04 July 2020

News Flash

वैद्यकीय कारणांशिवायच शारीरिक तक्रारी!

अलीकडे आईच्या प्रकृतीच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. गुडघे दुखतात, सांधे दुखतात, अर्धशिशी त्रास देते, अ‍ॅसिडिटीपण सारखी होते.

प्रश्न- माझ्या आईचे वय ५२ वष्रे आहे. मला वडील नाहीत. मी उच्चशिक्षण घेतो आणि बहिणीचे काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले. अलीकडे आईच्या प्रकृतीच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. गुडघे दुखतात, सांधे दुखतात, अर्धशिशी त्रास देते, अ‍ॅसिडिटीपण सारखी होते. अनेक डॉक्टर झाले, विविध तपासण्या झाल्या, घरगुती पथ्ये पाळून झाली, परंतु गुण येत नाही. मी स्वत: देखील तिच्याबरोबर दोनदा डॉक्टरांकडे गेलोय. ती डॉक्टरांपुढे समस्यांचा लांबलचक पाढा वाचते आणि डॉक्टर तिला एकच सांगतात की, तुम्हाला वैद्यकीयदृष्टय़ा काहीही झालेले नाही! रोज घरी गेलो की ती कोणतेतरी दुखणे घेऊन बसलेली दिसतेच. तिचा आजार शरीरात नव्हे, मनात असावा का, असे मला वाटते. यावर काही उपाय असतो का?
उत्तर- तुम्ही मांडलेला प्रश्न खूप मोलाचा आणि तितकाच गहन आहे. शारीरिक की मानसिक, अशा वरवर सोप्या वाटणाऱ्या, पण काहीशा अनुत्तरित प्रश्नानं शास्त्राच्या प्रगतीचा आलेख कुठवर पोहोचलाय, अन् कुठल्या दिशेनं जातोय, हेच ठळकपणे समोर येतं.
तुम्ही सांगताय ती सगळी परिस्थिती मला माहीत आहे, चांगलीच माहितीय! अगदी गेल्या हजारभर वर्षांच्या वैद्यकाच्या इतिहासाचा अभ्यास केला तरी असं दिसून आलंय की अशा तक्रारी रूपं बदलून जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेहमी दिसून येत असतात. एडवर्ड शॉर्टर या इतिहासाच्या प्रोफेसर महाशयांनी हा अगदी जटिल अभ्यास मन लावून केला, अन् मौलिक निरीक्षणं नोंदवून ठेवली. तसंच, आर्थर क्लेइन्मन नावाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर अन् संस्कृतीच्या अभ्यासकानं असंच एक पुस्तक लिहून या प्रकारच्या दुखण्यांच्या मुळाशी असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक कारणपरंपरा अन् प्रक्रियांचा ऊहापोह केला.

या प्रकारच्या तक्रारींबाबत काही महत्त्वाचे सर्वसाधारण मुद्दे असे-
० शरीर आणि मन एकत्रच राहतात; एकाचा दुसऱ्यावर परिणाम सतत होतच असतो. फक्त त्या दोघांमधले संवाद हे कुजबुजीच्या स्वरूपात असतात जणू काय! अजून ती भाषा अन् कुजबूज आपण पूर्णपणे उलगडू शकलो नाही आहोत, हे सत्य आहे.
० शारीरिक नाही, म्हणजे मानसिकच आहे, असं नाही.
० मानसिक असेल (बरोबरीनं चिंता, ताण, निराशा असतातच!) तरी काल्पनिक नव्हे.
० समाजातलं वातावरण, चालीरीती, पूर्वग्रह, दृष्टिकोण अन् माणसाकडून असलेल्या अपेक्षा यांचा मोठा वाटा माणसाच्या जगण्या-मरण्यात, अन् दुखणी होण्यात, उपचार घेण्यात, बरं होण्यात असतोच असतो. खरं म्हणजे उदाहरणाची गरज नाही, पण स्त्री-भ्रूणहत्यांविषयी आपण जाणतोच. समाजातल्या अन् सांस्कृतिक बदलांचं प्रत्यक्ष प्रतििबबच आपण पाहतो आहोत. आपण संस्कृतीतच जन्म घेतो, वाढतो, जगतो अन मरतो.
० विधवांचे आयुष्य पूर्वीइतके दुर्धर नसले, तरी त्यातली सगळी दु:खं आपल्याला समजतात, असा दावा कुणी करू नये.
० स्वाभिमान टिकवून नातीसुद्धा टिकवायची, ही तारेवरची कसरत कुटुंबकेंद्रित संस्कृतीतल्या भारतीयांना नवी नसली, तरी वेगानं बदलणाऱ्या काळात ती अधिकच गुंतागुंतीची झालीय. ही यशस्वी कसरत करताना निरनिराळी शारीरिक लक्षणे निर्माण होऊ शकतात.
० ‘नॉन-रीवॉर्ड इझ इक्विव्हॅलंट टू पनिशमेंट, अ‍ॅण्ड नॉन-पनिशमेंट इझ इक्वव्हॅलंट टू रीवॉर्ड.’

आता आणखी थोडा विचार करू या
० ‘‘पुढं कसं होईल, अन् काय होईल’’, ‘‘मी एकटी कशी तोंड देऊ’’, अन् ‘‘कोण मदत करील आयत्या वेळी’’ अशा अर्थाचे प्रश्न ‘‘ह्य़ा, त्यात काय? उगाच काळजी करू नकोस’’ अशा शब्दांनी उडवून लावू नयेत.
० वडिलांचे अन् आईचे नाते कसे होते? त्यांना जाऊन किती दिवस झाले? त्याविषयी आई किंवा इतर कुणी हे कुणाला जबाबदार धरतात? त्यानंतर कुठल्या महत्त्वाच्या घटना घडल्या? आईची प्रतिक्रिया काय असते अशा वेळी? बहिणीचं लग्न जमवताना तुमची सर्वाची खूप दमछाक झाली का? प्रत्यक्ष लग्नसमारंभात किंवा नंतर बहिणीला काही त्रास झाला का? आईला? कुठे कुणी उणे दाखवलं का? कर्ज वगरे खूप आहे का? तुम्ही शिक्षणासाठी बाहेर असताना आईला एकाकी वाटतं का? किंवा बहीण दूर गेल्यानं?
० तुम्ही उच्चशिक्षण घेत असताना आपल्या मूळ संस्कारांपासून आपण खूप दूर गेलोय, असं तुम्हाला वाटतं का? किंवा आईला तशी काळजी वाटत असेल का?
० आईच्या दुखण्यानं तुमच्यावर खूप दडपण आलंय का?
० किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन ती नाटक करतेय, अशी शंका तुम्हाला येते का?
० आईच्या चष्म्यातून पाहिलं तर बाबांचं जाणं, मुलीचं लग्न होऊन दुरावणं, अन् मुलगाही उच्चशिक्षण घेऊन (यथावकाश लग्न करून) दुरावणार, अशी रास्त भीती अन् अनिश्चितता तिला सतावत असू शकते. कदाचित बाबांच्या पाठीमागे संसार चालवताना ज्यांच्यात जीव गुंतवून स्वत:?चं आयुष्यच त्यांच्यातून जगत जायची सवय लागू शकते. अन् मग आयत्या वेळी हे जीवनाधार काढून घेतले गेले, असं जर जाणवलं, तर शरीरातली प्रत्येक संवेदना ही आता आपला इथला कार्यभाग आटोपला, अशी प्रयोग संपल्याची घंटाच वाटू शकते.
० म्हणून आईला तिच्या आयुष्यातली अर्थपूर्णता अनुभवाला येईल, नात्यांचे दोर पक्के आहेत असा दिलासा वाटेल अशी कौटुंबिक, सामाजिक अन् सांस्कृतिक चौकट शिल्लक आहे, अशा अनुभवाच्या दिशेने आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे.
paralikarv2010@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2015 7:04 am

Web Title: health problems
Next Stories
1 हवाहवासा सुकामेवा!
2 भित्रेपणाचे आजार
3 मधुमेहातील संसर्ग
Just Now!
X