पावसाळ्यातल्या ओलसर, थंड आणि काहीच काम करू नये असं वाटणाऱ्या वातावरणात आपल्याला काय हवंहवंसं वाटतं?.. बहुतेकांच्या मनात गरमागरम भजी आणि फक्कड चहाचाच बेत आला असेल! पण भजी, वडे कितीही आवडले तरी ते शेवटी तेलकट पदार्थ. असे तळलेले पदार्थ भरपूर खाल्ल्यावर आपल्याला आणखी आळस येतो हे माहिती आहे का..? मग याच्यावर उपाय काय, भज्यांची जागा दुसरं कुठलं ‘हेल्दी स्नॅक्स’ भरून काढू शकतं, ते जाणून घेऊ या.
पावसाळ्यात मधल्या वेळी गरमागरम ‘कम्फर्ट फूड’ खाण्याची मजा काही औरच. पण कम्फर्ट फूड म्हणजे तळलेले, भरपूर चरबी असलेले अन्न ही व्याख्या विसरून जा. मधल्या वेळच्या खाण्यासाठी आरोग्याला बरे असे काही पदार्थ निश्चितच आहेत. हे पदार्थ पावसाळ्यात काहीतरी गरम आणि चटकदार खाल्ल्याचा अनुभव देतात, पण ते तेलकट नाहीत. त्यातले काही इथे सुचवत आहोत.
वाफवलेले डंपलिंग्ज
उकडीचे मोदक करतो तशी तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्या. या उकडीच्या पारीत भरपूर भाज्या, डाळी, चिकन (तिन्ही वाफवलेले)अशा पदार्थाचे सारण भरता येईल. सारणातील तिखट-मीठही आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येईल. मोदकासारखा आकार द्यायचा कंटाळा आला तर करंजीचा किंवा साधा पाकिटाचा आकार देऊन डंपलिंग्ज वाफवून घ्यावेत. चटकदार चटणीबरोबर खाण्यासाठी तळलेल्या भज्यांपेक्षा कधीतरी हे वाफवलेले डंपलिंग्ज करून पाहा.
मका घातलेला चपाती पिझ्झा
स्वीट कॉर्नच्या उकडलेल्या दाण्यांमध्ये ढोबळी मिरची, फरसबी, गाजर, मटार, उकडलेले राजम्याचे दाणे अशा आवडतील त्या भाज्या घालून पिझ्झ्याचे टॉपिंग तयार करा. आवडत असल्यास टॉपिंगमध्ये थोडे चिकनसुद्धा वापरता येईल. चपातीवर हे सारण पसरवून वरून थोडेसेच चीझ किसून हा चपाती पिझ्झा बेक करा किंवा तव्यावर भाजा.
याच प्रकारे आपण हव्या त्या भाज्या घालून भाजलेले सँडविचसुद्धा करू शकतो. सँडविचसाठी नॉनस्टिक तवा किंवा हातात धरायचा नॉनस्टिक गॅस सँडविच टोस्टर वापरला तर सँडविच भाजण्यासाठी लोणीही लावण्याची गरज भासणार नाही.
गोड पॅनकेक
गव्हाचे पीठ, अंडी, दूध आणि थोडीशी दालचिनी पावडर घालून पॅनकेकचे बॅटर बनवा आणि नॉनस्टिक तव्यावर लहान उत्तप्प्यासारखी धिरडी घाला. तव्यावरून ताटलीत काढण्यापूर्वी या पॅनकेकवर केळ्याचे किंवा सफरचंदाचे काप किंवा खजुराचे काप घालता येतील. थोडासा मध घालून किंवा थोडे लोणी लावून ही गोडसर धिरडी छान ‘कम्फर्ट फूड’चा अनुभव देतात. अशाच प्रकारे बेसन, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, सोयाबिनचे पीठ, नाचणीचे पीठ अशी वेगवेगळी पिठे एकत्र करून त्यात गाजर, कोबी, कांदा, पालक, मेथी आणि चवीला आले अशा भाज्या चिरून घालून बॅटर तयार करता येईल. चवीनुसार तिखटमीठ घातलेल्या या पिठाची धिरडी नॉनस्टिक तव्यावर घाला.
सूप
भाज्यांचे गरमागरम सूप हा मधल्या वेळी पोट भरल्यासारखे वाटेल असा आणि तरीही तेलकट नसलेला पर्याय. सूपमध्ये आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालता येतात. टोमॅटो- कांदा- लसूण,  पालक- कांदा- टोमॅटो, बीट- टोमॅटो- दुधी भोपळा, मका- फरसबी- गाजर अशी काही ‘काम्बिनेशन्स’ सांगता येतील. सूपमध्ये आवडत असेल तर चिकनचे तुकडेही घाला. हे सूप मिक्सरमधून काढून किंवा भाज्यांचे तुकडे तसेच ठेवूनदेखील चांगले लागते. गव्हाचे पीठ थोडय़ा लोण्यावर भाजून त्यात दूध आणि पाणी घालून बनवलेला पातळ ‘व्हाइट सॉस’ सूपमध्ये घातल्यास ते आणखी चवदार लागेल.

भाज्यांची इडली
इडलीच्या पिठात आपल्याला आवडतील त्या भाज्या किसून किंवा बारीक चिरून घालाव्यात आणि त्यात जरासे ‘इनो’ घालून नेहमीसारखे इडलीपात्रात वाफवावे. या इडल्या गरमागरम नुसत्या खाता येतात. अशाच प्रकारे इडलीच्या पिठापासून भाज्या घातलेला तांदळाचा ढोकळादेखील करता येईल.
भाज्या आणि पनीर घातलेली पोळीची गुंडाळी- चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि किसलेले ताजे पनीर एकत्र करावे. त्यात मीठ आणि आपल्या आवडीचा मसाला घालून सारण तयार करावे. हे सारण चपातीच्या आत भरून पोळीची ही गुंडाळी तव्यावर थोडे लोणी लावून किंवा नुसती लोणी न लावता भाजावी. टोमॅटोच्या चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावे.
ratna.thar@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)