मी एक मध्यमवयीन पुरूष आहे. मला सतत आणि खूप भीती वाटते. ही भीती नेमकी कशामुळे वाटते हे मलाही सांगता येणार नाही. पण सतत वाटते की माझ्या हातून काहीतरी फार मोठी चूक घडेल, त्याचे मोठेच परिणाम भोगावे लागतील, आहे- नाही ते सगळे मातीत मिसळेल. त्यामुळे मग प्रत्येक काम करताना मी प्रचंड विचार करतो. हजारदा एकेका गोष्टीची खात्री करतो, तरीही भीती वाटण्याचे काही थांबत नाही. घरातली नाती निभावताना, घराबाहेर पडून गाडी चालवताना, ऑफिसचे काम करताना, सगळीकडे भीती माझ्या बरोबर असतेच. दरवेळी आपले काहीतरी चुकणारच ही भावना काही पाठ सोडत नाही. आत्ता हे पत्र लिहितानाही मी फार धैर्य गोळा करून लिहितो आहे. मला कृपया मार्गदर्शन करा.
उत्तर : तुम्ही जरी अगदी भीतीनं गळाठून गेला असलात आणि धीर गोळा करून पत्र लिहिले असलेत, तरी तुमचं पत्र कुणालाही आवडेल असंच आहे, अन् कुणालाही तुम्हाला मनापासून मदतच करावीशी वाटेल. हा त्रास केव्हापासून आहे, असं तुम्ही जरी काही नेमकं लिहिलं नसलं तरी एकूण असं लक्षात येतं की अनेक र्वष तुम्ही भीतीशी झगडताय. म्हणूनच प्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही आता हे धाडस करून पत्र लिहू शकलात.
तुमच्या सगळ्या सांगण्याचा जर गोषवारा काढला तर असं म्हणता येईल की तुमच्या मेंदूत तुम्ही एक ‘ऑनलाईन एडिटर’ किंवा खरंतर ‘ऑनलाईन ऑडिटर’ बसवून घेतलाय, आणि हा संपादक किंवा लेखा परीक्षक जरा जास्तच कडक आहे! खरं तर क्रूरच आहे. त्याच्याकडे क्षमाच नाहीये कुठल्याही चुकीला; किंवा अगदी स्वप्नातल्या चुकीला पण.
सगळेच जण जर तुमच्यासारखे असते, तर जगातली कितीतरी दुखं हलकी झाली असती, कारण दुसऱ्याचा विचार करून आपल्या हातून काहीही चुकू नये म्हणून सतत प्रयत्न करणारी माणसं समाजाचा गाडा सुरळीत चालवायला मोलाचा हातभार लावत असतात. अर्थात समाजकार्य करण्यासाठी काही तुम्ही हे करत बसत नाही, हे मला मान्य आहे, अन त्यात काही गरही नाही. पण विचार करण्याचा, चुका (आणि टीकासुद्धा) टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याचा तुमचा स्वभाव खूपच उपयुक्त आहे हे मात्र खरंय!
आता ही भीती कमी करून तुमच्या आयुष्यात थोडाफार तरी आनंद यावा, यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. मला वाटतं की तुमच्या प्रश्नाची तीव्रता आणि दीर्घ कालावधी लक्षात घेतले तर तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने चिंता, भीती आणि ‘ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर’च्या लक्षणांसाठी वापरली जाणारी औषधे आणि समुपदेशन असे दोन्ही उपाय लगोलग सुरू करावेत. यासाठी तुम्ही रोजच्या रोज तुम्हाला छान कशानं वाटलं आणि वाईट कशानं वाटलं यांची यादी ठेवायला सुरू करावी. स्वततल्या चांगल्या गोष्टी पण स्वतला सांगून पाहा बरं कसं वाटतं ते! अन् वाईट वाटवणाऱ्या गोष्टींमधून चिंता आणि भीतीच्या गोष्टी वेगळ्या काढून काम सुरू करू या. अशा भीतीदायक गोष्टींची चढती भाजणी लावून अगदी कमी भीतीदायक गोष्टींना तोंड द्यायला सुरुवात करायची. म्हणजे आधी कल्पनेतच बरं का! अन् तीसुद्धा अगदी पूर्ण शवासनासारख्या विश्रांतीच्या अवस्थेत जाऊन.