‘इन-व्ह्रिटो फर्टीलाईझेशन’ (आयव्हीएफ) हे आधुनिक तंत्रज्ञान अपत्यहीन दांपत्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे. यात स्त्रीबिज आणि शुक्राणू यांपासून प्रयोगशाळेत गर्भ तयार केला जातो, आणि तो पुढील वाढीसाठी स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. आता या तंत्रज्ञानाला ‘एम्ब्रियोस्कोप’ या आणखी एका तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.
आयव्हीएफ प्रक्रियेच्या यशाचे प्रमाण ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये ३० ते ४० टक्के असते. एम्ब्रियोस्कोप प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवतो. यामुळे आयव्हीएफ प्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते.  एम्ब्रियोस्कोप हा एक ‘डिजिटल मायक्रोस्कोप इन्क्युबेटर’ आहे. हे उपकरण प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या गर्भाच्या वाढीवर लक्ष तर ठेवतेच पण या सगळ्या प्रकियेचे चित्रणही केले जाते. गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले तापमान, पोषक वातावरण या गोष्टी एम्ब्रियोस्कोपच्या आत तयार केल्या जातात. त्याच वेळी गर्भ तयार होतानाची छायाचित्रेही काढली जातात. यामुळे डॉक्टर्स इन व्हिट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या गर्भावर सतत नजर ठेवू शकतात. प्रयोगशाळेत तयार केलेल्या या गर्भाचे नंतर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते.
लीलावती रुग्णालयातील आयव्हीएफ युनिटचे प्रमुख डॉ. ऋषिकेश पै म्हणाले, ‘‘प्रयोगशाळेत तयार केला जाणारा गर्भ सामान्यत: दोन, तीन किंवा पाच दिवसानंतर स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो. प्रक्रियेच्या यशाची शक्यता वाढावी यासाठी एकाच वेळी दोन किंवा तीन गर्भ प्रत्यारोपित केले जाते. त्यामुळे जुळे, तिळे गर्भ राहण्याची शक्यता असते. प्रयोगशाळेत तयार
केल्या जाणाऱ्या गर्भापैकी केवळ उत्तम गर्भ निवडून त्याचे
स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करणे एम्ब्रियोस्कोपमुळे शक्य होत असल्यामुळे आयव्हीएफ प्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते,’’ गेल्या वर्षी लीलावती रुग्णालयात
हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरूवात झाली आहे.