ज्यांच्या घरात कुणाला तरी दमा आहे, त्या घरातील लहान मुलांना दमा होणारच किंवा दम्यावर दिल्या जाणाऱ्या ‘इनहेलर स्टेरॉइड’ औषधांचे बरेच दुष्परिणाम असल्यामुळे बालदम्यात ती टाळावीतच, असे बरेच गैरसमज लोकांमध्ये असतात. बालदम्याविषयी नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न..

बालदम्याचा आजार आनुवंशिकच असतो का?
बालदम्याचे एक कारण आनुवंशिकता असू शकते, पण दम्याची आनुवंशिकता असलेल्या प्रत्येक लहान मुलाला बालदमा होईलच असे नाही. घरात कुणालाही दमा नाही तरीही बाळाला दमा होऊ शकतो. बालदम्याचा त्रास सुरू होण्यासाठी कुठला तरी ‘ट्रिगर’ कारणीभूत ठरतो. धुळीची अ‍ॅलर्जी, प्रदूषण, हवामानातला बदल, विशिष्ट विषारी द्रव्यांशी किंवा रसायनांशी आलेला संपर्क, खूप गर्दीत जावे लागणे अशा कारणांच्या निमित्ताने हा त्रास सुरू होऊ शकतो.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Increase in prices of fruits and vegetables due to decrease in arrivals
खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

बालदमा ओळखावा कसा?
दम्याचे लक्षण दम लागणे, अशी खूणगाठच अनेकांनी बांधलेली असते. पण लहान मुलांच्या बाबतीत ती खरी नाही. लहान मुले भरपूर खेळतात. लहान वयातला धावपळ करण्याचा स्टॅमिना चांगला असल्यामुळे अनेकदा बालदमा चटकन लक्षात येत नाही. लहान मुलांमध्ये अनेकदा फक्त कोरडा खोकला हेच लक्षण दिसते आणि बालदम्याचे निदान होते. दोन-तीन उडय़ा मारल्यावरही खोकल्याला सुरुवात होते आणि तो खूप वेळ टिकतो. खोकला बंद होताना श्वासाचा शिट्टीसारखा आवाजदेखील येऊ शकतो. दम लागण्याचे लक्षण सहसा दम्याचा आजार थोडा वाढल्यानंतर सुरू होते.

वयोगट कोणता?
दोन किंवा अडीच वर्षांच्या बाळांनाही बालदम्याचा त्रास बघायला मिळतो. याहून कमी वयाच्या बाळांमधल्या दम्याचे निदान करणे अवघड असते. दोन वर्षांचे बाळ खेळते, भरपूर हालचाल करते त्यामुळे बालदमा असल्यास त्याची लक्षणे या धावपळीच्या निमित्ताने दिसून येऊ शकतात. सारखा कोरडा खोकला येण्याबरोबरच बाळाची म्हणावी तशी वाढ न होणे, उंची पुरेशी न वाढणे या गोष्टीही बालदम्यात दिसतात. बालदम्यांच्या रुग्णांना नेहमी सर्दी-खोकला होतो. त्यातही सर्दी पटकन बरी न होता ती घशात पोहोचते आणि चांगली आठ दिवस टिकू शकते. त्यामुळे छातीत घरघर होते. अशी सर्दी सारखी होत असेल तरीही एकदा बालदम्याची शक्यता पडताळून पाहायला हवी. वयाच्या १२ ते १४ वर्षांपर्यंत बालदमा राहू शकतो.

बालदमा बरा होतो का?
ज्या लहान मुलांना बालदम्याची आनुवंशिकता आहे शिवाय त्यांना त्याची लक्षणे अगदी लहान वयातच दिसू लागली आहेत, पण ज्यांनी दम्यासाठी कोणतेही उपचार घेतलेले नाहीत, असा बालदमा मोठेपणीही राहण्याची शक्यता असते. काही मुलांना मात्र फक्त विषाणूजन्य संसर्ग, ताप, सर्दी-खोकला यानंतर दम्याचा त्रास सुरू होतो. असा दमा वय वाढेल तसा पूर्णपणे बरा होऊ शकतो.

चाचण्या कोणत्या?
दम्यासाठी सर्वसाधारणपणे ‘स्पायरोमेट्री’ ही चाचणी केली जाते. पण ही चाचणी करताना डॉक्टर सांगतील, तसतशी दीर्घ श्वास घेणे, ठरावीक सेकंदांमध्ये तो सोडणे, अशी कृती करावी लागते. त्यामुळे खूप लहान मुलांसाठी ही चाचणी करता येत नाही. अशा रुग्णांमध्ये लक्षणांच्या साहाय्याने तपासून बालदम्याचे निदान केले जाते. ‘इम्पल्स ऑसिलोमेट्री’ ही दुसऱ्या प्रकारची चाचणीदेखील लहान मुलांमध्ये करता येते. मूल साधारणपणे सहा वर्षांचे झाले की स्पायरोमेट्री चाचणी करताना दिलेल्या सूचनांचे पालन करू शकतात.

बालदमा आणि इनहेलर
दम्यासाठी इनहेलरवाटे औषध घेणे ही उत्तम उपचारपद्धती आहे. पण इनहेलर वापरण्याचेही एक तंत्र असते. इनहेलरच्या औषधाचा स्प्रे केल्यावर लगेच दीर्घ श्वास घ्यावा लागतो हे छोटय़ा मुलांना जमेलच असे नाही. केवळ इनहेलर वापरायला दिले आणि पालकांना मुलाच्या तोंडात त्याचा स्प्रे मारायला सांगितले तरी योग्य प्रकारे श्वास घेतला जात नाही आणि औषध आत पोहोचतच नाही. लहान मुलांना इनहेलर घेण्यासाठी विशिष्ट उपकरणे वापरली जातात. या उपकरणात इनहेलरच्या पुढे ‘स्पेसर’ आणि ‘मास्क’ असतो. हे उपकरण वापरतानाही पालक आणि मुलांना एकत्रितपणे त्याचे प्रशिक्षण द्यावे लागते. यातील मास्क बालरुग्णाच्या नाका-तोंडावर लावला जातो. त्याच्या पुढे स्पेसर लावला जातो. स्पेसर म्हणजे आणखी एक तोंड (एक्स्टेंडेड माऊथ) असल्यासारखे आहे. इनहेलरमधून औषध स्पेसरमध्ये येते आणि त्यावाटे रुग्णाच्या तोंडात जाते. सहा वर्षांच्या वरची मुले औषधाची कॅप्सूल टाकायची इनहेलर वापरू शकतात.

इनहेलरमुळे दुष्परिणाम होतात का?
इनहेलरमधील औषधे ही ‘स्टिरॉइड’ प्रकारची असतात. या औषधांमुळे लहान मुलांची वाढ खुंटते, असा अनेकांचा समज असतो. याविषयी काही अभ्यास झाले आहेत. बालदम्याच्या ज्या रुग्णांसाठी इनहेलर वापरले आणि ज्याच्यासाठी वापरले नाही अशा मुलांच्या उंचीची तुलना या अभ्यासांमध्ये करण्यात आली होती. इनहेलर वापरणाऱ्या मुलांपेक्षा ते न वापरणाऱ्या मुलांची उंची कमी राहिल्याचे त्यात दिसून आले. दम्याचा त्रास नियंत्रणात राहिला नाही तर लहान मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. स्टिरॉइड औषधांचे खूप दुष्परिणाम असतात हा दुसरा गैरसमज. बालदम्यात स्टिरॉइड इनहेलरचा वापर करण्याचे फारसे दुष्परिणाम नाहीत. इनहेलरमधून औषध थेट फुप्फुसात पोहोचत असल्यामुळे शरीरात जाणारा स्टिरॉइडचा डोस अत्यंत कमी म्हणजे अगदी मायक्रोग्रॅममध्ये असतो. त्यामुळे बालदम्याच्या उपचारात डॉक्टरांच्या सल्ल्याने इनहेलर स्टिरॉइड औषधे घेण्यास काहीच हरकत नसावी.
डॉ. महावीर मोदी, दमातज्ज्ञ
drm_modi@yahoo.co.in
(शब्दांकन- संपदा सोवनी)