कॉलनीत सगळीकडे शोधाशोध सुरू होती. भराभर मोबाईलवर नंबर फिरवले जात होते. त्या घरापाशी खूप गर्दी जमली होती. जो-तो आपापल्या परीनं सल्ले देत होता. काही जणांची इकडे-तिकडे धावपळ सुरू होती. वातावरण गंभीर झालं होतं. तिथलं एकंदरीत दृष्य बघून हरवलेला ‘तो’ कोण असेल असा विचार करीत  येणारा-जाणारा पुढे जात होता. जे घडलं होतं ते नक्कीच चिंता वाटावी असंच होतं.
त्या कॉलनीमध्ये राहणारे एक आजोबा सकाळी फिरायला म्हणून जे बाहेर पडले, ते दुपार टळून गेली तरी घरी आले नव्हते. आजोबांची वाट बघून-बघून आजी थकल्या. त्यांनी घराच्या आसपास बघितलं, शेजारच्या पप्पूला देवळात पाहून यायला सांगितलं. पण आजोबा कुठेच नव्हते. मग मात्र आजी रडकुंडीला आल्या आणि त्यांनी त्यांच्या मुलाला फोन करून बोलावून घेतलं. मुलगा लगेच आला. नातवंडंही जमली. चिमुकली नातवंडं कॉलनीतल्या मोठय़ा मुलांना घेऊन आजोबांच्या कॉलनीतल्या मित्रांकडे, जॉगिंग ट्रॅकवर, स्विमिंग टँकवर, क्लबहाऊसमध्ये सगळीकडे बघून आली, पण आजोबा काही सापडायला तयार नव्हते. काही मंडळी जवळच्या रुग्णालयातपण जाऊन बघून आली. आजोबांचा अपघात होऊन आणि त्यांना कुठे अ‍ॅडमिट केलं आहे का, ही शंकापण दूर करून झाली. तरीही आजोबांचा पत्ता नव्हता. सगळेजण हवालदिल झाले होते..
तब्बल तीन दिवस उलटले. आजोबांचा अजुनही काहीच शोध लागला नव्हता. ‘मिसिंग’ची तक्रारदेखील दोन दिवसांपूर्वीच देऊन झाली होती. आजोबांच्या घरचे सगळेच काळजीत होते. आजी तर काही खायलाप्यायलाच तयार नव्हत्या. हे जरी अतिशयोक्तीचं वाटत असलं, तरी ही घटना सत्य असल्यामुळे तसंच घडलं  होतं. मुलानंदेखील ऑफिसला सुटी घेऊन, नातेवाईकांना घेऊन शोधमोहीम सुरू केली होती. पण हे सुमारे ऐंशी वर्षांचे आजोबा काही सापडायला तयार नव्हते. वर्तमानपत्रं, आकाशवाणी, दूरचित्रवाणी जिथे जिथे प्रयत्न करता येतील ते सगळे सुरू होते.
..चौथ्या दिवशी सकाळी-सकाळीच दारावरची बेल वाजली. खिन्न झालेल्या त्या घरात आनंदी टय़ून वाजवणाऱ्या संगीतमय बेलचे सूर घुमले. बिचाऱ्या झालेल्या आजींनी खिन्न मनानंच दार उघडलं, आणि..त्या डोळे मोठ्ठे करून, आश्चर्यानं समोर बघतच राहिल्या. कपडे मळलेले, दाढी वाढलेली अशा अवतारात चक्क आजोबा समोर उभे होते. आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले नसते तरच नवल! त्यांनी आजोबांना आणि त्यांना घेऊन आलेल्या मध्यमवयीन व्यक्तीला घरात घेतलं. घरातली सगळी मंडळी भोवताली जमली. त्या व्यक्तीची, आजोबांची विचारपूस झाली. तेव्हाही आजोबा विमनस्क अवस्थेतच, अनोळखी जागी बसल्याप्रमाणे बसले होते.
ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीनं आजोबांना घरी आणून पोहोचवलं होतं. एका ठिकाणी विमनस्क अवस्थेत बसून राहिलेल्या, स्वत:बद्दल काहीच सांगता न येणाऱ्या आजोबांना पाहून कुणीतरी त्या संस्थेला फोन करून कळवलं होतं, आणि त्या कार्यकर्त्यांनं आजोबांची जबाबदारी घेऊन, कसंतरी त्यांचं घर शोधून काढून त्यांना घरी आणून सोडलं होतं. असा प्रसंग त्या कुटुंबावर पहिल्यांदाच आला होता. त्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आजोबांना डिमेन्शिया हा आजार असण्याची शक्यता होती. त्यांना वैद्यकीय उपचारांबरोबरच घरातल्यांनी समजून घेण्याची, एकटय़ाला बाहेर न पाठविण्याची खबरदारी घेण्याची गरज होती.
लॅटिन भाषेतील ‘डिमेन्शिया’ या शब्दाच्या अर्थानुसार मनापासून अलग होण्याची प्रक्रिया या आजारात होते. आजाराचं नाव जरी छोटं असलं तरी माणसाच्या अस्तित्वासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा आजार ज्यांना होतो, त्यांच्यापेक्षाही त्यांच्या आजूबाजूची मंडळी अधिक कष्टी होतात. हा आजार झालेल्या मंडळींना आजूबाजूची मंडळी आपल्यासाठी काही करतायत, हेदेखील लक्षात येत नाही. तास-अध्र्या तासापूर्वी घेतलेला चहा-जेवण ही मंडळी चक्क विसरू शकतात. त्यांना काळ, वेळेचं देखील भान राहात नाही. दैनंदिन गोष्टींबद्दल देखील त्यांच्या काही लक्षात येत नाही. थोडक्यात आपल्या आयुष्यात काय सुरू आहे याचं भान या आजारात विसरू शकतं.
मेंदूशी संबंधित हा आजार साठीनंतर सुरू होऊ शकतो. कामामध्ये चुका होण्यासारखी विविध लहानमोठी पण दुर्लक्षित केली जाणारी लक्षणं या आजाराच्या सुरूवातीला दिसतात. हळूहळू त्या व्यक्तीच्या भावविश्वात आक्रस्ताळेपणापासून नैराश्यापर्यंत विविध लक्षणे दिसू लागतात. या व्यक्तींना सांभाळून घेणे, त्यांची जपणूक करणे, ही घरच्यांसाठी कसोटीच असते. अशी काही लक्षणे आपल्या घरातल्या ज्येष्ठांमध्ये दिसत असतील तर वेळच्या वेळी उपाययोजना करणे आणि वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणेच इष्ट.