लहान मुलांची काळजी पालकांना वाटणं स्वाभाविकच. पण मुलांचं सारं काही म्हणजे फक्त आणि फक्त आपलीच जबाबदारी आहे, त्याशिवाय आपल्याला दुसरं विश्वचं नाही असं कुणी वागू लागलं तर? सगळ्या गोष्टींचा प्रांजळपणे विचार करून या अतिचिंतेतूनही मार्ग काढता येईल. त्यासाठी घरच्यांनी त्या व्यक्तीस साथ देणं अपेक्षित आहे.
प्रश्न- माझा प्रश्न माझ्या पत्नीविषयी आहे. ती गृहिणी आहे. आमची मुलगी मनश्री बालवाडीत आहे. आधी माझी पत्नी एका कंपनीत व्यवस्थापन विभागात नोकरी करीत होती. मुलीच्या जन्माच्या वेळी तिने आपणहून मुलगी पहिली-दुसरीत जाईपर्यंत नोकरी न करण्याचं ठरवलं. पण मुलीच्या जन्मापासून तिच्याकडे अति लक्ष देणं हाच तिचा विरंगुळा झालाय. मी तिला याबाबत अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. मुलांना आईवडील हवे असतात हे खरं, पण अगदी प्रत्येक क्षणी त्यांची मुलांना गरज नसते, असं मला वाटतं. मनश्रीची शाळा, खेळ, जेवण, झोप हे सगळं जणू केवळ आणि केवळ तिचीच जबाबदारी असल्यासारखी ती वागते. आमच्या नवरा-बायकोच्या बोलण्यात मनश्री सोडून दुसरा कुठला विषयच नसतो. माझंही माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे. पण ‘आई’ बनण्यात माझी बायको स्वत:चा पूर्वीचा स्वभाव पूर्णच विसरलीय त्याचं काय? कसं सांगू हे तिला?
उत्तर- तुम्ही पत्र लिहून अगदी नेमका प्रश्न चच्रेला घेतलाय. अनेक आया अशा काळजीने पोखरून गेल्यासारख्या करतात. म्हणजे हे आपलं-आपलं निरीक्षण म्हणा की. कदाचित मनश्रीची आई हे पूर्णपणे नाकारेलही. बरं, सध्या सगळ्याच बाबतीत मानसशास्त्र अन् भावनांचा वरचष्मा असताना तुम्ही तिला मुलीकडे कमी लक्ष द्यायला सांगणे म्हणजे जवळपास गुन्हाच होईल. म्हणून आधी आईच्या बाजूनं काय काय काळज्या असू शकतील याचा विचार करू या.
व्यवस्थापन विभागातल्या कामाचा अनुभव असल्यानं तिला चांगलंच माहिती असणार की कुठल्याही साध्या दिसणाऱ्या गोष्टीमागे किती कष्ट आणि विचार असतो ते. त्यामुळे मुलीची शाळा, खेळ, झोप, जेवण-खाण या खरंच अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. मूल म्हणजे एक संपूर्ण स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, नुसतं तुमची दोघांची लहान आवृत्ती नव्हे, हे आपणही लक्षात ठेवायला हवं. जितके जास्त प्रयत्न आता होतील तिला घडवायला, तितकी ती अधिक निकोप अन् निर्दोष रीतीनं विकास पावेल, यात शंका नाही.
पण हे करताना चुका कुठे घडू शकतात याचा अंदाज घेऊ या. आजी-आजोबा नातीचा ताबा घेतील, असं वाटल्यानं खूपदा आया ‘पझेसिव्ह’ होऊ शकतात किंवा आपण कमी पडलो, तर इतर जण (त्यात तुम्ही पण आलात) आपल्यालाच दोष देतील, ही खात्रीसुद्धा त्यांना असं वागायला लावू शकते. किंवा आज-कालच्या बातम्या अन मुलींवर झालेले अत्याचार हे कुणालाही सावध करायला किंवा घाबरवून सोडायला पुरेसे आहेत. अगदी घटकाभर असं धरून चाला की, आपल्याला लहानपणी असा केविलवाणा, किळसवाणा, अगतिक करून सोडणारा अनुभव आलेला असेल, अन् आपण तो कुणाशीच बोललेलो नसू, तर मुलीची अतिप्रचंड काळजी आपल्याला वाटू शकते किंवा सगळ्या जगात चांगुलपणावर विश्वास ठेवावा, आशेनं भविष्याची स्वप्नं बघावीत किंवा जवळच्या नातेवाईकांवर विसंबायला हरकत नाही, असा दिलासाच तुमच्या पत्नीला वाटत नसेल तर?
म्हणजे हा नाजूक प्रश्न चच्रेला घ्यायच्या आधी तुम्हाला किती ‘होमवर्क’ करायचंय याचा अंदाज आला तरी पुष्कळ. स्वतसाठी तर आत्मपरीक्षण गरजेचं आहेच, पण तुमच्या पत्नीचं बालपण, कुटुंब, त्यांचे तेव्हाचे अन् आताचे नातेसंबंध या सगळ्याबद्दल तुम्हाला प्रांजळपणे विचार करायचाय. मग करू आपण चर्चा पुढं काय पावलं उचलायची याबद्दल.
डॉ. वासुदेव परळीकर -paralikarv2010@gmail.com