08 March 2021

News Flash

विचारी मना! :तुझं नि माझं जमेना

सगळीच नाती गुंतागुंतीचीच; पण जोडीदाराबरोबरचे नाते त्यातही आपला खास पदर असलेले. अनेकदा लहानसहान कुरबुरींवरुन या नात्यात कोरडेपणा येऊ लागतो.

| February 21, 2015 02:20 am

सगळीच नाती गुंतागुंतीचीच; पण जोडीदाराबरोबरचे नाते त्यातही आपला खास पदर असलेले. अनेकदा लहानसहान कुरबुरींवरुन या नात्यात कोरडेपणा येऊ लागतो. हे कारण दरवेळी एखाद्या लहानशा गोष्टीवरून झालेलं भांडण असेल किंवा जोडीदाराची आपल्याला खटकणारी एखादी सवय. प्रश्न कुठलाही असो. या प्रश्नाला आपलं म्हणून त्याचा स्वीकार केला की उत्तर शोधणं नक्कीच सोपं जाईल.  
प्रश्न १- माझे व माझ्या नवऱ्याचे ‘लव्ह मॅरेज’ झाले आहे. लग्नानंतरचे काही आठवडे आमचे बरे चालले. आता मात्र आम्हाला एकमेकांचे वागणे खटकू लागले आहे. माझा नवरा काहीही त्याच्या मनाविरुद्ध झालेले ऐकून घेत नाही आणि उलट मीच माझ्या मनचे खरे करण्याचा प्रयत्न करते, असे त्याचे म्हणणे असते. आता खटकणाऱ्या या गोष्टी लग्नाआधी आमच्या लक्षात कशा आल्या नाहीत याचे नवल वाटते. कुणाचे बरोबर आणि कुणाचे चूक याबद्दल सारखा वाद घालण्यातच आमचे आयुष्य जाईल की काय असे वाटते!
उत्तर- तुझं माझं जमेना, अशी गत झालीय खरी तुमची! किंवा तसं दिसतेय तरी तुमचा प्रश्न वाचून! पहिलं म्हणजे अनेक पलू आहेत तुमच्या छान छोटय़ा प्रश्नात. लग्नानंतर भूमिका बदलतात. प्रेयसीची बायको होते, अन प्रियकराचा नवरा. मग पूर्वी ज्या गोष्टींचा बोनस मिळाल्यासारखा आनंद होत असेल, त्या गोष्टी आता हक्क वाटू लागतात. ‘प्लीज’ अशी विनंती केल्यावर ‘शुअर’ असा प्रतिसाद मिळण्यातून जो आनंद आहे, तेच तर खरं ‘फ्लेजर’! पण नेमकं हेच विसरायला होतं लग्न झाल्यावर. आधी दोघांनाही एकमेकांना खूष करायचं होतं, तर आता दोघांनाही एकमेकांकडून कित्येक गोष्टी मिळवायच्या आहेत, आणि त्यासुद्धा हक्कानं; मग खटके नाही उडणार तर काय?
आता थोडं आधीच्या काळाकडे बघू या. आधी आपण दुसऱ्याला खूष करण्यात गुंतलो होतो, कारण आपला रसिकपणा तर आहेच. सौंदर्याचे उपासक आपण असल्यानं आपण भारावून गेलेलो. हो की नाही? आणि यालाच आपण ‘लव्ह’ समजल्यानं आता भ्रमनिरास झाल्यासारखं तरी वाटतेय किंवा किमान एवढं तरी जाणवतेय की प्रेमाची आपली व्याख्या निराळी, अन जोडीदाराची निराळी. प्रेम हे अमूर्त अन् दैवी असलं तरी विवाह हा दुपारच्या उन्हासारखा स्पष्ट, रोखठोक अन् वास्तविक असतो. त्यामुळे टिकून राहायचं असेल तर प्रेम आणि विवाह या दोन्ही पेपरात पास व्हावं लागेल! बरोबर- चूक करण्याच्या वादात पडलं तर आयुष्यभरही चालू शकेल हा खेळ, हे बरोबरच आहे. पण इथे आढावा घेणं, आत्मपरीक्षण करणं, दुसऱ्याचा सल्ला घेणं, पण निर्णय मात्र आपणच घेणं, अन दुसऱ्याला ‘ब्लेम’ न करणं ही पथ्यं पाळली तर स्वतचा तरी विकास नक्की होईल. ‘करा प्रयत्न नेटका, जयास लाभ तेतुका!’
प्रश्न २- मी तीस वर्षांची आहे. मला स्वच्छतेची खूप आवड आहे. तळहातावर अगदी छोटासा धुळीचा डाग असला तरी मला खपत नाही. मग मी पुन:पुन्हा हात धुते. हात धुतले की मला थोडा वेळ बरे वाटते. पण मग पुन्हा एकदा हात धुवावेत असे वाटू लागते. घराची साफसफाई करण्याचे कामही मी स्वत: अगदी उत्साहाने करते. मी नोकरीही करत असल्यामुळे संध्याकाळी घरी यायला मला उशीर झालेला असतो. तरीही आल्यावर आधी हात धुवून केर काढावासा वाटतो. लग्नानंतर सुरूवातीला नवरा ‘तुला स्वच्छतेचा आजार झालाय,’ असे म्हणून माझी थट्टा करायचा. पण आता तो देखील वैतागतो. मी स्वच्छतेच्या आजाराविषयी इंटरनेटवर वाचलंय. पण तो बरा होऊ शकतो का?
उत्तर- इतक्या मोकळेपणानं तुम्ही तुमचा प्रश्न मांडलात, हेच मुळात कौतुकास्पद आहे. फक्त मी त्याला ‘स्वच्छतेचा आजार’ मात्र म्हणणार नाही. ‘क्लीनलीनेस इझ नेक्स्ट टू गॉडलीनेस’, हे लक्षात ठेवलं, तर आपण त्याला आजार म्हणणार नाही. अर्थात, तुम्ही इंटरनेटवरून ‘ओसीडी’बद्दल वाचलेच आहे, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त, अवाजवी, अन् सगळ्यांना धोकादायक इतकी स्वच्छता हा नक्कीच आजार म्हणावा लागेल आणि लवकर उपचार सुरू केले, सलग प्रयत्न केले, औषधोपचार नीट घेतले, तर बहुतेक जणांमध्ये बहुतांश वेळा चांगला गुण येतो.
भावना अन् विचार यांचं निरीक्षण ठेवायला हवं. खूप वेळा जुने अनुभव, आठवणी, त्यावर आपण केलेले भले-बुरे विचार, अन् पुरेशा प्रमाणात व्यक्त न झालेले आपले असंतोष, धुसफूस अशा गोष्टींचाही संबंध असतो. त्यासाठी ‘कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी’ (सीबीटी) ही अत्यंत उपयुक्त अन् आवश्यक असते, हे सुद्धा तुम्ही वाचलेच असेल.
त्यामुळे एवढं खरं की आपली आत्मकथा लिहावी, ताणांची उजळणी करावी, नुसत्या लक्षणांमध्ये अडकून राहू नये, आणि ‘सीबीटी’ घ्यावी; म्हणजे जीवन सुसह्य होईल. अन् औषधांमुळेही लगेच गुण यायला सुरुवात होते, हे नक्कीच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 2:20 am

Web Title: conflicts in relationship
टॅग : Relationship
Next Stories
1 आहार : गोड खाऊ किती
2 आयुर्वेद मात्रा : कफामुळे येणारा ताप (ज्वर)
3 ‘ताप’दायक!
Just Now!
X