जी लहान मुले सतत स्मार्टफोनशी खेळतात, त्यांच्यात मेंदूच्या विकासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नवीन अभ्यासानुसार दोन वर्षे ते १० वर्षे वयोगटातील मुलांपैकी २५ टक्के मुलांचे आरोग्य स्मार्टफोन वापरल्याने धोक्यात आहे, असे ‘सीबीएस न्यूज’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अनेक आई-वडील शिक्षणाचे साधन म्हणून लहान मुलांच्या हाती स्मार्टफोन देतात. पण स्मार्टफोनचे तंत्रज्ञान वापरणे या लहान मुलांसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे त्यांच्या उर्वरित आयुष्यात हानिकारक ठरेल असे अडथळे मेंदूच्या विकासात येतात. बालपणापासून मेंदूचा विकास होत असतो तो व्यवस्थित झाला नाही, तर मुलांना सामाजिक, भाषिक व आकलन कौशल्ये आत्मसात करणे कठीण जाते. मनोविकारतज्ज्ञ श्रीमती गेल साल्झ यांनी ‘सीबीएस धिस मॉर्निग’ या कार्यक्रमात सांगितले की, मुलांनी स्मार्टफोन वापरल्यास त्यांच्या मेंदूची जी हानी होते ती फार गंभीर स्वरूपाची असते. जर तुम्ही स्मार्टफोनसारखे यंत्र एवढय़ा लहान वयात मुलांना दिले, तर त्यांची क्रियाशीलता व कल्पकताही संपते. स्वतंत्र विचार ते करू शकत नाहीत.  मुलाला कंटाळा येऊ नये असे वाटते असते त्यामुळे तुम्ही त्यांना मोबाइल देण्याच्या मोहात पडता पण तसे होता कामा नये.

फुफ्फुसाच्या कर्करोगावर कच्चा लसूण गुणकारी
फुफ्फुसाच्या कर्करोगावर कच्चा लसूण गुणकारी असतो असे अभ्यासात दिसून आले आहे. आठवडय़ातून दोनदा जरी कच्चा लसूण सेवन केला तरी फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते, धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्येही ती कमी होते, पण याचा अर्थ धूम्रपान करणे हानिकारक नसते असे अजिबात नाही. चिनी संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की, ज्या लोकांच्या आहारात लसणाचा समावेश होता त्यांच्यात फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता ४४ टक्क्य़ांनी कमी झाली. विशेष करून धूम्रपान करणाऱ्यांना या कर्करोगाची शक्यता अधिक असते, त्यांच्यातही या कर्करोगाची शक्यता ३० टक्क्य़ांनी कमी होते. यापूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, लसणामुळे आतडय़ाचा कर्करोग दूर ठेवला जातो. साऊथ ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतील संशोधनानुसार त्यामुळे आतडय़ाशी संबंधित कर्करोगाची जोखीम एक तृतीयांशाने कमी होते. चीनच्या जिंगसू प्रादेशिक केंद्रातील संशोधकांनी पुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या १४२४ रुग्णांची तुलना ४५०० सुदृढ तरुणांशी केली असता त्यांना असे दिसले की, जे लोक आठवडय़ाला दोनदा तरी कच्चा लसूण सेवन करीत होते त्यांच्यात ते धूम्रपान करीत असले तरीही या कर्करोगाचे प्रमाण कमी होते. लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे रसायन असते त्यामुळे हा चांगला परिणाम दिसून येतो पण हे रसायन लवंगेतही असते लवंग जर कुटली तर त्यातूनही अ‍ॅलिसिन निघते. ते अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते, त्यामुळे मानवी शरीरातील पेशीत असणाऱ्या मुक्तकणांना अटकाव होतो. शिजवलेल्या लसणाचा असाच परिणाम होतो.

स्तनपान देणाऱ्या मातांना अल्झायमरचा धोका कमी
ज्या माता त्यांच्या नवजात बालकांना स्तनपान देतात त्यांना स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमरचा धोका कमी असतो असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. केंब्रिज विद्यापीठात हे संशोधन झाले असून त्यात ब्रिटनमधील ८१ महिला गटांविषयीची माहिती वापरण्यात आली आहे. स्मृतिभ्रंशाचा धोका व स्तनपान यांचा संबंध असल्याचे दिसून आले आहे फक्त ही बाब ज्या स्त्रियांना विसराळूपणा किंवा स्मृतिभ्रंशाचा इतिहासच आहे त्यांच्यात ही जोखीम स्तनपानाने कमी होते किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. केंब्रिज विद्यापीठातील जीवशास्त्रीय मानववंशशास्त्राच्या प्रा. डॉ. मॉली फॉक्स यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून  त्यात त्यांना कालरे बेरझुनी व लेस्ली नॅप यांनी मदत केली. त्यात ७० ते १०० वयोगटातील महिलांच्या ८१ गटांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासातून असे निष्पन्न झाले की, स्तनपान व स्मृतिभ्रंश यांचा संबंध आहे. स्तनपान देणाऱ्या स्त्रियांपेक्षा स्तनपान न दिलेल्या स्त्रियांमध्ये स्मृतिभ्रंशाची जोखीम कमी दिसली. स्तनपानाने स्त्रियांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण कमी करतात. प्रत्यक्षात गर्भवती असताना त्यांच्यात हे प्रमाण वाढलेले असते पण स्तनपान सुरू केल्यानंतर त्याची पातळी कमी करून भरपाई केली जाते. प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकामुळे मेंदूतील ऑस्ट्रोजेन संवेदक असंवेदनशील होतात परिणामी त्याचे प्रमाण कमी होताच ते पुन्हा संवेदनशील बनतात, ऑस्ट्रोजेन हे संप्रेरक मेंदूचे अल्झायमरपासून संरक्षण करते त्यामुळे त्याचे संवेदक स्तनपानाच्या काळात क्रियाशील होतात त्याचा या स्त्रियांना फायदा होतो असे दिसून आले आहे.

पुरस्थ ग्रंथीच्या कर्करोगावर मात करणारे संयुग
प्रॉस्टेट म्हणजे पुरस्थ ग्रंथीच्या कर्करोगावर मात करणारे संयुग वैज्ञानिकांना सापडले आहे. स्टॅनफर्ड-बर्नहॅम मेडिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या वैज्ञानिकांनी एसएमआयपी ००४ या संयुगाच्या कर्करोगविरोधी क्रियेमागचे रहस्य उलगडले आहे. विशिष्ट रसायनाला प्रतिबंध करणे किंवा टेस्टेस्टेरॉन हे पुरुषी संप्रेरक तयार करणारे वृष्ण शस्त्रक्रि येने काढून टाकणे हे पर्याय या कर्करोगात असतात. ही उपाययोजना यशस्वी ठरते कारण पुरस्थ ग्रंथीच्या कर्करोग पेशींची वाढ ही टेस्टेस्टेरोन या संप्रेरकामुळे होत असते. या रसायनाचा प्रवाह थांबवला तरीही कर्करोग होतो अशीही स्थिती येते कारण कालांतराने या पेशी टेस्टेस्टेरॉन बंद करूनही त्या जिवंत राहतात. त्यानंतर मग टॅक्सॉल या औषधाचा वापर करणे हा पर्याय उरतो. तरीही त्यामुळे आयुष्य दोन महिने वाढू शकते असे नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटचे डॉ. डायटर वूल्फ यांनी सांगितले. एसएमआयपी ००४ हे कर्करोगविरोधी गुण असलेले संयुग असून ते पुरस्थ ग्रंथीच्या कर्करोगग्रस्त पेशींना मारते, आतापर्यंत ते कसे काम करते हे माहीत नव्हते. एसएमआयपी ००४ हे संयुग कर्करोग पेशींच्या कार्यात हस्तक्षेप करते त्यात पेशींच्या मायटोकाँड्रिया रचनेत बदल घडतात. मायटोकाँड्रिया हा पेशीतील असा भाग असतो जो या कर्करोगकारक पेशींना ऊर्जा देत असतो.