चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय
आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते हे पाहूया या लेखात-    
निअॅसिन आणि कोलेस्टेरॉल
औषध कंपन्यांना महागडा धडा
निअॅसिन म्हणजे व्हिटॅमिन बी ३ अनेक वर्षे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगात आहे. नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे त्याचे फारसे दुष्परिणाम नाहीत. काही वर्षांपूर्वी निअॅसिनच्या उपयोगामुळे रक्तामधील ‘एच.डी.एल.’ म्हणजेच चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते असे लक्षात आले आणि त्यामधूनच नवीन औषध निर्माण करण्यासाठी अनेक मोठय़ा कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले. औषध क्षेत्रामधील बलाढय़ असलेल्या ‘मर्क’ कंपनीने २००७ मध्ये निअॅसिनवर महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्प सुरू केला. शेकडो रुग्णांवर परीक्षण केले गेले. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी विविध अंगांनी यावर संशोधन केले. निअॅसिन चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवत असल्यामुळे अमेरिकन एफ.डी.ए.नेदेखील त्यास मान्यता दिली. परंतु, काही महिन्यांपूर्वीच मर्क कंपनीने हा प्रकल्प बंद केला. कारण चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवूनसुद्धा वैज्ञानिकांच्या अपेक्षेप्रमाणे हृदयविकाराचा धोका मात्र कमी झाला नाही. या निष्कर्षांमुळे अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले. ‘नेचर मेडिसिन’ या प्रख्यात आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेमध्ये कोलेस्टेरॉलसंबंधी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेखात या विषयावरील सिद्धांत पुन्हा तपासून पाहण्याची गरज अधोरेखित केली गेली. अॅबट, फायझर, रोश, मर्क अशा कंपन्यांचे हजारो कोटी पाण्यात गेले. मानवी शरीरात चालणाऱ्या गुंतागुंतीच्या जैव रासायनिक प्रक्रियांच्या शृंखलांमध्ये केवळ एका कडीचा विचार करून चालणार नाही, तर एकात्म विचार करणे गरजेचे आहे, हे अधोरेखित करणारा एक महागडा धडा यातून मिळाला.
कोलेस्टेरॉल- वाईट आणि चांगलेही!
वास्तविक कोलेस्टेरॉल हा एक शरीराला आवश्यक असा नैसर्गिक घटक आहे. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ  नाही.
कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार
कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत.  ‘लीपीटॉर’ हादेखील याचाच एक प्रकार आहे. पण वाईट कोलेस्टेरॉल कमी करताना चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवता आले तर हृदयविकारांना अधिक प्रभावी प्रतिबंध होऊ शकेल, या आशेवर व्हीटॅमिन बी ३ म्हणजेच निअॅसिनचा उपयोग औषधात करण्याचा प्रयत्न मर्क कंपनीने केला. पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे चांगल्या कोलेस्टेरॉलच्या अशा कृत्रिमपणे वाढलेल्या प्रमाणामुळे रुग्णांना कोणताही अतिरिक्त फायदा झाला नाही आणि कंपनीचा प्रयोग असफल होऊन बारगळला.
केवळ आहाराचा कोलेस्टेरॉलशी संबंध मर्यादितच
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. एम. हेगडे यांच्या मते कोलेस्टेरॉलबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांच्या मते आहारातील स्निग्ध्1ा पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे. रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. पाश्चात्यांनी धोकादायक मानलेले ताजे खोबरेल तेल किंवा शुद्ध तूप यासारखे घटक भारतीयांच्या आहारामध्ये अधिक योग्य आहेत, असेही डॉ. हेगडे यांचे मत आहे. यासंबंधी झालेल्या नवीन संशोधनामध्येही गाईचे तूप हे आरोग्यदायी असल्याचे निदर्शनास आले आहे. आहारातील तेलातुपाच्या एकूण प्रमाणाच्या दहा टक्क्य़ांपेक्षा कमी इतकेच शुद्ध तुपाचे सेवन केले तर चांगले कोलेस्टेरॉल वाढते, असे म्हैसूरच्या केंद्रीय अन्न संशोधन प्रयोगशाळेतील संशोधनात दिसून आले आहे.
आहारात आयुर्वेदाचाही विचार हवा!
याउलट खाद्यतेले ‘रीफाईंड’ करणे आणि त्यात पदार्थ तळण्याच्या प्रक्रियेमध्ये अनसॅच्युरेटेड तेलांमधील ‘ट्रान्स फॅट्स’चे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढू शकते. भारतीय आहार हा खऱ्या अर्थाने चौरस व संपूर्ण आहे. आहारात आयुर्वेदातील सहा रसांची संकल्पना महत्त्वाची आहे. आधुनिक आहारशास्त्र फक्त कबरेदके, चरबी, प्रथिने, कॅलरीज अशा मर्यादित बाबींचाच विचार करते. डॉ. मदन फडणीस यांच्या मते सर्व रसांनी युक्त सात्त्विक आणि मित आहार आरोग्य संवर्धन करतो. त्यांच्या मते गीतेमध्ये आहारावर केलेले भाष्य मोलाचे आहे. सात्त्विक, राजस व तामस आहाराचे विश्लेषण करताना राजस आहाराचे सात घटक सांगितले आहेत. यातील खारे, रुक्ष, दाहक, तीक्ष्ण असे गुणधर्माचे वर्णन फास्ट फूडला तंतोतंत लागू होते. राजस आहारामुळे रोगांचे वर्धन होते, असेही स्पष्ट सांगितले आहे. पाश्चात्य व आधुनिक विज्ञानाबरोबरच आयुर्वेदाच्या मोठी परंपरा असलेल्या प्राचीन विज्ञानातील आहारासंबंधीची जाण निश्चितच महत्त्वाची आहे. आधुनिक आहारशास्त्रज्ञांनी आयुर्वेदाचाही अभ्यास केल्यास पोषण व आहारातील आधुनिक ज्ञान अधिक विस्तारित होण्यास मदत होऊ शकेल. म्हणूनच कोलेस्टेरॉल आणि पर्यायाने रक्तदाब व हृदयविकार यांच्याकडे र्सवकष दृष्टीने बघण्याची गरज आहे.
मानसिक शांती महत्त्वाची!
आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Can Heart Attack Be Prevented by Aspirin
हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ऍस्पिरिनची गोळी कमी करते का? तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर, “उच्च रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल..”
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!