जेवणात पालेभाजी आहे म्हटल्यावर अनेक जण ‘घासफूस’ नको, म्हणून नाक मुरडतात! पण हिरव्या पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असे अनेक गुण आहेत. आपल्या नेहमीच्या वापरातील काही हिरव्या पालेभाज्यांविषयी जाणून घेऊ या-
हिरव्या भाज्यांमध्ये तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण चांगले असते, तसेच ‘ए’, ‘सी’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे सर्वसाधारणपणे सर्व पालेभाज्यांमध्ये आढळतात. पालेभाज्यांमध्ये लोहदेखील चांगल्या प्रमाणात आहे. डाळ घातलेली, ताक घातलेली पातळ भाजी, पीठ पेरून भाजी, थालिपिठे, ठेपले, पराठे अशा पारंपरिक पाककृतींबरोबर, सॅलड, बर्गर, सूप अशा पदार्थामध्येही वापरता येतात. पालेभाज्या करताना काही साध्या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. पालेभाजीतील खराब झालेली वा सडलेली पाने काढण्याबरोबर पानांवर चिकटलेली माती आणि कीटकनाशके धुऊन जायला हवी. त्यासाठी निवडलेली पालेभाजी हळद आणि मीठ घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवावी आणि उपसून कोरडी करून शिजवावी. लेटय़ूसची पाने किंवा पालक अशा काही पालेभाज्या सोडल्या तर शक्यतो पालेभाज्या शिजवूनच खाल्लेल्या चांगल्या. शिजवल्याने त्यातील तंतुमय पदार्थ चांगले पचतात. मेथीसारख्या काही पालेभाज्या उष्ण गुणधर्माच्या आहेत. त्यामुळे खायची म्हणून नुसती पालेभाजी एके पालेभाजीच खाऊ नये, तर आहाराचा एक भाग म्हणून त्याकडे पाहावे. पालेभाज्यांच्या अतिरेकामुळे काहींना अ‍ॅलर्जी, त्वचेवर पुरळ येणे आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना रक्त पातळ होण्याची औषधे दिलेली असतात त्यांनी पालेभाज्या कमी खाव्यात.
पालक
पालकातून ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम आणि लोह पुष्कळ प्रमाणात मिळते. त्यात ल्युटिन आणि झियाझँथिन हे घटक, शिवाय सोडियम व पोटॅशियमचे प्रमाणही उत्तम आहे. कॅल्शियमचे शरीरात शोषण होण्यासाठी सी व बी ही जीवनसत्त्वेही पालकात असल्यामुळेच तो हाडे, दात व नखांच्या आरोग्यासाठी चांगला समजला जातो. वाढीच्या वयातील मुले, गरोदर स्त्रिया यांच्याबरोबर उतारवयातील स्त्री-पुरुषांनी आठवडय़ात दोनदा पालकाची भाजी जेवणात घेतली तर फायदा होतो. ल्युटिन व झियाझँथिन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
चवळई
चवळईच्या पानांमध्ये मूत्रल (डाययुरेटिक) गुणधर्म आहेत. अंगावर सूज येणे, शरीरात पाणी साठून राहणे (वॉटर रीटेन्शन) अशा तक्रारींच्या वेळी डॉक्टर अनेकदा डाययुरेटिक औषधे सुचवतात. सूज कमी होण्याच्या दृष्टीने चवळईची भाजीही चांगला परिणाम साधते. चवळईतही ‘बी’ व ‘सी’ जीवनसत्त्वे, लोह, तांबे असल्यामुळे अ‍ॅनिमियामध्येही चवळई चांगली. चवळईच्या पानांचा मिक्सरमध्ये रस तयार करून त्यात काळे मीठ व जिरेपूड घालून घेतला तरी चालू शकेल. सकाळी व संध्याकाळी चवळईच्या पानांचा पाव कप रस थोडे पाणी घालून घेतला तरी चालतो.

अळू
अळूमध्येही ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे आहेत. ही जीवनसत्त्वे शरीरासाठी अँटिऑक्सिडंट्स म्हणूनही उपयोगी पडतात. अन्नाच्या पचनाच्या वेळी शरीरात तयार होणारे हानीकारक पदार्थ शोषून घेण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स गरजेचे आहेत. अळूमधील झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत होते, तर ‘ए’ जीवनसत्त्वाचा त्वचा आणि डोळे यांच्यासाठी फायदा होतो.

how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

मेथी
मेथीमध्ये ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’ व ‘के’ या जीवनसत्त्वांच्या खजिन्यासह फॉलिक अ‍ॅसिडसुद्धा आहे. गरोदर स्त्रियांसाठी बाळाची वाढ चांगली व्हावी यासाठी, तसेच बाळाच्या आरोग्यात जन्मत: उद्भवू शकणारे दोष टाळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. मेथीत तंतुमय पदार्थ भरपूर असल्यामुळे मेथीची भाजी कमी खाऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांच्या आहारात मेथी चांगली. त्वचेवर होणारा बुरशीचा व जीवाणूसंसर्ग कमी करण्यासाठी मेथी चांगली असल्यामुळे ती पोटातून घेण्याबरोबरच मेथीच्या पानांचा रस त्वचेवर पुरळ आलेल्या किंवा खाज येणाऱ्या भागावर लावता येतो. मधुमेही लोकांमध्ये रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनेही मेथीची भाजी चांगली. मेथीतून काही प्रमाणात प्रथिनेही मिळतात.

कोथिंबीर व पुदिना
कोथिंबिरीत जीवाणू आणि बुरशीरोधक तसेच सूज कमी करणारेही गुणधर्म आहेत. जड जेवणाला आपण नेहमी वरून कोथिंबिरीची जोड देतो. त्यामुळे पचनसंस्थेला चालना मिळते आणि गॅसेस होत नाहीत. पुदिनाही पाचक आणि पोटात येणारे पेटके कमी करतो. ऋतुबदलाच्या वेळी सर्दी, खोकला, ताप असे किरकोळ आजार होतात तेव्हा चहात पुदिना टाकता येईल. तोंडाची दरुगधी निघून जाण्यासाठीही पुदिना खावा.
dr.sanjeevani@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)