मानस मैत्रिणीच्या कुटुंबाबरोबर दोन दिवसांच्या सहलीला गेला. मानस सहलीला जाणार आहे, हे त्याच्या घरी माहीत होते, पण तो मैत्रिणीच्या कुटुंबाबरोबर जाणार आहे, हे माहीत नव्हते. मानसच्या क्लासची सहल आहे याच समजुतीत घरची मंडळी होती, आणि त्यानेही घरच्यांना खरे काय ते पुरते न सांगता अंधारातच ठेवले होते. मानसने मुलींशी बोलू नये, मुलींशी मैत्री करू नये अशा विचारांचे वातावरण त्याच्या घरात होते. त्यामुळे त्यांनी मानसला केवळ मुलांच्याच शाळेत खूप प्रयत्नपूर्वक प्रवेश घेतला होता. तर झाले असे, की मानस सहलीला गेला असतानाच त्याच्या बाबांना तो मित्रांबरोबर नाही, तर मैत्रिणीच्या कुटुंबीयांबरोबर गेला असल्याचे समजले. झाले! त्याच्या घरी धुसफूस आणि आरडाओरडा सुरू झाला. ‘एकुलत्या एक मुलाकडे तुझे लक्ष नाही’, असे म्हणत त्याच्या बाबांनी आईवर खापर फोडले, तर दुसऱ्या बाजूला ‘वडील म्हणून तुमची काय जबाबदारी’, असे म्हणत आईने बाबांना धारेवर धरले. यातच दोन दिवस गेले आणि ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी मानस घरी परत आला. सहलीहून आनंद घेऊन आलेल्या मानसला घरातील वातावरण चांगलेच तापले असल्याची जाणीव घरात पाऊल टाकताक्षणीच झाली! घरात चांगलाच अबोला नांदत होता! मानसने आल्यानंतर आईला काही सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केलाही. पण आई त्याला टाळू लागली. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आल्यानंतर त्यांनीही तसेच केले. आई-बाबांनी मिळून मानसला त्याच्याशी न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यातच एक-दोन दिवस गेले. मानसला काय करावे, हेच सुचेना. तो अगदी अस्वस्थ झाला. या दोन दिवसांत त्याला कितीदा तरी रडायला आले! तिसऱ्या दिवशी त्याची आत्या काही कामामुळे त्यांच्या घरी आली. तिच्याशी बोलण्याच्या निमित्ताने घरातील अबोल्याचे कारण आईबाबांच्या धुसफुशीतून पुन्हा एकदा बाहेर पडले. आत्याने आधी सगळी धुसफुस ऐकून घेऊन तिला चर्चेचे रुप दिले. मानसलाही आपलं काय चुकलंय ते समजलं. आपण आईबाबांना वेळीच विश्वासात घ्यायला हवे होते, हेही उमगले. आत्यासारखी समजूतदार मध्यस्थी मिळाल्यामुळे अखेर आई-बाबांचा मानसबरोबरचा अबोला संपला. मानसने यापुढे किमान आई-बाबांपासून तरी काहीही दडवून न ठेवण्याचा निश्चय केला. तसंच मुलींशी बोलल्याने, त्यांच्याशी मैत्री केल्यामुळे मानस बिघडणार नाही हे आईबाबांच्या लक्षात आले. अशी भिन्नलिंगी मैत्री वाईट नसून, त्यातूनदेखील मुलं घडत जातात, त्यांच्या मैत्रीत, नात्यांमध्ये पारदर्शकता येऊ शकते, हे आत्याने समजावून सांगितल्यामुळे अबोल्याच्या शिक्षेचा अजब तिढा सुटला.
शिक्षा करण्याच्या अजब आणि वेगवेगळ्या पद्धती अनेकदा पालक आणि शिक्षक शोधून काढत असतात. पण त्या शिक्षेमुळे मुलांच्या मानसिक विकासात बाधा येऊ शकते, याचा विचारच अनेकदा केला जात नाही. याचे उदाहरण म्हणजे अतिशला त्याच्या वडिलांनी केलेली अघोरी शिक्षा. तो शाळेत अभ्यास करीत नाही, मित्रांमध्ये वेळ वाया घालवतो, घरात त्याचा पाय टिकत नाही, अशी एक ना अनेक कारणे देत अतिशच्या वडिलांनी एक दिवस त्याला चक्क पंख्याला उलटे बांधले आणि पंखा सुरू करण्याची भीती घातली. अतिशची आई आणि बहीणही वडिलांच्या संतापाला घाबरून बाप-लेकांच्यामध्ये पडू शकल्या नाहीत. या विचित्र शिक्षेमुळे अतिशवर व्हायचा तोच परिणाम झाला. तो घरातून शक्य तेवढा काळ बाहेर राहू लागला. त्याचे अभ्यासावरचे होते- नव्हते तेदेखील लक्ष उडाले. आधी मित्रांमध्ये रमणारा अतिश आता एकटाच अबोलपणे कुठेतरी भटकू लागला. त्याला केलेली ती शिक्षा, त्या शिक्षेने दिलेली अपमानाची जाणीव त्याच्या या पुढच्या अधोगतीच्या मुळाशी होती.
प्रत्येकाकडून काही ना काही चुका घडतातच, हे अशा वेळी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पाल्याकडून झालीच एखादी चूक तरी त्यावर शिक्षेपेक्षा सांगोपांग चर्चेची मात्रा अधिक उपयुक्त ठरते हे नक्की. त्यातही चूक केलेल्या व्यक्तीला तिचे मुद्दे मांडण्याची योग्य संधी देणे आवश्यकच. प्रसंगी समुपदेशकही ही चर्चा घडवून आणण्यात मदत करू शकतील. चुकांपेक्षा त्यांतून सावरण्याची संधी मोठी असते. शिक्षा नव्हे तर आपुलकीचे आणि आश्वासक शब्दच ती संधी देऊ शकतात!