06 March 2021

News Flash

मुलींशी मैत्री करायचीय.. पण!

शिक्षण आणि नोकरीसाठी अनेकांना खेडेगावातून शहरात जावं लागतं.

आपण कसे आहोत, कोण आहोत, याचा आढावा घेतला तर पुढं आपल्याला कोण व्हायचंय

शिक्षण आणि नोकरीसाठी अनेकांना खेडेगावातून शहरात जावं लागतं. एका वर्गातल्या मुला-मुलींनी एकमेकांशी बोलायचंसुद्धा नाही, असं वातावरण अजूनही काही काही ठिकाणी प्रचलित असताना मोठय़ा शहरांत अनेक ठिकाणी दिसणारी महाविद्यालयीन मुला-मुलींची अगदी मोकळी मैत्री लक्ष वेधून घेते. काहीजण हा सांस्कृतिक बदल पटकन आत्मसात करतात, पण काहींसाठी मात्र तो बदल खूप मोठा ठरतो.

प्रश्न- मी अकरावीत आहे. यंदाच मी लातूरजवळच्या एका गावातून पुण्यात शिकायला आलो. माझ्या शाळेत मुले-मुली एकमेकांशी बोलायची नाहीत. मैत्री तर दूरचीच गोष्ट. त्यामुळे मुलींशी बोलायचं, त्यांच्याबरोबर एकाच बाकावर बसायचं याची मला सवयच नाही. माझं आताचं कॉलेज खूप मोठं आहे. इथं मुलं-मुली मोकळेपणाने बोलतात, एकमेकांना टाळ्या देतात, (मैत्रीमैत्रीत एकमेकांना मिठी मारलेली पण चालते इकडे!) मी सगळं पाहिलं आणि घाबरूनच गेलो! आमच्या वर्गातल्या मुली माझ्याशी बोलतात, पण मीच त्यांच्याशी इतर मुलांसारखा बोलू शकत नाही. त्या बोलायला आल्या की का कुणास ठाऊक, पण मला भीतीच वाटू लागते. मग मी चाचरत, कामापुरतं बोलतो. मलापण मुलींशी मैत्री करायचीय, पण मग मला भीती का वाटते?
उत्तर- मित्रा, तू हे बोलायचं धाडस केलंस याबद्दल अभिनंदन! तुझ्यासारखे खूप जण असतात, आणि सिक्रेट म्हणजे अशा खूप मुली पण असतात, की ज्यांना अगदी तुझ्यासारखंच वाटत असतं. अकरावीत येताना आधी कसं वाटत होतं, हे पण बघणं आवश्यक आहे.
आपण कसे आहोत, कोण आहोत, याचा आढावा घेतला तर पुढं आपल्याला कोण व्हायचंय, तिथपर्यंत कसं पोहोचायचंय याचा ‘रोड-मॅप’ तयार करायला मदत होईल, कारण तू म्हणतोस की तुला मुलींशी मत्री करायचीय, पण मग भीती का वाटते? अकरावी आणि कॉलेज लाइफबद्दल तुझी पण स्वप्नं असणार. ती खूपदा सीनिअर मुलांकडे बघून, टी-व्ही किंवा सिनेमा बघून तयार झालेली असतात. पण आपलं घर, चालीरीती, गावातलं वातावरण यांच्याकडे दुर्लक्ष करून ती स्वप्नं प्रत्यक्षात आणणं जरा अवास्तव ठरू शकतं. बघ, तू लातूरजवळचं गाव असं म्हणतोस; त्या गावाचं नाव पण घ्यायला आपण संकोच करतो का? तर ते पहिलं सोडलं पाहिजे, असं मला वाटतं. पटतंय का तुला? बिनधास्त राहायचं असेल तर आधी आपण स्वत:ला आवडायला पाहिजे, हे तर खरंय ना? आपल्या खेडय़ातून येण्याची, ‘मराठी मीडियम’ची लाज नको वाटायला. लातूर आणि पुण्यातलं भौगोलिक अंतर हा फक्त एक भाग झाला, सांस्कृतिक अंतर मिटवायची आपली इच्छा पण चांगली आहे. दोन माणसं किंवा गावं एकमेकापासून वेगळी आहेत, म्हणजे कमी-जास्त आहेत असं नको समजू या.
मोकळं बोलणं, जवळ बसणं, टाळ्या देणं किंवा मिठय़ा मारणं हे मत्रीचे निकष नव्हेत, निदर्शक असू शकतात, आणि तेही फसवे ठरू शकतात. त्यामुळे मत्री चांगली असण्यावर भर असला की झालं. एकाकी न वाटणं, आपुलकी वाटणं, दुसऱ्याच्या हिताचा विचार करणं आणि तसंच बोलणं अन् वागणं, पुढं जाऊन दुसऱ्याला त्याची चूक पण चांगल्या हेतूनं दाखवता येणं, पण आपलाच ग्रह बरोबर, अशी सक्ती न करणं; ही मत्रीची परीक्षा असू शकते. लंगिकता अनुभवाला येणं वेगळं आणि सारासार विचार न करता ती व्यक्त करत सुटणं हे अगदीच वेगळं. दुसऱ्याचा विचार न करता केलेली अयोग्य अभिव्यक्ती ही संपूर्ण आयुष्याला भयंकर कलाटणी देणारी गोष्ट ठरू शकते; म्हणून, बिनधास्त, पण जरा जपून!
म्हणून तू सच्चेपणानं तुझ्यासारखाच वागत राहिलास, तर तुला जे हवंसं वाटतं, ते व्हायची शक्यता अधिक. इतरांचं बघून काही करायला जाऊ नये, असा माझा सल्ला असेल. चाचरत चाचरत बोलणं वाईट नाही; कामाकडे लक्ष मात्र हवं. ते खरेपणाने करणं हे महत्त्वाचं. मुलींचे किंवा दुसऱ्यांचे हेतू काय असतील, हे शोधत बसू नकोस, तुला काय वाटतंय त्याच्यावर लक्ष ठेव, ते चांगलंच आहे ना, हे बघ. मग चाचरणं वगरे आपोआप दूर होईल. कुणी साधं गोड बोललं तर आपला गरसमज होत नाही ना, हे बघायला हवं. जरूर पडेल तर मोकळेपणानं तुला असं सांगता येईल का, ‘की काय आहे, आमच्या गावाकडच्या पेक्षा तुमचे मॅनर्स मला एकदम भारी वाटतात, त्यामुळे जरा अवघडल्यासारखं, संकोचल्यासारखं होतं मला बऱ्याचदा. पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका; मी तुम्हाला काय मदत करू?’
अशा रीतीनं जर तुला ‘सगळ्या मुली म्हणजे माझ्या बहिणीच आहेत,’ किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन प्रेयसी, पत्नीच होऊ शकतात’, अशा ठरीव साच्यातून विचार न करता स्वत:च्या विचारांशी, भावनांशी प्रामाणिक राहता आलं, तर तू लातूरजवळच्या खेडय़ातून लवकर पुण्यात पोहोचशील, अन् अगदी रुजशीलसुद्धा! मग कल्पना कर की आजकालच्या आणि उद्याच्या ग्लोबल खेडय़ामध्ये तू पुण्यातून उठून जर्मनी किंवा अमेरिकेतल्या एखाद्या पेठेमध्येसुद्धा सहजपणे वावरू शकशील!

– डॉ. वासुदेव परळीकर
paralikarv2010@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 1:18 am

Web Title: how to friendship with girl
टॅग : Health It
Next Stories
1 थंडी, व्यायाम आणि अभ्यंग!
2 मनोमनी : मी कोण आहे, स्त्री की पुरुष?
3 मागोवा मधुमेहाचा – मधुमेह आणि वृद्ध
Just Now!
X