हावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच लागले. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक नवीन टप्पा आता सुरू होणार. इतकी र्वष मोठय़ांकडून नुसतं ऐकलं, चित्रपटांमध्ये बघितलं, ते ‘कॉलेज लाइफ’ आता जगायला मिळणार म्हणून या सुरुवातीच्या दिवसांत मनात अपार उत्सुकता असते. खूप आनंद होत असतो, पण त्याच वेळी आपण आता खऱ्या अर्थाने ‘मोठे’ झालो ही जाणीवही होत असते. थोडं लाजाळू किंवा मागे मागे राहण्याचा स्वभाव असलेल्या मुलांसाठी हे बदल खूप मोठे असतात..

दहावीनंतर महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणं हा आयुष्यातला एक नवीन टप्पा असतो. बालवाडीपासून दहावीपर्यंत आपलं शाळेचं ‘रुटीन’ कसं छान जमलेलं असतं. लहानपणापासून वर्गातली मित्रमंडळी बदललेली नसतात. कित्येक जणांची तर वर्गातली बसण्याची जागाही ठरलेली असते. आपल्या एकटय़ावर फारशी कुठली जबाबदारीही पडत नसते. कधी विशेष तडजोड करावी लागलेली नसते. शाळेतून महाविद्यालयाच्या मोठय़ा समुद्रात उतरल्यावर या गोष्टी प्रथम जीवनात शिरकाव करतात. शिक्षणाच्या शाखा वेगवेगळ्या असल्यामुळे मित्र बदलतात. बहुतेक सगळेच एकमेकांना अनोळखी असतात. समाजात जाण्याची भीती (सोशल एन्झायटी डिसऑर्डर) असलेल्या मुलांसाठी किंवा थोडा लाजाळू किंवा मागे मागे राहण्याचा स्वभाव असलेल्या मुलांसाठी हे बदल खूप मोठे असतात. पटकन नीवन माणसाशी बोलू न शकणं, आत्मविश्वासाने बोलता न येणं, भीती वाटणं, त्यामुळे इतरांना टाळून एकटं राहू लागणं अशी लक्षणं या मुलांमध्ये दिसतात.
तर काही मुलं लहानपणापासूनच स्वच्छंदी किंवा जरा खोडकर असतात. शाळेत येणारी बांधून ठेवल्यासारखं वाटण्याची भावना महाविद्यालयात नसल्यामुळे या मुलांची नवीन काहीतरी करून बघण्याची इच्छा वाढते. नवीन अनुभव घेण्याची इच्छा वाईट नक्कीच नाही, पण तो घेण्यासाठी आजूबाजूच्या मित्रांचा दबाव (पिअर प्रेशर) अनेक जणांच्या बाबतीत कारणीभूत ठरतो. ‘मित्र सिगारेट ओढतात; मग मीही ओढायलाच हवी, नाहीतर ते हसतील’, किंवा ‘मैत्रिणीला बॉयफ्रेंड आहे, मला नसेल तर ती चिडवेल,’ या गोष्टी त्यातल्याच. घरातली मोठी माणसं इतकी र्वष मनावर जे बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यापेक्षा महाविद्यालयातल्या मित्रांमधलं वातावरण अगदी उलट असतं. मग नक्की बरोबर कोण, मी कुणी सांगितलेलं ऐकायला हवं, अशी द्विधा मन:स्थितीही काहींची होते.
आई-वडिलांनी काय करावं?
प्रत्येक आई-बाबांना आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या स्वभावाची कल्पना असते.
त्यामुळे तो किंवा ती या बदलाने गडबडेल का, याचीही कल्पना येते. अशा वेळी पालकांचा आणि मुलांचा संवाद फार महत्त्वाचा ठरतो. एक मात्र आहे, की या संवादात ‘अमुक-एक केलंस तर मारच खाशील’, किंवा ‘असं करंच तू मग बघ घराबाहेरच काढतो की नाही’ असा सूर नसावा. घराबाहेर जे काही घडतं ते मोकळेपणाने पालकांना सांगता यावं असं वातावरण तयार करणं हा संवादाचा हेतू आहे. महाविद्यालयात पाऊल ठेवणाऱ्या आपण मुलांना काही गोष्टी नक्कीच सांगू शकतो.
*  तुमची सामाजिक (-म्हणजे इथे महाविद्यालयातली) प्रतिमा दुसरे जण तुमच्याविषयी काय विचार करतात यावर अवलंबून नसावी. तुमचं वागणं तुम्हालाच खऱ्या अर्थानं पटतं आहे का, हे महत्त्वाचं.
*‘आता तुम्ही ‘मॅच्युअर’ होताय,’ हे सांगणंही गरजेचं. त्यातून आपण आता स्वत:चे निर्णय घेऊ शकतो ही आत्मविश्वासाची भावना येते. महाविद्यालयीन जीवनात आपण जे काही करू त्यावर आपलं पुढचं जीवन बहुतांशी अवलंबून असतं, पुढच्या जगण्याला त्यातून दिशा मिळत असते हेही लक्षात आणून द्यायला हवं.
*पालकांचं मुलांवर लक्ष जरूर असावं. एकटा राहणारा मुलगा अचानक चिडचिड करू लागला किंवा खूप बडबड करणारा गप्प गप्प राहू लागला असे मुलांच्या स्वभावात होणारे बदल पालकांच्या पटकन लक्षात येतात. अशा वेळी पालकांशी बोलायची मुलांना इच्छा व्हावी यासाठी संवादाची वाट नेहमी खुली ठेवायला हवी. गरज भासलीच तर समुपदेशकाचा सल्लाही घेण्यास हरकत नसावी.
*आणखी एक- आपण निवडलेल्या शिक्षण शाखेत आपल्याला नाहीच वाटला रस, तर शाखा बदलण्यात काहीही कमीपणा नाही हे मुलांनी लक्षात घ्यायला हवं. निर्णय घेण्यात चूक होऊ शकते. याचा अर्थ आपण आपल्याला अजिबात न आवडणाऱ्या शिक्षण शाखेत आयुष्यभर राहावं असं नक्कीच नाही. मुला-मुलींची आवड, त्यांचा कल महत्त्वाचा आहे, त्यांना बळजबरीनं विशिष्ट शाखेत शिकायला लावणं योग्य नाही.
डॉ. रोहन जहागीरदार – rohan1080@yahoo.com
(शब्दांकन- संपदा सोवनी )