उन्हाळ्यात उष्णता, धूळ आणि तापलेली सूर्यकिरणे या सगळ्या गोष्टींना एकदमच तोंड द्यावे लागते. डोळे या नाजुक अवयवावर हे घटक विपरित परिणाम करतात. हा परिणाम टाळून उन्हाळा डोळ्यांसाठीही आनंददायक व्हावा यासाठी काही उपाय-
* चांगल्या सनग्लासेसचा (गॉगलचा) उपयोग करा. त्वचेचे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. त्याच प्रकारे आयग्लास लेन्स (डोळ्यांचा चष्मा) वापरल्याने हे अल्ट्राव्हायोलेट किरण डोळ्यांना इजा पोहोचवू शकत नाहीत. अल्ट्राव्हायोलेट किरण डोळ्यांवर अधिक प्रमाणात पडले तर त्यामुळे मोतीबिंदू होणे, दृष्टिपटल (रेटिनल) क्षतिग्रस्त होणे तसेच डोळ्यांच्या इतर काही समस्या उद्भवण्याचीही जोखीम असते.
* विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत डोळ्यांच्या चारही बाजूंनी संरक्षण देणारा गॉगल फायदेशीर ठरतो. असा गॉगल सूर्यकिरण आणि धुळीपासून डोळ्यांना वाचवतो  आणि डोळे थंड ठेवण्यासही मदत करतो.
* पाणी आणि बर्फावरून अल्ट्राव्हायोलेट किरण परावर्तित होतात. त्यामुळे उन्हाळ्यात वॉटर स्पोर्ट्सची मजा घेण्याचा बेत असल्यास चांगल्या सनग्लासेसचा वापर अवश्य करा. अशा ठिकाणी डोळ्यांच्या सुरक्षेचे भान ठेवले नाही, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीत डोळे लाल होऊ शकतात. तसेच डोळ्यांमधील कॉर्नया (डोळ्यांची पुतळी) क्षतिग्रस्त होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.
* सुटीत शहरातील नेहमीच्या वातावरणापासून बाहेर जाऊन कॅम्पिंग करण्यासारख्या गोष्टींचेही बेत आखले जातात. कॅम्पिंगच्या ठिकाणी स्वयंपाकासाठी लाकडे फोडणे किंवा आग पेटवून त्यावर पदार्थ शिजवणे अशा वेळी ‘क्लीअर प्रोटेक्टिव ग्लासेस’चा उपयोग अवश्य करा. वाहत्या वाऱ्याने चुलीची उडणारी राख, ठिणग्या यांमुळे डोळ्यांना गंभीर अपाय होण्याची शक्यता असते. हे सुरक्षित गॉगल घातल्यामुळे सहज टाळता येईल.
* सायकल चालवणे, धूळ-मातीत बाइक चालविणे अशा  बाह्य़ खेळांत उडणारी दगड-माती, धूळ डोळ्यात जाते. गॉगल या धुळीपासूनही बचाव करू शकेल.
* उन्हाळ्यात पाण्यात पोहणे सर्वानाच आकर्षक वाटते. पण पोहतानाही गॉगल विसरू नका. तरणतलावांचे पाण्यात ते अधिक सुरक्षित बनवण्यासाठी क्लोरिन आणि अन्य काही रसायने मिसळली जातात. त्यामध्ये डोळे जळजळणे, डोळ्यांमधून पाणी येणे अशा तक्रारी उद्भवणे शक्य असते. त्यामुळे पोहताना खास पोहण्यासाठीचा गॉगल वापरावा. तलावाच्या बाहेर आल्यानंतरच डोळे लगेच स्वच्छ पाण्याने धुवायला हवेत.
* उन्हाळ्यात फक्त त्वचाच कोरडी होत नाही, डोळे सुद्धा कोरडे पडतात. त्यामुळे या दिवसांत ‘ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स’ डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. हे ड्रॉप्स ‘प्रिजरवेटिव फ्री’ असणे आवश्यक आहे. हे ड्रॉप्स आता देशात सहजपणे उपलब्ध होतात. डोळे शांत आणि सुरक्षित राहण्यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या ड्रॉप्सचा वापर करावा.