औषधांविषयी जाणून घेण्याजोग्या लहान- लहान बाबींचा परिचय या पुस्तकात सामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत करून देण्यात आला आहे. वातावरणातील घटक औषधांच्या विघटनात कसे कारणीभूत ठरतात, औषधांची साठवण कशी करावी, औषध घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या अशी रोजच्या जीवनात उपयोगी पडू शकणारी माहिती या पुस्तकात आहे. औषध घेतल्यावर त्याचा परिणाम दिसेपर्यंतच्या काळात शरीरात नेमके घडते, औषध घेण्याच्या आणि अन्न सेवनाच्या वेळांचा परस्परांशी कसा संबंध असतो, औषधांचे दुष्परिणाम म्हणजे ‘साईड इफेक्टस्’ कसे होऊ शकतात या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्नही या पुस्तकात झाला आहे. विशिष्ट औषधे घेणाऱ्या व्यक्तीला त्यांची सवय कशी लागू शकते तसेच काही द्रव्यांच्या सेवनाचे व्यसन कसे बनते आणि व्यसनातून बाहेर पडण्यासाठी विशिष्ट औषधांचा आधार घेणे कसे फायदेशीर ठरू शकते याचाही उलगडा लहान प्रकरणांद्वारे करण्यात आले.
पुस्तकाचे नाव- औषधांविषयी बोलू काही
लेखक- डॉ. के. आर. महाडीक
प्रकाशक- संस्कृती प्रकाशन
पृष्ठसंख्या- २००
किंमत- १५० रुपये

आयुर्वेदातील उपचार पद्धती आणि पंचकर्म चिकित्सेची माहिती देणारे हे पुस्तक
आहे. पंचकर्म चिकित्सा म्हणजे काय,
त्याचे उपयोग काय, कोणत्या विकारासाठी किंवा आजारासाठी कोणती चिकित्सा करावी, अशा विविध मुद्दय़ांवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. काही आजारांमध्ये पंचकर्माच्या माध्यमातून झटपट इलाज करणे कसे शक्य आहे याविषयीही लेखकाने आपली मते मांडली आहेत. वमनकर्म, बस्ती, विरेचन, रक्तमोक्षण यांसारख्या चिकित्सा, मनोविकारांसाठी पंचकर्म अशा अनेक विषयांचा पुस्तकात समावेश आहे. विविध ४७ प्रकरणांमध्ये या पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे. लेखकाला आपल्या रुग्णांबाबत आलेल्या अनुभावांची उदाहरणे देऊन पंचकर्म चिकित्सा समजावून सांगितली आहे.
पुस्तकाचे नाव – रामदासकृत पंचकर्मबोध
लेखक – वैद्य रामदास आव्हाड
प्रकाशक – सुसंवाद प्रकाशन
पृष्ठ संख्या – ५०४
किंमत- ३६०
नव्याने सुरु झालेल्या  ‘आरोग्य परिचय’ या पाक्षिक  सदरात आरोग्याशी संबंधित निवडक पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला जाईल. लेखक/ प्रकाशक या सदरासाठी पुस्तक पाठवू शकतात. आलेल्या सर्व पुस्तकांचा परिचय करून देणे जागेअभावी शक्य न झाल्यास पुस्तकाची नोंद घेतली जाईल. पुस्तक पाठवण्याचा
पत्ता- ‘संपादक, एक्सप्रेस हाऊस, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५’. पाकिटावर ‘हेल्थ इट साठी’ असा उल्लेख करावा.