वातावरणात सतत होणारे बदल विषाणुंच्या वाढीसाठी पोषक असल्याने सध्या डोळ्यांची साथ आली आहे. डोळे लाल होणे, पाणी गळणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. डोळ्यांचा संसर्ग आलेल्यांपैकी काही जणांना ‘हेमोरॅजिक कंजक्टिवायटिस’ नावाचा अधिक तीव्र स्वरूपाचा डोळ्यांचा आजार होण्याचीही शक्यता असते. यात डोळ्यातील ‘कंजक्टिवा’ नावाच्या पातळ पडद्याखालील रक्तवाहिन्यांना संसर्ग होतो आणि त्यामुळे डोळ्यांतून रक्त वाहते. कंजक्टिवायटिस हा दोन ते चार दिवसात आपसूकच बरा होतो, परंतु जीवाणू संसर्गावर उपचार न झाल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. डोळ्यांची साथ हा तीव्र स्वरूपाचा संसर्गजन्य आजार असून, प्रतिबंधक उपाय करणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपचार आहे.
डोळे आल्यास काय करावे?
* शक्य तितक्या वेळा डोळ्यांवर स्वच्छ, सोसण्याइतपत गरम पाणी शिंपडावे. उकळून थंड केलेल्या कोमट पाण्याने डोळे धुवावेत
* डोळ्यांचा संसर्ग तीव्र स्वरूपाचा आहे, असे वाटल्यास तत्काळ नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
* शाळा किंवा कार्यालय अशा सार्वजनिक ठिकाणी वारंवार हात धुवावेत.  
* जंतूनाशक सोबत बाळगावे आणि त्याचा सतत उपयोग करावा.
* डोळ्यांच्या संसर्गाचा त्रास इतरांना होऊ नये यासाठी डोळे बरे होईपर्यंत घरी विश्रांती घ्यावी.
काय करू नये?
* डोळ्यांना अजिबात स्पर्श करू नये.
* रुग्णाने आपला टॉवेल, नॅपकिन अशा वस्तू इतरांना वापरू देऊ नये.
* डोळे येण्याचा त्रास किरकोळ असेल, तर त्यावर औषधांचीही गरज नाही. त्यामुळे स्वत:च्या मर्जीने कुठलेही औषध वापरू नये.
* एकाच डोळ्याला संसर्ग झाला असेल, तर त्यातील पाणी टिपण्यासाठी वेगळा रुमाल वापरावा.
* डोळे आलेले लोक काळ्या रंगाचा गॉगल वापरतात, परंतु केवळ त्यामुळे डोळे बरे होत नाहीत किंवा इतरांना होणारा संसर्गही टळत नाही.
डॉ. रागिणी पारेख, नेत्रतज्ज्ञ