अमेरिकेतील एक  बालिका नुकतीच एचआयव्हीमुक्त झाली आहे. तिला जन्मत:च एचआयव्ही संसर्ग होता पण उपचारानंतर ती खडखडीत बरी झाली आहे.  आता तिला भविष्यात एचआयव्हीविरोधी औषधांची गरज भासणार नाही. मिसिसिपी येथे जन्मलेल्या चिमुकलीला जन्मत:च एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. त्याची कुठलीही लक्षणे दिसत नव्हती. जन्मानंतरच्या चाचण्यात तिला एचआयव्ही लागण असल्याचे निष्पन्न होताच काही तासातच तिला औषधोपचार सुरू करण्यात आले, आता ती अडीच वर्षांची असून तिला एचआयव्हीची कुठलीही बाधा नाही.एचआयव्हीबाधितांसाठी हा मोठा आशेचा किरण असला तरी प्रौढांमध्ये औषधे इतक्या झटपट प्रतिसाद देत नाहीत. बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या विषाणूशास्त्रज्ञ डा. देबोरा पेरसॉद यांच्या मते बालकांमध्ये एचआयव्ही संसर्ग बरा करणे शक्य आहे हे सिद्ध झाले आहे. २००७ मध्ये टिमोथी रे ब्राऊन ही एचआयव्ही संसर्गातून बरी झालेली पहिली व्यक्ती होती.त्याचा हा संसर्ग रक्ताच्या कर्करोगावरील औषधांनी बरा झाला हे खरे असले तरी त्यावेळी एचआयव्ही संसर्गाला प्रतिरोध करणारे जनुकीय उत्परिवर्तन असलेल्या एका दात्याकडून घेतलेल्या मूलपेशींचे प्रत्यारोपणही त्या व्यक्तीत केले होते . आताच्या घडामोडीत सदर बालिकेवर एचआयव्ही विरोधी औषधांनी उपचार करण्यात आले होते. त्यात अँटीरेट्रोव्हायरल औषधांचे कॉकटेल वापरले होते.बालकांमध्ये एचआयव्ही उपचारांसाठी ते नेहमीच वापरले जाते. ती बालिका एचआयव्ही मुक्त झाली याचा अर्थ असा की, तिच्यातील एचआयव्ही विषाणू हे पेशींमध्ये लपण्याच्या आतच त्यांच्यावर या औषधांनी योग्यवेळात हल्ला चढवला व त्यामुळे ही औषधे लागू पडली. एचआयव्हीचा विषाणू पेशींमध्ये खोलवर जाऊन लपला की, मग तो कुठल्याच उपचारांना दाद देत नाही.  या मुलीचा जन्म एका ग्रामीण रूग्णालयात झाला व तिला एचआयव्हीची लागण असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले होते. तेथील बालरोग व एचआयव्ही तज्ञ डॉ. हॅना गे यांनी त्या बालिकेला एचआयव्ही विरोधातील तीन औषधांचे कॉकटेल जन्मानंतर अवघ्या तीस तासात सुरू केले. त्यानंतर तिला जॅकसन येथे मिसिसिपी विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये हलवले होते.नंतर अठरा महिने तिच्यावर उपचार चालू होते. नंतर पाच महिन्यांनी आई व ती बालिका तपासणीसाठी आले असता त्या बालिकेत एचआयव्हीचा संसर्ग उरलेला नव्हता हे चाचण्यात सिद्ध झाले. सहा प्रयोगशाळांनी या बालिकेची तपासणी करून तिच्यात एचआयव्हीचा विषाणू नावालाही शिल्लक राहिला नसल्याचा निर्वाळा दिला आहे. आई बाळाला जे स्तनपान देत असते त्यामुळेही एचआयव्हीवरील उपचारांना बाळ जास्त प्रतिसाद देते त्यामुळे नवजात बालकांवरील एचआयव्ही उपचार व प्रौढांमध्ये केले जाणारे उपचार यात मिळणाऱ्या निष्कर्षांत फरक आहे. एचआयव्हीची लागण झाली म्हणजे माणूस लगेच मरतो अशी समजूत आहे ती तितकीशी बरोबर नाही. एचआयव्ही संसर्ग असलेले लोक बराच काळ जिवंत राहतात. त्यांची प्रतिकारशक्ती विषाणूशी कशी झुंज देते यावर ते अवलंबून असते. प्रतिकारशक्ती जर वेगाने कमकुवत झाली तर ते अनेक रोगांना बळी पडतात. विसाव्या शतकात आफ्रिकेत प्रथम एड्सचा उदय झाला. १९८० पर्यंत तो एक गंभीर समस्या बनला व जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार तीस वर्षांत अडीच कोटी लोकांनी या विषाणूससंर्गामुळे जगाचा निरोप घेतला आहे

पालेभाज्यांमुळे आतडय़ांचे संरक्षण
हिरव्यागार पालेभाज्या आहारात असणे हे आतडय़ांची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशींना फायद्याचे असते असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. इनेट लिंफॉइड सेल्स (आयएलसी) नावाच्या या प्रतिकारशक्ती प्रणालीतील पेशी पचनसंस्थेच्या अस्तरात आढळून येतात व त्या आतडय़ाचे वाईट जीवाणूंपासून संरक्षण करीत असतात. अन्नाची अ‍ॅलर्जी, वेदनादायक आजार, लठ्ठपणा यांना नियंत्रित करण्यात या पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, आतडय़ाच्या कर्करोगाची शक्यताही त्यामुळे कमी होते. डॉ. गॅब्रिली बेल्झस, ल्युसी रॅनकिन, डॉ. जोआना ग्रुम व वॉल्टर अँड एलिझा हॉल संस्थेतील त्यांचे सहकारी यांनी हे संशोधन केले आहे. या प्रतिकारशक्तीशी निगडित पेशींच्या निर्मितीत टी-बेट नावाचे जनुक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. हे जनुक आपण सेवन केलेल्या अन्नालाही प्रतिसादही देत असते. बेल्झ यांनी सांगितले की, पचनसंस्थेतून होणाऱ्या जंतूसंसर्गाचा मुकाबला करणाऱ्या या पेशींच्या निर्मितीसाठी हे जनुक आवश्यक असते. पालेभाज्या सेवन केल्याने काही विशिष्ट प्रथिनांचा पेशींच्या पृष्ठभागावरील संग्राहकांशी संपर्क येतो व त्यामुळे टी-बेट हे जनुक चालू होते व त्यामुळे प्रतिकारशक्तीशी संबंधित आयएलसी या पेशी तयार होण्यास मदत होते. पालेभाज्यातून मिळणाऱ्या प्रथिनांचा संबंध हा थेट टी-बेट जनुक ते आयएलसी पेशी यांच्या माíगकेशी असतो. या भाज्यांमधील कुठल्या घटकांमुळे टी-बेट जनुकास आयएलसी या पेशी निर्माण करण्याचा संदेश मिळतो याचा उलगडा झाल्यानंतर आपण खातो त्या अन्नाचा प्रतिकारशक्तीप्रणाली व आतडय़ातील जीवाणूंवर काय परिणाम होतो हे स्पष्ट होईल. जीवाणूंच्या संसर्गाशी टी-बेट जनुकाचा फार जवळचा संबंध असतो, जीवाणू संसर्गावर मात करण्यासाठी आयएलसी पेशींची वाढ करण्याचा उपाय शोधून काढता येऊ शकतो. नेचर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
bournvita not health drink
बोर्नविटा ‘हेल्थ ड्रिंक’ नाही? केंद्र सरकारने का काढला असा आदेश?
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न

झोपी गेलेला जागा झाला
एड्सला कारणीभूत ठरणाऱ्या एचआयव्ही विषाणूला अटकाव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी एक नवीन युक्ती शोधली आहे. शरीरात निद्रिस्त अवस्थेत राहणाऱ्या या विषाणूला संसर्गबाधा झालेल्या पेशातून बाहेर पडण्याचे आमिष दाखवून जागे करण्याची योजना यात आहे. मेलबर्न येथील आल्फ्रेड रुग्णालयाच्या संशोधकांनी असे म्हटले आहे की, व्होरिनोस्टॅट औषधामुळे एचआयव्ही विषाणूची जनुके चालू बंद करण्याचे तंत्र बदलले जाऊन निद्रिस्त असलेल्या विषाणूला जागे केले जाते व नंतर त्याला मारणे सोपे असते. विषाणू निद्रिस्त अवस्थेत पेशीमध्ये लपला असेल तर तो एचआयव्ही उपचारांना दाद देत नाही. शॉरॉन लेविन यांनी सांगितले की, या अभ्यासातील निष्कर्ष निश्चितच दिलासा देणारे असून व्होरिनोस्टॅट औषध घेणाऱ्या रुग्णात विषाणूंना जागे करण्यात यश आले आहे. विषाणू पेशीत लपतो व त्यामुळे तो पारंपरिक एचआयव्ही उपचारांना दाद देत नाही, नैसर्गिक प्रतिकारशक्ती यंत्रणेसही तो हुलकावण्या देतो. एचआयव्ही विरोधी औषधे ही एचआयव्ही पासून शरीराला मुक्त करू शकत नाहीत कारण हा विषाणू प्रतिकारशक्ती प्रणालीतील पेशींच्या डीएनएमध्ये खोलवर पोहोचून तेथे निद्रिस्त होतो. त्याच्यावर औषधांचा काही परिणाम होत नाही. पारंपरिक एचआयव्ही निवारक औषधे ही माणसाचे आरोग्य टिकवतात पण एचआयव्ही विषाणूला ठार मारू शकत नाहीत. व्होरिनोस्टॅट औषधामुळे विषाणूला जागे केले जाते, असे आमच्या संशोधनात दिसून आले आहे. असे असले तरी विषाणूला जागे केल्यानंतर त्याने ग्रस्त असलेल्या पेशीला कसे नष्ट करायचे हा पुढचा प्रश्न आहे. प्रतिकारशक्ती प्रणालीला उत्तेजित करून विषाणूवर हल्ला करणे शक्य आहे असे लेविन यांनी सांगितले. स्मार्ट विषाणूला नष्ट करायचे कसे याबाबत अजून माणसाचे ज्ञान फार अपुरे आहे असे त्या म्हणाल्या. व्हिक्टोरिया येथे एचआयव्ही बाधित वीस रुग्णांना व्होरिनोस्टॅट औषध देण्यात आले. हे संशोधन विसाव्या रेट्रोव्हायरस परिषदेत अ‍ॅटलांटा येथे सादर करण्यात आले आहे.