News Flash

अस्वस्थता

चंदनच्या मनात आजकाल काल चाललंय तेच कळायचं नाही! लोकांमध्ये जायला, मित्रमैत्रीणींबरोबर गप्पागोष्टी-चेष्टामस्करीत

| November 9, 2013 01:03 am

चंदनच्या मनात आजकाल काल चाललंय तेच कळायचं नाही! लोकांमध्ये जायला, मित्रमैत्रीणींबरोबर गप्पागोष्टी-चेष्टामस्करीत रमायला, ऑफीसमधल्या सहकाऱ्यांशी बोलायला देखील त्याचे मन तयार होत नसे. दिवाळीच्या आनंददायी क्षणांमध्येही त्याने स्वत:ला घरातच कोंडून घेतले होते. आनंद, उत्साह, उल्हास यांनी ओथंबलेल्या या सणाचा आस्वाद घेणे तर दूरच पण आपल्या घरातल्यांबरोबरही त्याने दिवाळी साजरी केली नव्हती. लग्नाच्या उंबरठय़ावर गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या चंदनचं लग्न काही ना काही कारणांमुळे लांबलं होतं. काही वेळा मुलींनी त्याला नापसंत केलं, तर काही वेळा त्याने मुलींना नापसंत केलं होतं. चांगलं आर्थिक उत्पन्न असूनही लग्नाला झालेला विलंब हे त्याच्या अस्वस्थतेचं कारण आहे की काय, असं त्याच्या पालकांना वाटत होतं. पण आपण एकटे- एकटे का राहतो, आपल्या अशा वागण्यामागचं नक्की कारण काय, हे खुद्द चंदनपण सांगू शकत नव्हता. पण त्याच्या मनाला सततची अस्वस्थता मात्र होती.
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करणारी विशाखा. आयुष्यात तिला सगळं काही योग्य वेळेला मिळलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये आदराचं स्थान, घरात मिळून मिसळून वागणारे सासू-सासरे, दिर, जावा इतकंच नव्हे तर जीवाला जीव देणारा नवरा, दोन मुलं असं सगळं-सगळं व्यवस्थित होतं. तरीही विशाखाच्या मनाचा एक कोपरा नेहमी अस्वस्थ असे. तिच्या मनाची घालमेल तिला दिवसेंदिवस सतावत होती. याचा त्रास तिच्यापेक्षा तिच्या आजूबाजूच्या मंडळींना जास्त होत होता. विशाखावर आईसारखे प्रेम करणाऱ्या तिच्या सासूने तिच्या स्वभावातील बदल हेरला होता. बायकोच्या अस्वस्थतेचे कारण शोधता न आल्यामुळे तिचा नवरा देखील हतबल झाला होता. विशाखाला स्वत:लाही आपल्या अस्वस्थतेचं कारण सापडत नव्हतं, तिथे तिचा नवरा काय करू शकणार होता!
हरीष लहानपणापासून मित्रांमध्ये जरा जास्तच हुशार. आई-बाबांना देखील अभिमान वाटावा असा. परदेशात जायचं, तिथेच स्थायिक व्हायचं हे त्याचं स्वप्न. अभ्यास, खेळ, ट्रेकिंग, वाचन, सिनेमा, नाटक आणि मित्रमैत्रिणींच्या सुखदु:खातही तेवढय़ात समरसपणे रमणारा होता. हळहळू वय वाढत गेलं. परदेशात स्थायिक व्हायचं त्याचं स्वप्न काही साकाराला नाही आलं, पण कामानिमित्त अनेक महिने करत-करत बरीच र्वष परदेशात राहण्याची त्याला संधी मिळाली. जशी-जशी र्वष सरत होती, तसतसा त्याच्या वागणुकीत पडणारा फरक इतरांना खटकू लागला होता. मित्रांसाठी पूर्वी जीवाचे रान करणारा हरीष त्यांच्यापासून शरीरानेच नाही, तर मनानेदेखील कोसो दूर गेला होता. सोशल नेटवर्कस्च्या जाळ्यातही तो असून नसल्यासारखाच झाला होता. स्वप्न भंगल्याची अस्वस्थता उराशी कवटाळून घेत, आपल्या अपयशाचे खापर त्याने त्याच्या मित्रांवरच फोडले होते.
लहान-मोठय़ा कारणांनी येणारी आणि क्षणिक काळ टिकणारी अस्वस्थता आपल्यापैकी अनेकजण अनुभवत असतात. सकाळी प्रसन्न मूडमध्ये ऑफीसला गेल्यानंतर बॉसने किरकोळ कारणावरून काही सुनावले तर येणारी अस्वस्थता समजता येऊ शकते, पण दीर्घ काळ टिकणारी अस्वस्थता ही चिंतेमधून आलेली असते. लहान-मोठय़ा कारणांनी येणारी अस्वस्थता बरोबर घेऊन दिवस कंठत राहणे म्हणजे मानसिक आजाराला निमंत्रण देण्यासारखेच आहे. नको असलेल्या व्यक्तीचा फोन आल्यावर येणारी अस्वस्थता, नको त्या वेळी नको त्या मित्राचे आगमन झाल्यानंतर येणारी अस्वस्थता, हव्या त्या क्षणाचे नियोजन केल्यानंतर ते फसले तर येणारी अस्वस्थता, अपेक्षित यश पदरी न पडल्यामुळे येणारी अस्वस्थता.. अस्वस्थतेची एक ना अनेक कारणं! एखाद्याला एखादी घटना, प्रसंग अस्वस्थ करील तर तेवढय़ाच तीव्रतेने दुसरी व्यक्ती त्या प्रसंगाने अस्वस्थ होईलच असे नाही. पण अस्वस्थता रोजचीच झाली तर मात्र काळजी घेण्याची गरज आहे, हे नक्की!
यात अस्वस्थतेचे कारण शोधण्याचा प्रयत्न महत्वाचा. घडणाऱ्या घटनांचा, आपल्या आयुष्यात होणाऱ्या बदलांचा शांतपणे विचार करून या कारणाच्या जवळ पोहोचता येईल. आपल्या जवळची, हक्काची माणसं, जीवलग मित्रमैत्रिणींशी त्याबद्दल मोकळेपणे बोलता येईल. तरीही अस्वस्थतेचे कारण सापडले नाहीच, तर समुपदेशक ते शोधायला मदत करू शकतील. शांत मनाने जगण्यासाठी समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात काहीच कमीपणा नाही, हो ना!  
ल्ल श्रीराम ओक
चिंतारोगाचे रुपांतर म्हणजे अस्वस्थता. चिंता ही जशी अस्वस्थतेमागचे कारण असते तसेच इतर अनेक कारणांमुळे अस्वस्थता येऊ शकते. एखाद्या व्यसनामुळे व्यक्तीला ठराविक वेळी अस्वस्थ वाटू लागते. अगदी चहा पिण्याची वेळ चुकण्यापासून बराच वेळ धूम्रपानासारखे व्यसन करायला न मिळणे ही देखील एखाद्याच्या अस्वस्थतेची कारणे असू शकतात. ‘एखाद्या प्राण्याची भीती वाटते,’ असा नुसता उल्लेख जरी आला तरी सापाची आत्यंतिक भीती वाटणाऱ्या व्यक्तीच्या मनचक्षूंसमोर सापाचे रुप उभे राहते आणि तो विलक्षण अस्वस्थ होतो. अस्वस्थतेमागचे कारण अनेकदा दाखवताही येत नाहीत आणि अनेकदा त्याचे काही ठराविक रुपही दिसत नाही. बस उशीरा आली, घरातून बाहेर पडायला उशीर झाला किंवा अगदी ट्रॅफिकमुळे एखाद्या ठिकाणी उशीर होत असेल, तरी काही काळासाठी अस्वस्थता येऊ शकते, पण दुसऱ्या दिवशीही त्याच प्रकारे आपल्याला उशीर होईल, अशा सततच्या चिंतेतून येणारी अस्वस्थता मानसिक आजाराचे कारण ठरु शकते. अशा अस्वस्थतेमुळे मनात गोंधळ निर्माण होतो आणि कुठलीही गोष्ट करण्याआधी ‘सारे काही नीट होईल की नाही’, अशी काळजी वाटत राहते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2013 1:03 am

Web Title: health discomfort
Next Stories
1 केसांसाठी योग्य आहार
2 आरोग्य परिचय
3 दिवाळी आणि आयुर्वेद
Just Now!
X