एकटे राहणे म्हणजे एकटेपणा नाही. अनेक वृद्ध एकटे राहूनही आरामात व निरोगी असतात. सतत काही ना काही करून ते स्वत:ला बिझी ठेवतात. एकटेपणासाठी औषध नको, फक्त तुमचा प्रयत्न हवा.

‘‘आमच्या घरी कशालाही कमी नाही, मुलगा-सून चांगले आहेत. नातू तर खूपच प्रेमळ. सकाळी सर्वाची घाई असते, काही बोलायला वेळ नसतो, सर्वजण गेले की रात्रीपर्यंत मी एकटीच. सासूबाईंना त्रास होईल म्हणून सून सर्व स्वयंपाक करूनच जाते. काम करणाऱ्यांशी, शेजाऱ्यांशी काय बोलावे? मला नाही आवडत. रात्री दमलेल्या मुलांना खूप प्रश्न विचारून त्रास द्यावासा वाटत नाही आणि त्यांचे विषयही मला कळत नाहीत. टीव्ही तरी किती वेळ पाहणार? सर्व चांगले असले तरी एकटेपणा खूप आहे..’’ पासष्ठीच्या सुमनताई (नाव बदलले आहे) डोळ्यातील पाणी पुसत सांगत होत्या. तुमच्याकडे काही औषध आहे का? माझ्या घरचे चांगले आहेत, त्यांना सल्ला देऊ नका, अशी विनंती करत होत्या.
नुकत्याच पुण्याहून मुंबईला मुलाकडे राहायला आलेल्या सुमनताईंच्या तपासणीत कुठलाही मानसिक आजार आढळला नव्हता. अ‍ॅसिडीटी, अपचन होत असल्याने उपचारासाठी आमच्या रुग्णालयात आल्या होत्या. सर्व तपासण्या सामान्य होत्या. एकटेपणामुळे खाण्याकडे दुर्लक्ष, स्वतकडे अतिलक्ष, मनाच्या अस्वस्थतेमुळे अ‍ॅसिडीटीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या.
पूर्वी मोठय़ा कुटुंबात कोणत्याही वेळी घरी दोन-तीन माणसे असत. घरातल्या सणावारांची, कामांची माहिती व देखरेख ज्येष्ठांकडेच असे. घरी कोणी आले की मोठय़ांना नमस्कार करण्याची पद्धत होती, त्यांची चौकशी केली जाई. आता घरातील लहान, मोठे दिवसभर शाळा, कामानिमित्त घराबाहेरच असतात. सणवार एकत्र साजरे करण्याची पद्धत कमी झाली आहे. मित्रमंडळींनाही बाहेरच कॅफेमध्ये गाठले जाते. त्यामुळे भरलेल्या कुटुंबात राहूनही वृद्धांना एकटेपणा खायला येतो.
आपल्या वयाचे भाऊ-बहिणी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी मृत्यूमुळे गमावले जातात. त्यामुळे चौकशी करणाऱ्यांची, गप्पा मारणाऱ्यांची संख्या कमी होते. काही कारणाने नवीन ठिकाणी राहायला जावे लागले, तर हा एकटेपणा जास्त जाणवतो. अनोळखी माणसे, अनोखळी रस्ते यामुळे बाहेर पडायला भीती वाटते. कधी भाषेचा प्रश्न असतो. कपडे घालण्याची पद्धत वेगळी असल्यानेही काही वेळा वेगळे असल्यासारखे वाटते. मुलांसोबत संवाद साधण्याची सवय नसल्याने मोकळेपणाने बोलता येत नाही. क्रमाक्रमाने हा एकटेपणा वाढतच जातो.
एकटेपणाचा शरीरावर व मनावर परिणाम होतो. काही करावेसे वाटत नाही आणि स्वत:कडे जास्त लक्ष दिल्याने दुखणे-खुपणे वाढल्यासारखे वाटते. खाणे, व्यायाम नीट नसल्याने आजारांना सुरुवात होते. वृद्धापकाळात मनाचाही लवचीकपणा कमी होतो. त्यामुळे मुद्दाम प्रयत्न करून आपल्यात बदल घडवले पाहिजेत. लहानांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘आमच्या वेळेला नव्हते असे काही..’, ‘मी मोठा/मोठी म्हणून माझेच म्हणणे मान्य केले पाहिजे’, मानापमान, पद्धत-बंधन, चूक-बरोबर या गोष्टी इतरांवर लादू नये. आई-बाबा, आजी-आजोबा सतत टीका करतात, सूचना करतात असे वाटले तर आपल्याशी कोणी बोलायला येणार नाही. इतरांनी आपल्याशी बोलावे असे वाटत असेल तर त्यांचेही ऐकायची सवय केली पाहिजे.
नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील माहिती मिळवा. वर्तमानपत्र-मासिके वाचा, म्हणजे परिसर ओळखीचा वाटू लागतो. पाहुणे- शेजारी यांच्याशी आवर्जून ओळख काढा, बोला. ते तुमच्याकडे हेटाळणीने नाही तर आदराने पाहतात, असे तुमच्या लक्षात येईल. ज्येष्ठ नागरिकांचे मंडळ असेल तर त्याचे सदस्य व्हा. वाचनालयात जा. छंद वर्ग लावल्याने वेळही जातो व ओळखीही होतात. इंटरनेट, मोबाइल, नवीन तंत्रज्ञान जरूर शिकून घ्या. त्यातून तुम्ही नातेवाईकांशी जोडले जाता आणि घरातील तरुणांशीही दुवा जोडता येतो. घरातील माणसांवर अवलंबून राहण्याचे कारण नाही. एकटेपणा आपोआपच कमी होईल. सुमनताईंना मी हाच सल्ला दिला. एकटे राहणे म्हणजे एकटेपणा नाही. अनेक वृद्ध एकटे राहूनही आरामात व निरोगी असतात. सतत काही ना काही करून ते स्वत:ला बिझी ठेवतात. नैराश्याचा आजार असलेल्यांना एकटेपणा वाटतो, त्यावर औषधांशिवाय उपाय नाही. मात्र आजार नसताना वाटत असलेला एकटेपणा घालवण्यासाठी ज्येष्ठांनीच पुढाकार घेतला पाहिजे.  एकटेपणासाठी औषध नको, फक्त तुमचा प्रयत्न हवा. नो मॅन इज अ‍ॅन आयलंड.

डॉ. वाणी कुल्हळी,
मानसोपचारतज्ज्ञ