रक्तदाब वाढणे हा एक प्रकारचा आजारच आहे आणि त्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. रक्तदाब वाढण्याची ‘प्रायमरी’ आणि ‘सेकंडरी’ अशी दोन कारणे आहेत.
रक्तवाहिन्यांमध्ये स्निग्ध पदार्थ
वाढल्यामुळे वाढणारा रक्तदाब
शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हातापायांच्या लहान- लहान रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात. त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो. याला ‘प्रायमरी हायपरटेन्शन’ म्हणतात. त्याची कारणे पुढील प्रमाणे-
’अनुवंशिकता
’ व्यायामाचा अभाव
’अतिताणाची, खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली
’आहारात ‘जंक फूड/फास्ट फूड’चे अतिरेकी प्रमाण
’स्थूलता
वर नमूद केलेल्या कारणांमुळे शरीरातील ‘लिपिड प्रोफाईल’- म्हणजेच कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड आणि लो- डेन्सिटी लायपोप्रोटिन (एलडीएल) हे तिन्ही घटक वाढतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये स्निग्ध पदार्थ जमा होऊन त्या बारीक होतात आणि परिणामी रक्तदाब वाढतो.

 रक्तदाब वाढण्याची इतर कारणे
कधीकधी चांगली जीवनशैली असलेल्या, नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनाही रक्तदाबाचा त्रास असलेला आढळतो. या मंडळींना रक्तदाब वाढण्याची अनुवंशिकताही नसते. अशा परिस्थितीत व्यक्तीचा रक्तदाब इतर कारणांमुळे वाढत असल्याचे दिसते. याला ‘सेकंडरी हायपरटेन्शन’ म्हणतात. ही इतर कारणे पुढीलप्रमाणे-
’मूत्रपिंडाकडे जाणाऱ्या शुद्ध रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होणे.
’मूत्रपिंडाचा आजार. उदा. मधुमेही व्यक्तींमध्ये मधुमेहाचा मूत्रपिंडावर परिणाम होतो. असे झाल्यास शरीरातून जितकी लघवी बाहेर टाकली जायला हवी, तितकी टाकली जात नाही. त्यामुळे शरीरात पाणी जमा होते. अशा रितीने शरीरात अधिक पाणी जमा झाले तर रक्तदाब वाढतो.
’मूत्रपिंडावर ‘अ‍ॅड्रेनल’ ग्रंथी असतात. त्यातून ‘कॅटेकोलामाईन्स’ नावाचा स्त्राव स्त्रवत असतो. एखाद्याला भीती वाटली की छातीत धडधड होते किंवा अचानक एखादी नवीन बातमी ऐकल्यानंतर एकदम तरतरी आल्यासारखे वाटते. या प्रतिक्रिया ‘अ‍ॅड्रेनल’ ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या स्त्रावामुळे निर्माण होत असतात. या अ‍ॅड्रेनल ग्रंथीला गाठ किंवा टय़ूमर झाला (फिओक्रोमोसायटोमा) तर त्या गाठीमुळे रक्तदाब वाढू शकतो.
’काहींना पाय/ गुडघे दुखतात म्हणून ‘स्टिरॉईड’ औषधे दिली जातात. अशी स्टिरॉईडस् खूप दिवस घ्यावी लागलेल्या व्यक्तींचा चेहरा फुगतो, शरीरात पाणी जमा होते आणि रक्तदाब वाढतो. याला वैद्यकीय भाषेत ‘कुशिंग सिंड्रोम’ म्हणतात.
’जन्मजातच काहींची महारोहिणी (एओर्टा) छातीच्या भागात अरुंद असते. अशा व्यक्तींमध्ये हातामधील रक्तदाब मोजल्यास अधिक दिसतो व पायांमधील रक्तदाब मोजल्यास तो कमी येतो. अशा स्थितीत शस्त्रक्रियेद्वारे किंवा अँजिओप्लास्टी करून महारोहिणी दुरूस्त करता येते.
’अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये ताणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो.
’‘मास्क्ड हायपरटेन्शन’: या प्रकारात रुग्ण डॉक्टरकडे उच्च रक्तदाबाची लक्षणे घेऊन जातो, पण डॉक्टरांनी रक्तदाब मोजल्यास तो वाढलेला दिसत नाही. अशा रुग्णांचा रक्तदाब नेमका केव्हा वाढतो हे विशिष्ट उपकरणाच्या साहाय्याने थोडय़ा- थोडय़ा वेळाने मोजून पाहता येते.
’‘व्हाईट कोट हायपरटेन्शन’: उच्च रक्तदाबाचा हा प्रकार जरा गंमतीशीर आहे. काही रुग्णांचा रक्तदाब फक्त डॉक्टरांकडे गेल्यावर ताणामुळे वाढलेला दिसतो. इतर वेळी तो वाढलेला नसतो. अशा रुग्णांशी बोलून त्याची भीती घालवून मग रक्तदाब मोजला तर तो व्यवस्थित असल्याचे आढळते.
तपासण्या कोणत्या?
रक्तदाब मोजल्यानंतर तो वाढल्याचे दिसून आल्यास रुग्णाच्या पुढील काही तपासण्या करणे गरजेचे असते.
’‘इसीजी’ (इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम)- यात हृदयाच्या कप्प्यांवर किती ताण पडला आहे ते कळते.
’हृदयाची सोनोग्राफी (एकोकार्डिओग्रॅम)- यात उच्च रक्तदाबाचा त्रास जुना आहे की नुकताच सुरू झाला आहे हे उघड होते. रक्तदाब वाढला की हृदयाच्या कार्याला अडथळा निर्माण होऊन हृदयाचा स्नायू सुजतो. अतिरिक्त काम पडल्यामुळे हृदयाचे कप्पे मोठे होतात. या गोष्टीही ‘एको’ तपासणीत दिसतात.
’डोळ्यांची तपासणी. रक्तदाबात कोणतेही बदल घडू लागले की डोळ्यांच्या रेटिनावरील रक्तवाहिन्यांमध्ये विशिष्ट बदल होतात. ते या तपासणीत पाहिले जातात.
’रक्ताची तपासणी : यात रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईलच्या पातळ्या आणि युरिक अ‍ॅसिडची पातळी तपासली जाते. थायरॉईड ग्रंथीचे कार्यही तपासले जाते. याशिवाय मूत्रपिंडाचे कार्य योग्य आहे का हे पाहण्यासाठीही रक्ताची तपासणी केली जाते.
’मूत्रपिंडाच्या तपासणीसाठी ओटीपोटाची सोनोग्राफी (अ‍ॅब्डॉमिनल अल्ट्रासाऊंड) करणेही गरजेचे असते.
   या तपासण्यांमध्ये व्यक्तीचा वाढलेला रक्तदाब ‘प्रायमरी’ कारणांमुळे आहे की ‘सेकंडरी’ कारणांमुळे आहे हे कळते.     
रक्तदाब वाढल्याचे
   कसे ओळखावे?
व्यक्तीचा रक्तदाब योग्य आहे का, हे ठरवण्यासाठी काही मानके आहेत. ‘वरचा रक्तदाब’ आणि ‘खालचा रक्तदाब’ याच्या ठराविक आकडय़ांपेक्षा रक्तदाब वाढलेला दिसून आला तर तो उच्च रक्तदाब समजला जातो. रक्तदाबाविषयी ‘जाँईंट नॅशनल कमिशन- ८’ने (जेएनसी- ८) सुचवलेली मानके पुढीलप्रमाणे आहेत.  
’ वय ६० वर्षांपेक्षा कमी- वरचा रक्तदाब १४० आणि खालचा रक्तदाब ९०
’वय ६० वर्षांपेक्षा अधिक-  वरचा रक्तदाब १५० आणि खालचा रक्तदाब ९०
    यापेक्षा रक्तदाब वाढलेला दिसला तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असे
म्हणता येते.
लक्षणे
उच्च रक्तदाब हा हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. अनेकदा त्याची स्पष्ट लक्षणे रुग्णाला जाणवतही नाहीत. अशा प्रकारे हळूहळू रक्तदाब वाढत गेला तरी एका मर्यादेपर्यंत शरीर त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण रक्तदाब सहन करण्याच्या मर्यादेबाहेर गेला तर लक्षणे जाणवू लागतात.
’चालल्यावर दम लागणे
’थोडेसे काम केल्यावर छातीत धडधड होते
’एकदम उठून उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटणे
’रक्तदाब खूपच वाढला तर काहींना पायावर आणि चेहऱ्या सूज येणे, यकृताला सूज येणे ही लक्षणे दिसायला लागतात. ही विशिष्ट लक्षणे ‘कार्डिअ‍ॅक फेल्युअर’ची चिन्हे दाखवणारी असतात.
’जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणणे हाच उच्च रक्तदाबावरील महत्वाचा उपचार ठरतो. यात ताण कमी करणे, चिडचिड कमी करणे, मानसिक स्थैर्य राहावे यासाठी विशेष प्रयत्न करणे याचा समावेश होतो. योगासने, प्राणायाम, हलका व्यायाम याचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो. एकदा तो नियंत्रणात आला की अशा व्यक्तींना पोहणे किंवा एरोबिक्स देखील करता येतात. व्यायामामुळे रक्तातील साखर आणि रक्तदाबही नियंत्रणात राहते.
’आहारात मीठ फार नको. चोवीस तासात एका व्यक्तीने २ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणेच इष्ट.
’ तेलकट- तुपकट पदार्थ, तिखट आणि मसालेदार पदार्थ एका मर्यादेपेक्षा अधिक खाऊ नयेत.
’ मधुमेही व्यक्तींना डॉक्टरांनी आहारातही बदल सुचवलेले असतात. हे बदल काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. ते रक्तदाब न वाढण्यासाठी फायदेशीर ठरते.
’ अति वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वजन फारच जास्त असेल तर प्रसंगी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसारख्या पर्यायांचाही डॉक्टरांच्या सल्ल्याने विचार करायला हरकत नाही. पण वाढलेले वजन पुन्हा नियंत्रणात आणण्याचा रक्तदाबावरही सकारात्मक परिणाम दिसतो.
’ उच्च रक्तदाबावर शरीरातील स्निग्ध पदार्थ कमी करणारी औषधे दिली जातात. रक्तवाहिन्या प्रसरण पावतील अशी औषधे किंवा शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकणारी औषधेही सुचवली जातात. तीव्र मधुमेह असेल तर तो नियंत्रणात आणण्यासाठीही औषधे दिली जातात. फार चिडचिड करणाऱ्या, मानसिकदृष्टय़ा अस्थिर असणाऱ्यांना ‘अँटीएन्झायटी’ प्रकारची औषधे दिली जातात.    
– डॉ. अविनाश इनामदार, हृदयविकारतज्ज्ञ
                             (शब्दांकन- संपदा सोवनी)

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स