News Flash

काळजी ‘नेत्रां’ची!

’अंगातील उष्णता वाढली की त्याचा डोळ्यांनाही त्रास झालेला बघायला मिळतो.

डोळ्यांच्या आरोग्याचा स्वतंत्र विचार आपल्या मनात कधी येतो?..अनेकांच्या बाबतीत याचे उत्तर डोळ्याला काहीतरी दुखल्या-खुपल्यावरच असेच द्यावे लागेल. डोळ्यांवर खूप ताण पडून त्रास होऊ लागल्याशिवाय किंवा उष्णतेमुळे डोळ्याच्या पापणीला रांजणवाडी होऊन ठणकू लागल्याशिवाय डोळ्यांची काळजी घ्यावीशी सहसा वाटत नाही. नुकत्याच झालेल्या जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने डोळ्यांच्या दैनंदिन काळजीविषयी थोडेसे..

अंगातली उष्णता वाढल्यामुळे डोळ्यांना त्रास

’अंगातील उष्णता वाढली की त्याचा डोळ्यांनाही त्रास झालेला बघायला मिळतो. यात अचानक डोळ्यावर लहान फोड येतो. याला रांजणवाडी असेही म्हणतात. हा फोड दुखतो, लाली येते, पू देखील होतो. डोळ्यांच्या पापणीला असलेल्या केसाच्या खालचे छिद्र बंद होऊन जंतूसंसर्ग झाल्यामुळे ही रांजणवाडी होते. पुरेसे पाणी न पिणे, तिखट आणि तेलकट पदार्थाचे सातत्याने सेवन हे असा फोड येण्यासाठी कारणीभूत ठरु शकते.
’डोळ्यांवर उष्णतेमुळे येणारा फोड गाठीच्या स्वरुपातही असू शकतो. हा लहानसा फोड मात्र दुखत नाही पण तो सहजासहजी नाहीसाही होत नाही. काही जणांमध्ये अशी गाठ काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेचीही गरज भासू शकते.
’डोळ्यांवर अश्रूंचा एक पातळ पडदा (टिअर लेअर) असतो, आणि अश्रूंच्या या पडद्याचे ‘म्युसिन लेअर’, ‘वॉटर लेअर’ आणि ‘ऑईल लेअर’ असे घटक असतात. शरीरातील उष्णता वाढल्यावर यातील ऑईल लेअरचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे अश्रू नीट तयार होत नाहीत आणि डोळे कोरडे पडण्याचा संभव निर्माण होतो. यात डोळे लाल होणे, डोळ्यांना थकवा येणे, आग होणे, सारखे डोळे झाकून घेण्याची इच्छा होणे अशी लक्षणे दिसतात.
’रांजणवाडीसारख्या फोडावर गरम शेक दिला जातो. पापणीच्या कोसाखालचे छिद्र बंद होऊन त्याच्या आत असलेले तेल घट्ट झालेले असते. गरम शेकामुळे ते विरघळून बाहेर पडण्यास मदत होते. हा गरम शेक दोन प्रकारे देता येतो. गरम तव्यावर कोरडा रुमार ठेवून त्याने शेकणे किंवा गरम पाण्यात रुमाल भिजवून त्याने शेकणे. ओल्या रुमालाचा शेक केव्हाही चांगला. रांजणवाडीची सुरूवात होते तेव्हाच दिवसात २-३ वेळा हलक्या हाताने शेक दिला तर फोड बसून जाण्यास मदत होते.
’डोळ्यावर गाठीसारखा फोड येण्यावरही गरम शेक देता येतो, त्याने ही गाठही बसून जाऊ शकते. शेक घेऊन फायदा न झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रखर उन्हापासून चिमुकल्यांचे डोळे जपा!
’उन्हाळ्याच्या सुरूवातीला काही लहान मुलांना डोळ्यांमध्ये अ‍ॅलर्जी निर्माण होण्याची प्रवृत्ती दिसते. डोळ्यांत खाज येणे, लाली येणे, सारखे डोळे चोळणे ही या अ‍ॅलर्जीची प्रमुख लक्षणे असतात. एकदम प्रखर सूर्यकिरणांमध्ये गेल्यावरही अनेक मुलांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. काही मुलांमध्ये अशी सूर्यकिरणे डोळ्यांवर पडल्यावरडोळा आपोआप मिटला जातो आणि तिरळेपणाची सुरूवात दिसून येते. यात प्रकाश सहन न झाल्यामुळे डोळ्यांवर असलेले नैसर्गिक नियंत्रण काम करत नाही.
’डोळ्यांवर ओला रुमाल ठेवणे किंवा डोळे मिटून वरुन पाण्याने डोळे धुणे हा या प्रकारच्या त्रासावरचा उत्तम उपाय आहे.

उन्हाचा त्रास ज्येष्ठांनाही
’प्रखर सूर्यकिरणांमुळे मोठय़ांच्याही डोळ्यांना त्रास होऊ शकतो. याला ‘एज रीलेटेड मॅक्युलर डीजनरेशन’ म्हणतात. दृष्टीपटलावर रंग ओळखणाऱ्या ‘रॉड’ आणि ‘कोन’ अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. या पेशींना पोषण देणारा ‘आरपीई’ (रेटिनल पिगमेंट एपिथेलियम) हा लेअर देखील दृष्टीपटलावर असतो. उन्हात डोळ्यांची कोळजी न घेतल्यास डोळ्यावर अतिनील किरणे सतत व दीर्घकाळ पडत राहतात आणि दृष्टीपटलावरील या पेशींना इजा होते. यामुळे सरळ एकाच ठिकाणी पाहण्याची दृष्टी (सेंट्रल व्हिजन) खराब होते. यात रुग्णाला समोर कुणीतरी उभे आहे हे दिसते व समोरच्याचा चेहरा नीट ओळखता येत नाही. वयस्कर व्यक्तींमध्ये हा त्रास प्रामुख्याने दिसतो. डोळ्यातला हा त्रास वाढण्यापासून थांबवता येतो, पण एकदा झालेली इजा पूर्ववत बरी करता येत नाही. सतत गरम वातावरणात काम करावे लागणाऱ्यांनाही (उदा. फरनेस) नंतर हा त्रास होऊ शकतो.
’‘मॅक्युलर डीजनरेशन’ला प्रतिबंध करण्यासाठी चांगल्या दर्जाचा अतिनील किरणांपासून संरक्षण करणारा गॉगल व डोळ्यांवर सावली येईल अशी टोपी वापरणे चांगले.

डोळ्यांवर येणारा ताण हलका करण्यासाठी काही टिप्स-
’सातत्याने संगणक व मोबाईलवर काम करावे लागल्यास कमी वेळाने एक छोटासा का होईना पण ‘ब्रेक’ घ्या. दर १५ मिनिटांनी अगदी अध्र्या मिनिटाची विश्रांतीही पुरेशी.
’थोडय़ा- थोडय़ा वेळाने डोळ्यांची उघडझाप करा.
’सतत जवळचे पाहात राहिल्यावर डोळ्यांचे स्नायू थकतात, त्यामुळे तो ताण घालवण्यासाठी अधूनमधून लांबचेही पाहणे गरजेचे.
’आंघोळ करताना किंवा तोंड धुताना डोळे हलक्या हाताने पाण्याने धुवा. जोरजोरात डोळे चोळू नका.
’झोप पुरेशी घेणे गरजेचे.
’विशेषत: मोटारीत बसल्यावर सतत चेहऱ्यावर वातानुकूलन यंत्रणेचा झोत येतो. सतत डोळ्यांवर एसी किंवा पंख्याचा वारा टाळा.
 डॉ. रमेश मूर्ती, नेत्रतज्ज्ञ – drrameshmurthy@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2015 6:20 am

Web Title: eye care tips
टॅग : Health It
Next Stories
1 मनोमनी : स्वभावाला औषध
2 मागोवा मधुमेहाचा : मधुमेह नि गर्भावस्था!
3 महिलांनो हृदय सांभाळा!
Just Now!
X