही  ‘रोल मॉडेल’ होऊन स्वत: जीवनशैलीत सुधारणा करणे आणि मुलांना मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.  या वयोगटातील मुलांना त्यांची उंची वाढवण्याकरता आणि शरीर पीळदार करण्याकरता किंवा त्यांची जाडी कमी करण्याकरता जाहिरातींना भुलून कोणत्याही घातक उपायांना बळी पडू नये.
लहान मुलांच्या आरोग्याच्या चाचण्या करण्याकरता कुणीही पालक आपणहून तयार नसतात.  पण  जर त्यांच्या रक्तातील काही घटकांची वर्षांतून एकदा चाचणी केली तर वेळीच त्यामध्ये सुधारणा करणे शक्य होते जे त्यांच्या आरोग्याच्या आणि वाढीच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरते.

जीवनशैली सुधारा
’सकाळी पाच अन्नघटकांनी युक्त असलेला नाश्ता घेणे अत्यंत जरूर आहे. पोळी, ब्राउन ब्रेड, ओट्स पुिडग या पदार्थाबरोबर उत्तम प्रकारची प्रथिने म्हणजे अंडी, दूध, मोड आलेल्या धान्यांची उसळ, इडली-सांबार आणि एखादे फळ मुलांना दिवसभराच्या चयापचयाच्या क्रियेकरता अन्नघटक पुरवते.
’दुपारच्या जेवणामध्ये कुठल्याही एका प्रकारच्या प्रथिनाचा वापर करणे म्हणजे वरण/ आमटी/ सांबार/ मोड आलेल्या धान्यांची उसळ/ चिकन/ मासे हे पोळी,  ब्राउन ब्रेड किंवा ब्राउन राइस सोबत खाणे.
’दिवसातून कुठलीही तीन फळे आणि तीन प्रकारच्या पालेभाज्या आणि भाज्यांचा वापर आहारात करणे.
’नाश्ता, सकाळचे जेवण आणि रात्रीचे जेवण या तीन मुख्य खाण्यांमध्ये दोन वेळा मधल्या वेळचे खाणे अतिशय जरुरी असते. त्या वेळी अक्रोड, बदाम, चणे, शेंगदाणे, काळ्या मनुका, खजूर, सुके अंजीर यांचा वापर करणे.
’दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी पिणे
’आठवडय़ातील सहा दिवस नेमाने योग्य आहार घेतल्यावर रविवारी एक दिवस सर्व बंधने शिथिल करून आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा आस्वाद घेऊन जरूर आनंद घेणे. म्हणजे  ‘संतुलित’ आहार कायमस्वरूपी राबवण्याच्या निश्चयाला बळकटी येते.
’दिवसातून एक तास कोणताही खेळ खेळणे किंवा चालण्याचा व्यायाम करणे. जर एखादा मुलगा क्रिकेट, बास्केट बॉल, टेनिस किंवा इतर काही खेळ खेळत असेल तर त्या प्रमाणात आहारातील उष्मांक आणि प्रथिने वाढवणे.
’रात्रीची नऊ तासांची शांत झोप या वयातील मुलांच्या शरीराच्या आणि बुद्धीच्या वाढीकरता अत्यंत आवश्यक असते. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मोहजालात वेळ न घालवता रात्री लवकर झोपून मेंदूला आणि शरीराला विश्रांती देणे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अन्नपदार्थाची
पाच गटांत विभागणी केली आहे.
’गहू, तांदूळ आदी तृणधान्य व त्यांची उत्पादने
’कडधान्य, डाळी तसेच चवळी, तूर अशा हिरव्या शेंगा, कवचयुक्त फळे
’दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे
’फळे आणि भाज्या
’वनस्पती तेल, तूप, लोणी.
(आपल्या न्याहरीमध्ये सर्व घटक अंतर्भूत हवेत. उदा. इडली-सांबार, एक कप कमी स्निग्धांश असलेले दूध आणि एक फळ. ही परिपूर्ण न्याहरी आहे.)

त्रिसूत्री महत्त्वाची
पौगंडावस्थेच्या वयातील मुलांच्या सर्वागीण वाढीसाठी कुठल्याही औषधाचा वापर न करता ‘संतुलित’ आहार, एक तासाचा व्यायाम किंवा खेळ, आणि नऊ तासांची रात्रीची शांत झोप या त्रिसूत्रीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जीवनशैलीत सुधारणा करून ही मुले आरोग्याची शिडी चढतील तरच प्रगतीचे शिखर गाठू शकतील.
डॉ. शैला निंबकर,आहारतज्ज्ञ – Shaila.nimbkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2015 12:03 pm

Web Title: cause of obesity
टॅग Health It
Next Stories
1 आहार : पावसाळय़ात उष्ण पदार्थ आवश्यक
2 विचारी मना! : अतिवात्सल्य की मुलांची काळजी?
3 रक्तातील साखर जिवावर बेतते?
Just Now!
X