मधुमेहात डोळ्यांचे प्रश्न उभे राहतात का?
एकदा मधुमेह झाला की शरीरात अनेक समस्या सुरू होतात. त्यात डोळे, मूत्रिपड आणि मज्जारज्जू यांचं नुकसान सगळ्यात आधी होतं. रक्तातली साखर नियंत्रित करण्यात इंश्युलीनचा मोठा वाट असतो. रक्तात असलेली ग्लुकोज इंश्युलीनमुळं पेशीत प्रवेश करू शकते. इंश्युलीनचं प्रमाण कमी झालं किंवा बनलेलं इंश्युलीन कुचकामी ठरू लागलं तर पेशींना ग्लुकोज मिळणं बंद होतं. शरीरातल्या काही पेशी याला अपवाद आहेत. इंश्युलीन असलं किंवा नसलं तरी त्यांच्या आत ग्लुकोज पोहोचायला काहीच अडचण नसते. परंतु मधुमेह होतो तेव्हा हा फायदा अचानक तोटय़ात परिवíतत होतो. ग्लुकोज विनासायास प्रवेश करू शकत असल्यानं जेव्हढी ग्लुकोज रक्तात असते तेव्हढीच पेशीत उतरते. रक्तात ती ३०० असेल तर पेशीतही ३०० होते. ग्लुकोजच्या या भाऊगर्दी मुळं पेशीचं नुकसान होऊ लागतं. अशा इंश्युलीनची गरज नसलेल्या पेशींमध्ये डोळ्यांच्या, मज्जारज्जूंच्या आणि मूत्रिपडाच्या पेशी प्रमुख आहेत. मधुमेहात यांच्यावर पहिला घाला येतो तो त्यामुळेच.

डोळ्यांमध्ये काय समस्या निर्माण होतात?
डोळ्यात, मज्जारज्जूत किंवा मूत्रिपडात जे दोष निर्माण होतात त्यांना मायक्रो व्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स म्हणतात. छोटय़ा रक्तवाहिन्याचा हा प्रश्न आहे. डोळ्यांपुरतं बोलायचं झालं तर तिथल्या अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्यांची तोंडं बंद होतात. त्यामुळं पुढचा रक्त पुरवठा बंद होतो आणि त्या त्या भागातल्या पेशी मृत होतात. मृत झालेल्या पेशींमधून स्रवणारे काही रासायनिक रेणू मेंदूला संदेश पोचवतात. मेंदू मग त्या भागाचा रक्तपुरवठा वाढवण्याचा संदेश देतो. शरीर घाईघाईत रक्तपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी नव्या रक्तवाहिन्या बनवल्या जातात.
कुठलीही गोष्ट घाईत बनली की तिची गुणवत्ता कमी होणार हे ठरलेलं असतं. नव्या रक्तवाहिन्या सुमार दर्जाच्या बनतात. नेहमीच्या रक्तवाहिन्यांच्या नळकांडय़ात एकपेशीय स्नायूंचं आवरण असतं. गरजेप्रमाणं आकुंचन-प्रसरण करून त्या त्या ठिकाणाचा रक्तपुरवठा कमी जास्त करणं त्यामुळं शक्य होतं. शिवाय या स्नायूंचा आधार असल्यानं रक्तवाहिन्यांना मजबुती मिळते. घाईघाईत तयार झालेल्या रक्तवाहिन्यांना हा स्नायूंचा आधार नसतो. त्यामुळे जरासा रक्तदाब वाढला तरी त्यातून रक्तस्राव होण्याची भीती निर्माण होते. अशा कमअस्सल रक्तवाहिन्यांमध्ये छोटे छोटे फुगीर भाग दिसतात ज्यांना आम्ही अन्युरीझम म्हणतो. या फुगवटय़ातून केव्हाही रक्तस्राव होऊ शकतो. आपल्याला स्पष्ट दिसायला हवं असल्यास डोळ्यातलं पाणी स्फटिकासारखं नितळ हवं. रक्तस्रावात हेच पाणी गढूळ होतं. साहजिकच दृष्टी जाते. थोडक्यात सांगायचं तर मधुमेहात माणसाला आंधळं करायची क्षमता आहे.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

हा भयंकर प्रकार वेळीच ओळखायचा कसा?

लक्षणं दिसत नाहीत तोपर्यंत थांबलात तर फार उशीर होईल. नियमितपणे आपले डोळे तपासून घ्यायला हवेत. टाइप वन मधुमेहींनी निदानानंतर पाच वर्षांनी आणि टाइप टू मधुमेहींनी निदान झाल्याझाल्याच डोळे तपासून घ्यावेत. नुसता विजेरीचा प्रकाशझोत टाकून केलेली वरवरची तपासणी नको. डोळ्यात औषध टाकून बाहुली मोठी करून मागचा पडदा तपासायला हवा. पडद्याचा फोटो काढला तर सर्वोत्तम. याला फंडस फोटोग्राफी म्हणतात. त्यानंतर दरवर्षी असा तपास करत राहणं जरुरीचं असतं.

डोळा वाचवण्याची पावलं कोणती?
मधुमेहावर नियंत्रण हे पहिलं पाऊल. अर्थात एकदा डोळा खराब होऊ लागला की रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण योग्य मर्यादेत राखण्याइतकंच किंवा त्याहूनही अधिक महत्त्व रक्तदाब काबूत राखण्याला दिलं गेलं पाहिजे. डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांना फुगवटे आल्यानंतर दृष्टी वाचवण्याचा हा खरा राजमार्ग आहे. त्याचबरोबर वजन उचलण्याचा व्यायाम प्रकार करू नये. डोळ्यांना धक्का बसेल अशी कुठलीही हालचाल करू नये. त्याने अचानक पडदा फाटण्याची, रेटायनल डीटॅचमेंट होण्याची भीती असते.

डोळ्यात रक्तस्राव झाल्यावर काय करता येईल?
डोळ्यात लेसर किरणं सोडून जिथून रक्तस्राव होतोय ती रक्तवाहिनी जाळून टाकता येईल. रक्तवाहिन्यामधले फुगवटेदेखील याच मार्गानं कमी करता येतील. हा अघोरी प्रकार वाटत असला तरी याने अनेक जणांची दृष्टी आणखी खराब होण्यापासून वाचली आहे हे नक्की.