आठवडय़ातून दोनदा मासे सेवन केल्याने माणसाचे आयुष्य किमान दोन वर्षांनी वाढते असे एका अभ्यासात दिसून आले आहे.ज्या व्यक्तींच्या रक्तात ओमेगा तीन मेदाम्लांचे प्रमाण जास्त असते त्यांची मृत्यूची शक्यता २७ टक्क्य़ांनी कमी होते, तर हृदयविकाराने त्यांना मृत्यू येण्याची शक्यता ही ३५ टक्क्य़ांनी कमी होते. ही मेदाम्ले मासे व सागरी अन्नपदार्थात आढळून येतात. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ व युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन या दोन संस्थांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, थोडे जास्त वय असलेल्या ज्या प्रौढांमध्ये रक्तातील ओमेगा-३ मेदाम्लांचे प्रमाण अधिक होते त्यांचे आयुष्य हेच प्रमाण ज्यांच्यात कमी होते त्यांच्या तुलनेत २.२ वर्षांनी अधिक होते.या संशोधनाचे प्रमुख लेखक दारिश मोझाफॅरिन यांनी सांगितले की, हृदयाच्या आरोग्यात ओमेगा-३ मेदाम्लांच्या प्रमाणाचे बरेच महत्त्व असल्याचे आमच्या संशोधनात दिसून आले असून त्यामुळे आयुष्य वाढते. अमेरिकेतील ६५ व अधिक वयाच्या २७०० प्रौढ व्यक्तींच्या आरोग्याविषयक माहितीचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. उत्तर कॅरोलिना, कॅलिफोर्निया, मेरीलँड व पेनसिल्वानिया या भागातील व्यक्तींची माहिती यात तपासण्यात आली होती. डोकोसॅहेक्सोनाइक अ‍ॅसिड म्हणजे डीएचए या मेदाम्लामुळे हृदयविकाराची शक्यता ४० टक्क्य़ांनी कमी होते तसेच अऱ्हीथिमस म्हणजे हृदयाच्या अनियमित ठोक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ४५ टक्क्य़ांनी कमी होते. इकोसॅपेनटोनिक (इपीए) व डोकोसॅपेनटोनिक (डीपीए) मेदाम्लांमुळे कमी घातक असलेल्या हृदयविकारांची संख्या कमी होते. या तीनही मेदाम्लांचे पुरेसे प्रमाण रक्तात असेल तर मृत्यूची शक्यता २७ टक्क्य़ांनी कमी होते असेही दिसून आले आहे. हे संशोधन अ‍ॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.