उन्हाळ्यात आईस्क्रीम, सरबते, थंड पाणी अशा पदार्थाची सवय झालेली असते. पावसाळ्यात हवामान थंड होते, पण खाण्यापिण्याच्या सवयी मात्र तितक्या चटकन बदलल्या जात नाहीत. शिवाय या दिवसांत पचनही थोडे कमकुवत झालेले असते. पावसाळ्यातल्या जड पदार्थ खाण्याची सुरुवात भज्यांपासून होते, नंतर श्रावणाच्या निमित्ताने पुरणपोळ्या आल्याच! थंड आणि जड पदार्थाचे सेवन आणि वातावरणातला बदल यामुळे शरीरात वायू आणि कफाचा प्रकोप होतो आणि पावसाळ्यातले शारीरिकत्रास सुरू होतात. ते टाळायचे असतील तर आहाराला पाचक आणि उष्ण पदार्थाची जोड द्यायला हवी.

पावसाळ्यात सर्दी, खोकला, वेगवेगळ्या प्रकारचे ताप, जंतुसंसर्ग हे आजार नेहमीचे. या संसर्गाचा कफसंचय आणि वातप्रकोप यांच्याशी जवळचा संबंध आहे. कफ आणि वात दोन्ही शीत गुणांनी वाढतात. अनेक जण पावसाळ्यात आपल्याला वाताचा त्रास असल्याची तक्रार करतात. रस्त्यातून पावसाच्या पाण्यातून चालत जावे लागते तरी तो गारवा शरीरात दिवसभर राहतो. त्यातून सांधेदुखी, स्नायुदुखी होऊ शकते. उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाल्ल्याने अशा विविध त्रासांना दूर ठेवता येईल. असे काही उष्ण गुणांचे पदार्थ पाहू या..

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

सुंठ- सुंठ आणि पिठीसाखर एकास चार या प्रमाणात एकत्र करून ठेवावी. जाता-येता हे मिश्रण चिमूट-चिमूट तोंडात टाकावे. शिवाय चहा, कॉफी, ताकात किंवा काही वेळा खिरीतदेखील घालता येईल. ज्यांना दही खाण्याची सवय असते त्यांच्यासाठीही एक चांगला पर्याय आहे. पावसाळ्यात दही लावण्यासाठी दुधात थोडी सुंठ घालून उकळलेले दूध विरजावे. अशा दह्य़ाने त्रास होणार नाही.

लवंग व काळी मिरी- हे दोन्ही पदार्थ सम प्रमाणात घेऊन त्यांची पूड करून ठेवावी. ही पूड दोन-दोन चिमूट रोज सकाळी व संध्याकाळी मधातून घेता येईल. ही पूड ताकात किंवा ऑम्लेट, धिरडी, डोसे, सॅलडसारख्या पदार्थामध्येही घालतायेईल. लवंग आणि काळी मिरी या दोन्हीत जिवाणू आणि बुरशी यांना अवरोध करण्याची ताकद असते. कफासाठी हे दोन्ही घटक उत्तम. सर्दी, खोकला, नाक चोंदणे, घशाचा संसर्ग लवकर बरे करण्यासाठीही ते मदत करतात. लवंगेचे तेलही पावसाळ्यात घरात हवेच. हे तेल २-२ थेंब मधाबरोबर पोटात घेता येते. घशासाठी या तेलाचे ४-५ थेंब ग्लासभर गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या करता येतील.
लसूण- लसूण बऱ्याच जणांकडे भाज्यांमध्ये नेहमी वापरतात, पण पावसाळ्यात त्याचा वापर थोडा वाढवला तरी चालेल. पावसाळ्यातल्या अंगदुखीसाठी लसणाचे तेल करून घरात ठेवावे. त्यासाठी लसणाच्या १५ ते २० मध्यम आकाराच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात व त्यात १०० एमएल तिळाचे किंवा खोबऱ्याचे किंवा इतर कोणतेही तेल घालावे. पाच मिनिटे तेल चांगले उकळून गार झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवावे. पावसातून आल्यावर मान, पाठ, अंगदुखी झाल्यास या तेलाने मालिश करता येईल. त्याने वातशमन होते आणि स्नायू व सांध्यांना आराम मिळतो. पावसात कानात दडे बसून कान दुखल्यास हे तेल कोमट करून २ थेंब कानात घालता येईल.
जायफळ- या दिवसात गोड पदार्थ बनवताना त्यात जायफळ जरूर घालावे. जायफळ अन्नपचनासाठी मदत करते. मसालेभात किंवा मसालेदार भाज्यांमध्ये थोडीशी जायफळाची पूड घातली तर हे पदार्थही खूप जड होणार नाहीत. जुलाबाचा त्रास नियंत्रणात आणण्यासाठीही जायफळ फायदेशीर.
गवती चहा- पावसाळ्यात नेहमीच्या चहात गवती चहा जरूर घालावा किंवा गवती चहाचा काढाही उत्तमच. गवती चहाचा काढा करण्यासाठी गवती चहाची १ फूट लांबीची २ ते ३ पाने बारीक कापून १ कप पाण्यात पाच मिनिटे उकळून घ्यावीत आणि काढा गाळून घ्यावा. विशेष म्हणजे हा काढा लहान मुलांना किंवा बाळांनाही योग्य प्रमाणात दिला तर चालतो. सर्दी-खोकल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी गवती चहा मदत करतो. अनेकदा लहान मुलांना पावसाळ्यात दूध पचत नाही. अशा वेळी हा काढा मध घालून लहान बाळांना एका वेळेला २-३ चमचे देता येईल, मूल ४-५ वर्षांचे असेल तर एका वेळेस पाव कप देता येऊ शकेल. मोठय़ा माणसांनी कपभर काढा घेतला तरी चालतो.
मेथी- पावसाळ्यात आहारात शक्य तिथे मेथीचा वापर जरूर करावा. मेथीच्या दाण्यांना मोड आणून ठेवावेत आणि ही मोड आलेली मेथी डाळी, उसळींसारख्या पदार्थामध्ये शिजताना १-२ चमचे घालावी. ही मेथी पदार्थात घातल्याने पदार्थ कडू लागत नाही. मेथीमुळे पोटात वायू धरणे कमी होते, तसेच वातामुळे होणारी अंगदुखी टाळण्यासाठीही मदत होते.
गूळ- पुरण गुळाचेच का करतात यामागे एक शास्त्रीय विचार आहे. गूळ पचनसंस्थेला चालना देतो, शिवाय पोटात गॅसेस होऊ नयेत म्हणूनही तो चांगला. म्हणून पुरणासारख्या डाळ वापरून केलेल्या जड पदार्थाना गुळाची जोड देणे चांगले. एरवीही जेवल्यानंतर गुळाचा खडा खाणे चांगले. गूळ कफ पातळ करतो. त्यामुळे कोणत्याही काढय़ात तो घालता येतो किंवा सुंठ-गूळ एकत्र करून घेता येतो.
डॉ. संजीवनी राजवाडे – dr.sanjeevani@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)