22 September 2020

News Flash

ई-धूम्रपान हानिकारक!

‘सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ई-सिगारेटचा वापर करा,’ असा अपप्रचार अनेकदार केला जातो. मात्र ई-सिगारेटही आरोग्यासाठी हानिकारकच आहे.

| February 18, 2014 09:01 am

‘सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ई-सिगारेटचा वापर करा,’ असा अपप्रचार अनेकदार केला जातो. मात्र ई-सिगारेटही आरोग्यासाठी हानिकारकच आहे. अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच राज्यात
‘ई-सिगारेट’वर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले आहे. ई-सिगारेट म्हणजे काय, तिची लोकप्रियता कोणत्या मुद्दय़ावर वाढली, या सिगारेटबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांचे आक्षेप काय आहेत, याबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.

म्हणजे नेमकं काय?
जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. फरक असा, की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.

ई-सिगारेटचा प्रवास
एका चिनी औषधनिर्मात्याने ई-सिगारेटचा शोध लावला. २००३ मध्ये या सिगारेटच्या उपकरणाचे पेटंट घेऊन ते लगेच चिनी बाजारपेठेत दाखलही झाले. २००७मध्ये ही सिगारेट अमेरिकेत विकली जाऊ लागली. अनेक कंपन्या या व्यवसायात उतरल्या आणि त्याची विक्रीही झपाटय़ाने वाढली. ‘प्रत्यक्ष धूम्रपानापेक्षा ई-सिगारेट बरी,’ हा दावा या सगळ्या वाटचालीच्या केंद्रस्थानी होता. या दाव्यात तथ्य किती, ई-सिगारेट वापरून धूम्रपान सोडता येणं खरंच शक्य आहे का, या प्रकारच्या धूम्रपानाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते, या प्रश्नांवर अजूनही ठोस उत्तरं उपलब्ध नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांमध्येही या सिगारेटच्या वापराबद्दल दुमत आहे. तंबाखू, क्यूबन सिगार, बियर अशा स्वादांबरोबरच वेलची, लवंग, कॉफी आणि अगदी स्ट्रॉबेरी, आंबा अशा वेगवेगळ्या आकर्षक स्वादांमध्ये या सिगारेटस् मिळतात. त्यांच्या विक्रीत ऑनलाईन होणाऱ्या विक्रीचा वाटा खूप मोठा आहे.

धूसर चित्र
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने २००९मध्ये ई-सिगारेटच्या परिणामांवर एक अभ्यास केला होता. या अभ्यासाचे निष्कर्ष काहीसे धक्कादायक होते. ई-सिगारेटच्या लेबलवर लिहिलेले निकोटिनचे प्रमाण आणि ही सिगारेट ओढताना शरीराला मिळणारे निकोटिनचे प्रमाण यात तफावत असल्याचे या अभ्यासात समोर आले होते. ‘निकोटिन फ्री’ म्हणून विकल्या जाणाऱ्या काही ई-सिगारेटमध्येही प्रत्यक्षात निकोटिन द्रव्य असल्याचेही या वेळी दिसले होते. साध्या सिगारेटमध्ये असणारी ‘डायथायलिन ग्लायकॉल’सारखी काही विषारी द्रव्येही काही ई-सिगारेटमध्ये सापडली. असे असले तरी ‘धूम्रपानाचे व्यसन सोडवण्यासाठी ई-सिगारेट मदत करू शकेल,’ हा उत्पादकांचा दावा कायम राहिला. परंतु आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने या सिगारेटच्या सुरक्षिततेबद्दल पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

निकोटिनचे धोके
तंबाखूमध्ये निकोटिनबरोबरच कर्करोगाला कारणीभूत ठरणारी ‘नायट्रोसअमाईन’ आणि ‘हायड्रोकार्बन’सारखी घातक द्रव्ये असतात. निकोटिन हे द्रव्य ‘हायली अ‍ॅडिटिव्ह’ म्हणजे ज्याचे व्यसन चटकन लागते असे आहे. निकोटिन हृदयाला तर हानिकारक आहेच, त्याबरोबरच ते मानसिक अस्वस्थतेसारख्या विकारांचेही कारण ठरते. त्यामुळेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा- २००६ नुसार कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थात निकोटिनचा समावेश करण्यास मनाई आहे.  

‘निकोटिन रीप्लेसमेंट थेरपी’ कितपत परिणामकारक?
सध्या धूम्रपान सोडण्यासाठी कोणतेही परिणामकारक औषध उपलब्ध नसल्याचे मत टाटा मेमोरिअल रुग्णालयातील शल्यविशारद डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘तंबाखूमधील कर्करोगकारक घटक वगळून केवळ निकोटिनचा वापर केल्यास ते तंबाखूइतके हानिकारक ठरत नाही, असे काही संशोधकांचे मत आहे. परंतु अशा प्रकारची ‘निकोटिन रीप्लेसमेंट थेरपी’ वापरण्याचा धूम्रपान सोडण्यासाठी फारसा फायदा होत नसल्याचेच काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. धूम्रपानाचे व्यसन असलेल्या गर्भवती महिलांवर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात निकोटिन रीप्लेसमेंट थेरपी वापरूनही धूम्रपान सोडणे शक्य न झाल्याचेच दिसून आले.’’

ई-सिगारेट आणि निकोटिन रीप्लेसमेंट थेरपी यात फरक काय?
डॉ. चतुर्वेदी म्हणाले, ‘‘निकोटिन रीप्लेसमेंट थेरपी ही वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि ठराविकच कालावधी अवलंबली जाते. मात्र ई- सिगारेट ओढण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणारे लोक विरळाच असतात. ही सिगारेट कुठेही सहज उपलब्ध होते, तसेच त्याच्या विक्रीवरही कोणते र्निबध नाहीत. या सर्व गोष्टींमुळे ही सिगारेट आरोग्यास हानिकारक ठरू शकते.’’

शब्दांकन- संपदा सोवनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 9:01 am

Web Title: e smoking is hazardous
टॅग Health It
Next Stories
1 कॅन्सर आणि आयुर्वेद: आमाशयाचा कर्करोग २
2 एकटेपणाचे बेट!
3 स्मार्टफोन.. डोळ्यांवर ताण!
Just Now!
X