भारतीय संस्कृती, कला, वेद, शास्त्र, आयुर्वेद व अध्यात्मातील अधिकारी परमपूज्य प्रभाकर सरदेशमुख महाराजांनी १९५४ मध्ये भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने भारतीय संस्कृतिदर्शन ट्रस्टची स्थापना केली. आयुर्वेद या पुरातन भारतीय वैद्यकशास्त्राच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी १९८४ मध्ये ट्रस्टतर्फे आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र सुरू केले. या रुग्णालयात व संशोधन केंद्रातर्फे  कॅन्सर, एड्स, विलंबित अस्थिभग्न, माता-बालसंगोपन अशा आजारांवर व आरोग्यासंबंधी विषयांवरील संशोधन प्रकल्पांचे काम चालू आहे. प.पू. प्रभाकर केशव सरदेशमुख महाराजांनी १९९४ मध्ये त्यांचे सुपुत्र व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. स. प्र. सरदेशमुख व बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरिवद कुलकर्णी यांच्या साहाय्याने वाघोली (पुणे) व मुंबई येथे कॅन्सर संशोधन प्रकल्पास सुरुवात केली. १९९५ मध्ये सोलापूरमधील प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. शिरीष कुमठेकर यांच्या समन्वयाने सोलापूर येथे या प्रकल्पाची सुरुवात केली. सध्या कोल्हापूर, नाशिक, गुडगाव, नवी दिल्ली येथेही प्रकल्पाची केंद्रे कार्यरत आहेत.
आयुर्वेदाच्या साहाय्याने कॅन्सरग्रस्त रुग्णांना आराम देता यावा, त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारता यावी, आयुर्मान वाढविता यावे व केमोथेरॅपी तसेच रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करून या चिकित्सापद्धती अपेक्षित कालावधीत रुग्णांना पूर्ण करता याव्यात हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. सदर कॅन्सर प्रकल्पात चिकित्सा घेणाऱ्या रुग्णांचे  अ, ब, क व ड या ४ गटांत विभाजन केले जाते. केमोथेरॅपी, रेडिओथेरॅपी व शस्त्रकर्म  यापकी कोणत्याही चिकित्सापद्धतींचा अवलंब न करता केवळ आयुर्वेदिक चिकित्सा घेणारे रुग्ण ‘अ’ गटात, आधुनिक वैद्यकशास्त्राची चिकित्सा घेऊनही कॅन्सरचा पुनरुद्भव झालेले व आता आयुर्वेदिक चिकित्सा घेणारे रुग्ण ‘ब’ गटात, केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीबरोबर आयुर्वेदिक चिकित्सा घेणारे रुग्ण ‘क’ गटात व सर्व आधुनिक वैद्यक  चिकित्सा घेऊन कॅन्सरवर नियंत्रण मिळाल्यावर कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक चिकित्सा घेणारे रुग्ण ‘ड’ गटात समाविष्ट केले जातात. यापकी अ गटातील रुग्णांत कॅन्सरविरोधी चिकित्सा, ब गटातील रुग्णांत त्या जोडीला रसायन चिकित्सा, क गटातील रुग्णांत केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारी पित्तशामक व पचन सुधारणारी चिकित्सा तसेच ‘ड’ गटातील रुग्णांत प्रामुख्याने रसायन व पंचकर्म चिकित्सा उपयोजिली जाते.
चिकित्सा निश्चित करण्यापूर्वी रुग्णाचा गेल्या काही वर्षांचा आहार, विहार, सवयी, मानसिक स्थिती, रुग्णांचे प्रत्यक्ष परीक्षण, कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीची लक्षणे, तपासण्या, त्यासाठी अवलंबिवलेल्या चिकित्सापद्धती यांची सविस्तर माहिती घेतली जाते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार रुग्णाच्या कॅन्सरची स्टेज, ग्रेड, टी. एन्. एम्. वर्गीकरण यांचाही अभ्यास केला जातो. या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून रुग्ण व व्याधींच्या बलानुसार शमन, पंचकर्म म्हणजेच शोधन चिकित्सा, आनुषंगिक उपक्रम, रसायन, पथ्यापथ्य, समुपदेशन यापकी योग्य चिकित्सा निश्चित केली जाते. ठरावीक काळाने  पुन:पुन्हा रुग्णपरीक्षण करून आयुर्वेदिक चिकित्सेच्या परिणामांचीही तपासणी केली जाते व त्यानुसार पुढील चिकित्सेची निश्चिती केले जाते. डॉ. स. प्र. सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वासंती गोडसे, डॉ. श्रीनिवास दातार, डॉ. श्वेता गुजर व अन्य सहकारी आयुर्वेदिक डॉक्टर्स अशा प्रकारे रुग्णांचे आयुर्वेदीयदृष्टय़ा रुग्णपरीक्षण व चिकित्सा करतात. संस्थेच्या रुग्णालयात पंचकर्मासाठी स्वतंत्र विभाग असून त्यात तज्ज्ञ पंचकर्म चिकित्सक रुग्णचिकित्सा करतात. रुग्णालयात प्रविष्ट झालेल्या कॅन्सर रुग्णांना नसíगक खतांवर पोसलेल्या भाज्या, धान्ये, फळे उपलब्ध व्हावीत तसेच दर्जेदार शास्त्रोक्त व अनुभविक औषधांसाठी लागणाऱ्या वनस्पतींची तसेच अतिशय विरळाने आढळणाऱ्या वनस्पतींची नसíगक खतांवर लागवड करण्यासाठी संजीवनी वनौषधी विभाग कार्यरत आहे. नसíगक खतनिर्मितीसाठी गांडूळ खत प्रकल्प; देशी गाय, म्हैस  शेळी यांचे औषधी गुणधर्म असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ रुग्णांना उपलब्ध व्हावेत म्हणून पशुसंवर्धन प्रकल्पही सुरू आहे. कॅन्सर रुग्णांना दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी अथर्व नेचर हेल्थकेयर प्रा. लि. या संस्थेच्या फार्मसीत शास्त्रशुद्ध पद्धतीने व आयुर्वेद व आधुनिक वैद्यकाच्या निकषांनुसार स्टॅण्डर्डायझेशन केलेल्या औषधांचे उत्पादन केले जाते. याचबरोबर डॉ. अरिवद कुलकर्णी, डॉ, तुषार पाटील, डॉ. अनिल संगनिरिया, डॉ. केयुर गुट्टे, डॉ. दीपक लड्डा हे आधुनिक वैद्यकातील कॅन्सरतज्ज्ञ रुग्णांना आधुनिक चिकित्सापद्धतींबाबत मार्गदर्शन करून आमच्या रुग्णालयात आधुनिक चिकित्सा व परीक्षणे करतात. प्रत्येक रुग्णाच्या या शास्त्रीय माहितीची संगणकीय नोंद करून त्यावरून आयुर्वेदानुसार कॅन्सरची संभाव्य कारणे, आधुनिक वैद्यकसम्मत निकषांवर सिद्ध झालेले कॅन्सरमधील आयुर्वेदिक चिकित्सेचे योगदान याविषयी शास्त्रीय शोधनिबंध तयार करून आंतरराष्ट्रीय परिषदा, जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले जातात. टाटा कॅन्सर सेंटरच्या इम्युनॉलॉजी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुधा गांगल, सेल बायॉलॉजी विषयातील तज्ज्ञ डॉ. अविनाश भिसे, डॉ. रजनी भिसे यांच्या  बहुमूल्य मार्गदर्शनाखाली सदर विषयांवर संशोधन करून त्यावरील शोधनिबंध तयार केले जातात.
अशा प्रकारे संशोधनाने निश्चित झालेल्या माहितीचा कॅन्सर प्रतिबंध व चिकित्सेसाठी जनसामान्यांना लाभ मिळावा यासाठी संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध ठिकाणी विनामूल्य कॅन्सर चिकित्सा सल्ला शिबिरे, स्त्रियांमधील स्तन व गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान, कॅन्सर-आयुर्वेद या विषयावरील प्रदर्शने, कॅन्सर प्रबोधनपर व्याख्याने, वृत्तपत्रे व नियतकालिकांत माहितीपर लेख, कॅन्सर-आयुर्वेद पुस्तक, वेबसाइट फेसबुकसारखी माहितीची साधने याद्वारा प्रसिद्ध केले जाते. संस्थेतर्फे चालू असलेले व जगभरातील कॅन्सर- आयुर्वेदविषयक संशोधन एका व्यासपीठावर यावे या उद्देशाने दर ४ वर्षांनी संस्थेतर्फे १९९७ पासून आयुर्वेद फॉर कॅन्सर ही आंतरराष्ट्रीय परिषद घेतली जाते. यात जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, यू.एस.ए., कॅनडा, न्यूझीलंड अशा विविध देशांतील कॅन्सरतज्ज्ञ आपले शोधनिबंध सादर करतात. आजपर्यंत अशा ४ आंतरराष्ट्रीय परिषदा संस्थेने आयोजित केल्या आहेत.
कॅन्सर संशोधन प्रकल्पाच्या या कामाचा आढावा घेऊन डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जीने २००९ मध्ये संस्थेस कोबाल्ट रेडिओथेरॅपी मशीनसाठी अनुदान दिले. तसेच भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ आयुषने इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटरच्या इमारतीच्या उभारणीसाठी व कॅन्सर निदान व चिकित्सेच्या उपकरणांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स या योजनेंतर्गत अनुदान दिले आहे. त्यामुळे सध्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटरमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना एकाच ठिकाणी आयुर्वेदिक चिकित्सेबरोबर केमोथेरॅपी,  रेडिओथेरॅपी, शस्त्रकर्म व आयुर्वेदिक तपासण्यांची सुविधा त्या त्या पॅथीतील तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपलब्ध आहेत. कॅन्सरच्या चिकित्सेतील पंचकर्माचे महत्त्व जाणून सर दोराबजी टाटा ट्रस्टने कॅन्सर रुग्णांच्या पंचकर्म रुग्णालयासाठी अनुदान दिले आहे. संस्थेच्या शास्त्रीय कामाच्या आधारे आयकर विभागाने संस्थेस 80G  व 35(1)(ii)  अंतर्गत दात्यांना आयकरात भरघोस सवलत मिळण्यास मान्यता दिली आहे. देश-विदेशातील संस्थेचे हितचिंतक, वैयक्तिक दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने सदर प्रकल्पाचा विस्तार होत आहे.
कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रयोगशालेय परीक्षण व रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या प्राथमिक स्वरूपातील सुविधा सध्या उपलब्ध असल्या तरी सी.टी.स्कॅन, एम्.आर्.आय., पेट स्कॅन यांसारख्या आधुनिक निदानात्मक रेडिओलॉजी विभागातील सुविधा, बायोकेमेस्ट्रि, इम्युनॉलॉजी,  कॅन्सर जिनेटिक्ससारख्या अत्याधुनिक प्रयोगशालेय तपासण्यांची सुविधा या रुग्णालयात उपलब्ध व्हावी, बॅकिथेरॅपी, आय.एम.आर.टी. या आधुनिक रेडिएशन चिकित्सापद्धतीचाही रुग्णांना लाभ मिळावा अशी प्रकल्पाची भावी योजना आहे. या आधुनिक वैद्यकशास्त्रातील  प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच आयुर्वेदोक्त मूलभूत सिद्धांतांवर आधारित परिपूर्ण चिकित्सा अधिकाधिक कॅन्सर रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी कॅन्सर रुग्णालयाच्या आयुर्वेद विभागातही अधिक प्रभावी चिकित्सेसाठी अनेक सुविधा व उपक्रम राबविण्याचा डॉ. स. प्र. सरदेशमुख यांचा मनोदय आहे. या प्रकल्पाचा संभाव्य खर्च अंदाजे १०० कोटी आहे. आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपलब्ध उत्तमोत्तम चिकित्सा कॅन्सर रुग्णांना माफक दरात उपलब्ध करून देऊन कॅन्सर चिकित्सा व संशोधन क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रयत्नशील राहण्यासाठी सदर प्रकल्प कटिबद्ध आहे. (समाप्त)