आई-बाबांनी न सांगता अभ्यासाला बसणारी, शाळेत नेहमी पहिला नंबर पटकावणारी गार्गी. तीला कायम पालकांचे प्रोत्साहन तर मिळायचेच त्याबरोबरच लहानपणापासून घरादारात कौतुक व्हायचे. नुकत्याच झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतून पाचवीतल्या मुलींमधून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठीदेखील गार्गीची निवड झाली. स्टेजची भीती वाटणाऱ्या गार्गीने स्पर्धेत भाग तर शिक्षकांच्या आग्रहापोटी घेतला, राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोहचली पण ती, तरीदेखील तीला स्वत:च्या वक्तृत्वाबद्दल आणि एकूणच स्पर्धेबाबत भीती वाटत होती. तीची यशाची व्याख्या वेगळी होती आणि दरवेळी आपला पहिलाच नंबर आला पाहिजे आणि तो नाही आला, तर आपल्यात कमतरता आहे, असा तीने ग्रह करुन घेतला होता. त्यामुळे ती जे करायची ते उत्कृष्ट जरी असले तरी ते करीत असताना तीच्यावर मोठ्ठे दडपण यायचे, तिला चिंता वाटायला लागायची.
अक्षयलादेखील अशीच भिती आजही वाटते, ती म्हणजे लिफ्टची. तो आज दहावीत जरी असला तरी चवथीतील तो प्रसंग लिफ्ट दिसली की, त्याला आजही आठवतो आणि जर बरोबर कोणी नसेल, तर तो लिफ्टने जाण्याचे टाळतो. त्या दिवशी त्याचा शेवटचा पेपर होता, त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर करायचे बेत आखतच तो शाळेत जाण्यासाठी म्हणून तो लिफ्टमध्ये आला, एकटाच होता तो लिफ्टमध्ये, लिफ्ट खाली येत होती आणि अचानक ती थांबली. अक्षय गोंधळून गेला. काय करायचे काहीच कळेना त्याला. काहीच क्षण गेले, पण तेवढय़ातच तो घामाघूम झाला आणि लिफ्ट सुरु झाली, तळमजल्याला आली आणि अक्षय लिफ्टमधून बाहेर आला, तेव्हा तो घामाने चिंब भिजला होता. तसाच तो परिक्षेला गेला, पण त्याला पेपर उगाचच अवघड गेला. सगळं येत असून लिफ्टमधली भीती त्याच्या मनात खोलवर जाऊन बसली होती. तो दिवसच अक्षयला नकोसा झाला. या सगळ्या प्रसंगामुळे अक्षय आजही एकटा लिफ्टने जायचे टाळतो. अशा प्रकारेच उंचीचे भय तर पाण्याची भीती, कोणाला अंधाराची तर कोणाला अतिउजेडाची भीती असे नानाप्रकार असतात. भीती ही थोडय़ाफार प्रमाणात नैसर्गिक अशी भावना असली,तरी पुढे जाऊन या भितीची चिंता व्हायला लागते आणि ती व्यक्ती चिंतातूर होत जाते, प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक घटनांमध्ये चिंता करायची सवयच लागून जाते, एक प्रकारचा मानसिक रोगच होतो तो. भीतीतून पुढे  जाऊन वाढणाऱ्या या विशिष्ट प्रकारचा चिंतारोग (फोबीया) होतो.त्या-त्या चिंतेने, भीतीने मानसिक स्वास्थ्य बिघडते,त्यातून एखादी गोष्ट टाळण्याकडेदेखील कल वाढू लागतो.
लोकांमध्ये मिसळायला,मैत्री वाढायला-मैत्री करायला आणि  मित्रमैत्रीणींशी गप्पा मारण्याचा राधीकाला फोबीया आहे, तर एकटे राहण्याचा शौनकला. फोबीयांची एक भली मोठी यादी तयार होऊ शकते, त्यामध्ये जनावरे, पाणी, सुई, रक्त, इंजेक्शन, डॉक्टर, हॉस्पीटल, नवीन तंत्रज्ञान, रस्ता ओलांडणे, निर्णय घेणे, एखाद्या व्यक्तीशी बोलणे, जाड होणे, वारा, पाऊस, आग, एखादा ठरावीक वास, नापास होणे असे एक ना अनेक प्रकार येतात. पण यावर मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांच्या मदतीने मात करता येऊ शकते.
एखाद्या विषयाची तयारी पक्की असेल तर आपल्या कामाबाबत मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसते, पण अनेकदा आत्मविश्वासाचा अभाव निर्माण झाला की, भीती आणि चिंता या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जाऊ लागतात. आत्मविश्वास वाढवला किंवा तज्ज्ञांची मदत घेतली तर या वर्तन समस्येतून आपण बाहेर पडू शकतो.

वस्तू, व्यक्ती, विचार, बंद असलेली खोली, उंची, पाणी, साप याबरोबरच विशीष्ट वेळ आणि विशिष्ट गोष्टीतून विशिष्ट प्रकारचा चिंतारोग निर्माण होतो. त्यावर जर मात करायची असेल तर त्यासाठी समुपदेशनाबरोबरच वेगवेगळ्या थेरपींचा अवलंब केला जातो. काही वेळा योग्य ते प्रशिक्षण आणि गरज असल्यास औषधांचा उपयोग ही वर्तन समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
डॉ. रोहन जहागीरदार, मानसोपचारतज्ज्ञ