पावसाळा मन ताजंतवानं करणारा असला तरी ज्यांना रोजच पावसात भिजण्याची वेळ येते, त्यांच्यासाठी हाच ऋतू त्वचेच्या काही तक्रारी घेऊन येतो. दमट हवेत ओले कपडे अंगावर तसेच राहिल्यामुळे अंगावर येणारे चट्टे आणि खाज, पायाच्या बोटांना होणाऱ्या चिखल्या, खराब होणारे किंवा अधिकच गळणारे केस या त्यातल्या काही तक्रारी. हे त्रास टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी ते पाहू या.-
बुरशीचा संसर्ग आणि खाज
मांडीच्या आतल्या भागात- जांघेत होणाऱ्या बुरशीच्या संसर्गाची तक्रार पावसाळ्यात प्रामुख्याने आढळते. नायटा किंवा गजकर्ण या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या बुरशी संसर्गात छोटय़ा कंकणाकृती चकत्यांपासून अगदी मोठय़ा आकाराचे लाल, चॉकलेटी, काळसर, पिवळसर अशा कोणत्याही रंगाचे डाग त्वचेवर उमटतात. या चट्टय़ांच्या बाजूस बारीक फोड असतात आणि त्यांना प्रचंड खाज येते. विशेषत: संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर कपडे बदलताना ही खाज बेजार करते. काखेत आणि स्त्रियांमध्ये छातीच्या खालच्या बाजूस अशी खाज येते. ओलावा आणि दमटपणामुळे भिंतीवर जशी बुरशी येते, तशाच प्रकारच्या बुरशीमुळे त्वचेच्या या तक्रारी उद्भवतात. पावसात भिजल्यावर दमट ओले कपडे बराच वेळ अंगावर तसेच राहिल्यास हा त्रास होऊ शकतो.
अशी काळजी घ्या-
४ पावसाळ्यातल्या त्वचाविकारांचा आधीपासूनच त्रास असलेल्यांनी शक्यतो पावसात अजिबात न भिजलेले बरे.
४ बहुतेक जण दररोज जीन्स पँट वापरतात, पण पावसामुळे या पँट भिजल्यावर लवकर वाळत नाहीत. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी कार्यालयात एक कोरडय़ा कपडय़ांचा एक सेट ठेवावा.
४ नुसत्या भुरभुर पावसात अनेक जण रेनकोट किंवा छत्री वापरायचा कंटाळा करतात. पण त्या पावसानेही कपडय़ांना दमटपणा येत असल्यामुळे रेनकोट वापरलेलाच चांगला.
४ नुसते वरचे भिजलेले कपडे बदलले तरी पावसाचे पाणी झिरपून आतले कपडे भिजतात आणि ते ओले राहिल्यामुळे त्वचाविकारांना आमंत्रणच मिळते. त्यामुळे पावसाळ्यात आतल्या कपडय़ांचे अधिक सेट ठेवलेले चांगले. या दिवसात धुतलेले कपडे लवकर वाळत नाहीत. आतले कपडे असे अर्धवट वाळलेले असतील तर त्यावरून गरम इस्त्री फिरवून ते पूर्ण सुकवा आणि मगच घाला.
४ स्थूल व्यक्तींना पोट आणि मांडीच्या खाली, काखेत वाढलेल्या चरबीमुळे खोबणी निर्माण होते आणि तिथे ओलावा राहतो. त्यामुळे अंग भिजल्यावर ते काळजीपूर्वक पुसून कोरडे करावे.
४ पावसाळ्यात शक्यतो सैलसर कपडेच घालावेत.
४ अशा प्रकारच्या चट्टय़ांवर लावण्यासाठी बाजारात अनेक मलमे मिळतात. पण अनेकदा असे मलम लावून त्रास तात्पुरता कमी होतो पण नंतर काही दिवसांनी पुन्हा सुरू होतो. बाजारात मिळणारी काही स्टिरॉइड मलमे त्या ठिकाणची त्वचा खराब करतात आणि बुरशीचा संसर्ग त्वचेच्या आणखी आत जाऊन वाढू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्याच मनाने अशी औषधे वापरण्याचे टाळावे.
४ औषधे व मलमाने खाज १ ते २ आठवडय़ांत चट्टा जाऊन खाज थांबत असली तरी चट्टा गेला म्हणजे आजार बरा झाला असे नाही. त्यामुळे चट्टा आणि खाज यांचे योग्य निदान होणे आणि औषधोपचार पूर्ण करणे गरजेचे.
४ जांघेत आणि काखेत येणारे असे चट्टे संसर्गजन्य असू शकतात. त्यामुळे ते इतरांना होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी. एकमेकांचे कपडे न घातलेलेच बरे.
४ त्वचेवर फारच खाज येत असली तरी नखे आणि बोटांनी अजिबात खाजवू नये, प्रसंगी नुसते हाताने चोळावे.
केसांची काळजी
केस अधिक प्रमाणात गळणे किंवा टक्कल पडू लागलेल्यांनी पावसाच्या सरी थेट डोक्यावर घेऊ नयेत. डोक्यावर जोरात पडलेल्या पावसामुळे केस गळू शकत असल्यामुळे डोक्यावर टोपी, रुमाल, हेल्मेट असे काही तरी परिधान करावे. पावसाळी पर्यटनात धबधब्यांखाली भिजणे आवडत असले तरी ते पाणीही थेट डोक्यावर पडू देणे टाळावे. प्रदूषणामुळे पावसाच्या पाण्यात नायट्रिक, सल्फ्युरिक आणि काबरेनिक आम्लांचे प्रमाण असू शकते. हा पाऊस केस खराब करू शकतो. केस भिजल्यावर ते खसाखसा पुसण्यापेक्षा कोरडय़ा टॉवेलने टिपावेत. हेअर ड्रायरने केस पुसताना येणाऱ्या हवेच्या गरम झोतामुळेही केस गळू शकतात.
– डॉ. प्रसन्न गद्रे,
त्वचाविकारतज्ज्ञ
prasannagadre@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)
पावलांना होणाऱ्या चिखल्या
पायाची करंगळी, चौथे आणि तिसरे बोट यांच्या मध्ये अनेकांना पावसाळ्यात चिखल्या होतात. हे टाळण्यासाठी भिजलेले मोजे पायात राहू देऊ नका. रस्त्यावरील डबक्यांमधून कार्यालयाला जाताना बूट आणि मोजेही भिजत असल्यामुळे बॅगमध्ये कोरडय़ा मोज्यांचा एक सेट ठेवा. ऑफिसमध्ये असताना अनेक जणांच्या पायात बूट अनेक तास राहतात. त्यामुळे शक्य होईल तेव्हा थोडा वेळ बूट काढून पाय मोकळे करावेत. ज्यांना नेहमी पायाला चिखलीचा त्रास होतो त्यांनी या दिवसात रोज एक स्वच्छ कापड घेऊन सकाळी आंघोळीनंतर व रात्री झोपण्यापूर्वी ते कापड पायाच्या बोटांच्या बेचक्यातून बूट पॉलिश करताना फिरवतात तसे फिरवावे. त्यामुळे बोटांचे बेचके कोरडे होतील. गमबूट किंवा कोणतीही पादत्राणे पाणी शिरेल इतके सैल नको व अगदी घट्टही नको. चालताना टाच बाहेर न येणारी व घातल्यावर बोटे हलवता येतील अशी पादत्राणे वापरावीत. विशेषत: स्त्रियांची पादत्राणे किंवा बूट चवडय़ाच्या बाजूला त्रिकोणी आकाराची असतात. त्यामुळे बोटे दाबली जातात आणि बोटांच्या बेचक्यात चिखलीचा त्रास असेल तर तो वाढतो. त्यामुळे असा त्रास असलेल्यांनी चवडय़ाच्या बाजूला चौकोनी किंवा वर्तुळाकार असलेली पादत्राणे वापरावीत.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….