बाळ झाल्यानंतर अजूनही अनेक स्त्रियांना आपल्या करिअरपासून काही काळ दूर राहण्याची वेळ येते. एकीकडे बाळाचा आनंद असतोच, पण अचानकपणे बदललेल्या जबाबदाऱ्यांचा ताणही असतो. दुसरीकडे शिक्षण, नोकरीही खुणावत असते. अशा वेळी एखादीला नव्या जबाबदाऱ्यांचा वैताग आला तर त्यात तिची काहीच चूक नाही. या सुरुवातीच्या काळात घरातल्यांची भक्कम साथ मिळाली तर त्रागा नक्कीच टाळता येईल.

प्रश्न – मी ३२ वर्षांची आहे. मी एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करायचे. पण ७ महिन्यांपूर्वी आमच्या मुलीचा जन्म झाला आणि मी नोकरी सोडली. मुलीकडे दुर्लक्ष नको एवढाच हेतू मी नोकरी सोडण्यामागे होता. पण आता मला माझा निर्णय चुकल्यासारखा वाटतो. पूर्वी मी माझ्या कामात बिझी असायचे, पण आता सगळा वेळ बाळाला सांभाळण्यातच निघून जातो आणि काही काही वेळा मी अगदी त्रासून जाते. माझ्या नोकरीशी निगडित ज्ञान घेऊन ‘अपडेट’ होत राहायला मला वेळच मिळत नाही, त्यामुळे पुन्हा चांगली नोकरी मिळवू शकेन का याचीही चिंता वाटत राहते. माझा त्रागा इतका वाढायला लागलाय की कधी कधी मला चक्क माझ्या छोटय़ाशा मुलीचाच राग येतो आणि नंतर खूप अपराधी वाटतं. मन शांत ठेवण्यासाठी नेमकं काय करावं समजत नाही.
उत्तर- आपल्यापकी बहुतेकांना आपल्या कामाचं फळ लगेच मिळालेलं दिसायला आवडतं. त्यात काही मोठी चूक आहे असं नाही. आपण नोकरीत असताना रोजच्या रोज कामात गढून जाऊन महिन्याच्या महिन्याला पगार मिळवतो, वर्षांला पगारवाढ अन् बढती मिळवतो. पण जेव्हा आपण बाळाच्या तालावर नाचून दमतो, तेव्हा अगदी कधीमधी का होईना, साहजिकच तुलना होते. तेव्हा उमगतं की, लहान बाळ वाढवणं म्हणजे खरं तर पूर्ण २४ तास आयसीयूत डय़ूटी असलेल्या डॉक्टर किंवा सिस्टर यांच्यासारखी आपली गत आहे. प्रचंड जबाबदारी अन् लगेच मिळणारा व्यावहारिक/आíथक मोबदला शून्य. शिवाय नोकरी सोडल्यानं खिशाला पडलेलं भोक! आणि परत काही चुकलं, तर चुकीचं खापर आईवरच. पण इतरांचं जाऊ द्या, बाळाला खुट्ट झालं तरी काळजाचा ठोका चुकणार तो आपलाच. तेव्हा बाई ग, तुला जे चुकल्यासारखं वाटतंय ते नक्कीच ‘अबनॉर्मल’ नाहीये.
अशा वेळी घरच्या लोकांचा भक्कम सपोर्ट हवा असतो. मग हा सुरुवातीचा आपल्यासाठी आयुष्यभर जपण्याच्या आठवणींचा, अन् बाळासाठीचा अनमोल काळ पार पडला की, पुन्हा शिक्षण, काम शोधता येतंच. काही ठिकाणी आईला असा ब्रेक घेता येईल, अशी करिअरमध्ये तरतूद करतात. पण ती सगळ्या ठिकाणी असेल, असं नाही, हेही खरंय. मग जर घरून किंवा विश्वासू अशा सांभाळणाऱ्या आजींकडून काही मदत मिळाली तर लवकर शिक्षण किंवा नोकरी सुरू करता येते.
जरी फिक्स्ड डिपोझीट ठेवलं, तरी आपण सहसा ५-७ किंवा फारतर दहा वर्षांचा विचार करतो. पण जर कुणी आपल्याला २५-३० वर्षांचा वायदा केला तर आपण साशंक होतो, ही बँक किंवा संस्थाच बुडली तर? तसं काहीसं मूल वाढवायच्या बाबतीत होत असावं. ही भावनिक अन् कष्टांची ठेव परतफेड देईल, याची तशी खात्री कुणीच देणार नसतं. केवळ आपल्या आनंदासाठी ओतत राहण्याएवढी मॅच्युरिटी किंवा आध्यात्मिकता अवघडच असते. पण हे सगळं व्यावहारिक शहाणपण क्षणोक्षणी अमलात आणण्याइतके आपण तेव्हा मोठेही नसतो. अर्थात, बाळानं हसून प्रतिसाद दिला, हाक मारल्यावर ओळखलं, आपण दिसलो नाही तर कावरेबावरे झाले, अन् सापडल्यावर कुशीत येऊन विसावलं की जो ब्रह्मानंद होतो, तोसुद्धा या शंकांची जळमटे दूर करायला पुरेसा होऊ शकतो.
स्वतच्या या भल्यामोठय़ा शारीरिक, भावनिक गुंतवणुकीला कुणी हातभार लावला, तर जरा धीर येतो. नवरोबांचा सहभाग किंवा कमीतकमी पािठबा अर्थातच मोलाचा. त्यातल्या बऱ्याचशा पाश्र्वभूमीच्या गोष्टींचा हिशोब मांडावा लागेल. जेवढी माहिती तुम्ही दिलीय, त्यावरून तरी त्रागा होणं, अन छोट्या बाळाचाही राग येणं यात काही मोठा आजार दिसत नाही. उलट हे मोकळेपणानं बोलल्यानं सुद्धा तुम्हाला हलकं वाटायला हवं. अर्थात हे सारं कमी झालं नाही, किंवा वाढत गेलं तर तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. तुम्ही अन् तुमच्याबरोबरच माहेर-सासरच्यांनी पण.
आणि शेवटचं म्हणजे जरासं गमतीशीरच वाटेल तुम्हाला, कारण तुमच्या सॉफ्टवेअर मधलं आम्हाला फारसं कळत नसेल; पण आपलं सहज वाटलं म्हणून विचारतो, आपल्या या अनुभवांची, शहाणपणाची डिजिटल डायरी केली तर? आपल्यासारख्या इतरांना त्याचा फायदा होऊ शकेल, असं वाटतं का तुम्हाला? एफएक्यू किंवा यू-टय़ूब केले, तर नव्या कोऱ्या अन् कमी आधार असलेल्यांना आयांना, बाळांना, कुटुंबांना तयार आधार मिळेल; कुणीही तज्ज्ञ डॉक्टर, शिक्षक, नर्स, पाळणाघर चालवणारे मदतीला येतील की! प्रत्येक समाजात जेव्हा स्त्रियांच्या भूमिका बदलल्या, त्यांनी अहमहमिकेने जास्त जबाबदाऱ्या घेऊन मोठी स्वप्नं पाहिली, तेव्हा प्रत्येक संस्कृती अशा स्थित्यन्तरांमधून गेलेली आहे, असं इतिहासात दिसून येतं. तेव्हा नुसतेच ‘चूल आणि मूल’? नुसतेच घरकाम? छे! घर आणि काम! असा मंत्र घेऊन सज्ज होऊन कामाला लागू या.

– डॉ. वासुदेव परळीकर
paralikarv2010@gmail.com