प्रश्न- मी सत्तावीस वर्षांचा तरुण आहे. रीतसर संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन मी एका आयटी कंपनीत रुजू झालो. दोन- तीन वर्षे मी ती नोकरी कशीतरी केली. म्हणजे मला ते काम आवडत नव्हते किंवा माझी ते करण्याची क्षमता नव्हती असे नाही, पण रोज तेच- ते काम. कामात काहीच बदल होत नव्हता. नवे काही करायला मिळत नव्हते म्हणून मी ती नोकरी सोडली.

आता तीन महिन्यांपूर्वी मी दुसऱ्या कंपनीत रुजू झालो आहे.

कंपनी नवी असतानाचे सुरुवातीचे दिवस छान गेले. पण

आता या कामाचेही ‘रुटीन’ बनले आहे त्याच- त्या कामाचा कंटाळा येण्यात माझे काही चुकते आहे का? मला नेहमी

वाटते की रोज काहीतरी नवा अनुभव हाती लागावा, पण माझे मित्र म्हणतात की जगातले कोणतेही काम असो. ठराविक वेळ गेल्यावर सगळ्यांना रकाने भरतच दिवस काढावे लागतात. आठवडय़ाच्या रुटीनने मी विटून जातो आणि सुटीचा दिवस

झोपा काढण्यात घालवतो. इतर हजारो माणसांसारखे माझेही आयुष्य रुटिनमध्ये संपून जाणार या विचाराने कसेतरीच वाटू लागते.

उत्तर-  मित्रा, तू अगदीच अभिनंदनास पात्र असा मुलगा आहेस. कारण हल्ली बरेच जण फक्त पगार किती मिळतो, याच एका मुद्दय़ावर कुठे नोकरी करायची ते ठरवताना दिसतात. त्यामुळे नुसते रकाने भरण्यापलीकडे विचार करणे खूपच मोलाचे आहे. पण या विचारातही आपलं काही चुकत नाही ना, हे बघणं आवश्यक आहे.

जगातल्या बहुतेक मोठय़ा माणसांनी वेगवेगळ्या प्रकारांनी आयुष्यात कंटाळवाणी वर्षे घालवली आहेत. त्यामुळे नुसते कंटाळ्याला घाबरून चालणार नाही, हे पहिले सूत्र.  दुसरे म्हणजे असे किती व्यवसाय आहेत की जिथे रोज नित्य नवीन काही तरी घडवायचे असते?, हा तुझ्या मित्रांचा युक्तिवाद सुद्धा पूर्ण बरोबर आहे. कदाचित अगदी सर्वासाठी तो खरा नसेल. पण उदाहरणच घ्यायचे झाले तर सध्या रस्त्यावरुन चालणे किंवा वाहन चालवणे हा सगळ्यात जास्त उत्तेजक अन् ‘क्रिएटिव्ह’ काम म्हटले पाहिजे. सरळ सरळ सततचा ‘सस्पेन्स’ किंवा एकतर मरणाशी गाठ नाहीतर स्टिअरिंगपाठून उठून गजाआड जाऊन बसण्याची तयारी हवी. आहे की नाही थ्रिलिंग? किंवा एकदम डॉक्टर होऊन पाहावे? प्रत्येक रुग्ण नवीन. त्यातल्या गुंतागुंतीही नवीन. त्यातही मानसोपचारतज्ज्ञ झाले तर प्रत्येकाची परिस्थिती अगदीच नवीन, अन् प्रत्येकाला द्यायचा उपायही नवीन.

रुटिनमुळे विटून जायला होणं अगदीच सोसत राहायची गरज नाही, हेही नक्की. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात नवीन आव्हान निर्माण होण्याचं

हे युग आहे. तुलाही खुणावेल का तुझ्या क्षेत्रातलं आव्हान? कदाचित तुला त्यासाठी तुझ्या वरिष्ठांबरोबर वेगळा संवाद साधण्याची तयारी ठेवावी

लागेल.  किंवा सुटीच्या दिवशी झोप काढण्यापेक्षा नवं काहीतरी शिकत राहून किंवा इतर क्षेत्रातल्या नवीन काम करणाऱ्यांना मदत करुन स्वत:चं काहीतरी ‘स्टार्ट अप’सारखं सुरू करता येईल का?

नव्याची ही हौस किती काळ राहते हे पण पाहायला हवं. आता जे थ्रिलिंग वाटते, तेच नंतर जोखमीचा मामला होऊ शकतो. अगदी सैन्यदलातरी रोज नवी परिस्थिती फारतर युद्धात येते; एरवी रोजचा सरावच महत्वाचा. या सगळ्याचा हिशेब मांडून विचार करुन बघ. या महत्वाच्या पण अवघड विषयावर पुन्हा चर्चा करायला मलाही नक्कीच आवडेल.