मधुमेहात मूत्रिपड खराब होतं, असं म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे?
मधुमेह म्हणजेच रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण वाढणं. रक्त संपूर्ण शरीरभर फिरत असल्यानं शरीरच्या जवळजवळ प्रत्येक इंद्रियावर मधुमेहाचा परिणाम होतो. मूत्रिपड, डोळे आणि मज्जातंतूवर तो जरा जास्त होतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मधुमेहाचा मूत्रिपडावर होणारा परिणाम प्रत्येक मधुमेही माणसावर होतोच असं नाही. काही माणसांमध्ये अनेक र्वष मधुमेह असूनही त्यांचं मूत्रिपड ठणठणीत राहतं. याचा शोध घेतला असता लक्षात आलं की ज्यांच्या जीन्समध्ये काही प्रश्न आहे त्यांचंच मूत्रिपड खराब व्हायची शक्यता जास्त असते. म्हणूनच तुमच्या घरात जर कोणाला मूत्रिपडाचा प्रश्न निर्माण झाला असेल तर सावध व्हा आणि त्वरित आपली तपासणी करून घ्या.

तपासणी करायची म्हणजे काय करायचं?
आपलं मूत्रिपड म्हणजे एक गाळणी आहे. चहाची गाळणी जशी असते तशीच फक्त उलटी. चहाची गाळणी हवा असलेला चहाचा द्राव गाळून देते, नको असलेली पावडर स्वत:कडे ठेवते. मूत्रिपड याच्या उलट वागतं. चांगल्या गोष्टी म्हणजे आपले प्रोटिन्स शरीरातच ठेवतं आणि नको असलेले क्रिएटिनसारखे पदार्थ टाकून देतं. मूत्रिपडाचं काम नीट होत नसेल तेव्हा काय होईल. लघवीतून प्रोटिन्स जातील पण नको असलेलं क्रिएटिन मात्र पुरेशा प्रमाणात जाणार नाही. रक्तात क्रिएटिन वाढेल. त्याज्य पदार्थासोबत शरीरातल्या क्षारांचं नियंत्रणदेखील मूत्रिपड करतं, त्यामुळं मूत्रिपडात दोष असला की रक्तातले क्षारही कमी-जास्त होतात. त्यावरही लक्ष ठेवावं लागतं. आपल्या मूत्रिपडाकडं अतिरिक्त क्षमता खूप असते. त्यामुळं रक्तात क्रिएटिन वाढेपर्यंत बराच उशीर होतो. हे लक्षात घेऊन वेळीच सूचना देणारी एक तपासणी आताशा वापरली जाते. लघवीत प्रोटिन्स आणि क्रिएटिन यांचं गुणोत्तर पाहणारी ही तपासणी मूत्रिपड खराब व्हायच्या किती तरी आधी धोक्याचा इशारा देते.

ही तपासणी कधी करून घ्यायची?
टाइप वन मधुमेहाचं निदान झाल्यापासून पाचेक वर्षांनी आणि टाइप टू मधुमेहात निदानाच्या वेळेसच पहिल्यांदा तपासणी व्हावी, अशी अपेक्षा असते. त्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार ती केली जावी. दर वर्षी केल्यास उत्तम असा संकेत आहे. नियमितपणा राखणं गरजेचं आहे.

मूत्रिपडाला इजा झाली तर मग काय करावं ?
प्रथम इजा किती गंभीर आहे हे डॉक्टर ठरवतात. आता केवळ रक्तात क्रिएटिन किती वाढलंय ते पाहून डॉक्टर थांबत नाहीत. ते ईजीएफआर म्हणजे मूत्रिपडाची रक्त गाळण्याची क्षमता निश्चित करतात. कारण तेच मूत्रिपडाच्या कामाचा खरा अंदाज देतं. या आकडय़ावर औषधांचे डोस ठरतात. कुठली औषधं घ्यायची, कुठली वज्र्य करायची ते ठरतं. एक मात्र पक्कं, की मूत्रिपडावर परिणाम करणाऱ्या वेदनाशामक गोळ्या वगरे पूर्णत: बंद कराव्या लागतात. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मूत्रिपड केवळ रक्त गाळण्याचं काम करत नाही. हिमोग्लोबिन बनवण्यासाठी लागणारा एक हॉर्मोन आणि वेळीप्रसंगी रक्तातली ग्लुकोज कमी झाल्यावर चरबी किंवा प्रोटिन्सपासून ग्लुकोज तयार करण्याचं कामही त्याच्यावर सोपवलेलं आहे. म्हणजे मूत्रिपड निकामी झाल्यास हिमोग्लोबिन कमी होतं आणि पोट रितं असताना माणसं वारंवार हायपोत जातात, त्यांची ग्लुकोज नॉर्मल पेक्षादेखील कमी होते. विशेष म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आयर्नचं औषध देऊन काहीच फायदा नसतो.

एकदा मूत्रिपड काम करेनासं झालं की ते बरं होण्यासाठी काय करावं लागतं?
हे लक्षात घ्या की, एकदा मूत्रिपड कामातून गेलं की ते हळूहळू नाशाकडेच जाणार ते नक्की असतं. फक्त तो विनाश लांबवता येतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो रक्तदाब. तो काबूत ठेवणं हे मधुमेहावर नियंत्रण राखण्यापेक्षाही महत्त्वाचं असतं. भले चार गोळ्या वापराव्या लागल्या तरी बेहेत्तर रक्तदाब व्यवस्थित ठेवावाच लागतो. अर्थात ग्लुकोज फार वाढू देता उपयोगी नसतं. पाणी ठरावीक प्रमाणात घ्यावं लागतं. प्रोटिन्स मर्यादेत खावे लागतात.
म्हणूनच मूत्रिपड खराब न होऊ देणं हे सर्वोत्तम. त्यासाठी कृपया तुमचा मधुमेह सांभाळा.
डॉ. सतीश नाईक – dr.satishnaik.mumbai@gmail.com