राज्यात सगळीकडे पाऊस सुरू झालेला नसला तरी अनेक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. काही जिल्ह्य़ांत तर पाऊस धो-धो पडत आहे. इतर ठिकाणी थोडय़ाच दिवसांत पाऊस बरसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि लहानसहान आजारांच्या कुरबुरी हे समीकरणच आहे. या तक्रारींमध्ये ‘आजीचा बटवा’च मायेची साथ देतो. यात आपल्या रोजच्या माहितीतल्याच वनस्पती आहेत. त्यांचे उपयोग समजून घेऊ या आणि खास पावसाळ्याच्या तयारीसाठी भरून ठेवू या आजीचा बटवा!
आले व सुंठ
उन्हाळा संपला आणि पाऊस येण्याची कुणकुण लागली की घराघरात आवर्जून आले आणले जाते. कित्येक जण आल्याचा एखादा तुकडा मातीच्या कुंडीत पुरून ठेवतात. पाऊस सुरू झाला की ते मातीच्या खाली छान फोफावते. पावसाची भुरभुर सुरू झाली की न चुकता हे आले चहात टाकले जाते. अनेक जण चहात सुंठदेखील घालतात. सुंठ म्हणजे वाळलेले आलेच असले, तरी त्यांच्या गुणधर्मामध्ये मात्र थोडासा फरक आहे. आले सुंठीपेक्षा थोडे अधिक उष्ण असते. त्यामुळे या दोन पदार्थापैकी अधिक कमी उष्ण पडण्याच्या दृष्टीने सुरक्षित सुंठपूडच. पावसाळ्याआधीच्या विषम वातावरणात हमखास ‘फ्लू’ची साथ येते. सर्दी, खोकला, तापाची कणकण ही साथ पाऊस सुरू झाल्यावरही टिकते. त्यावर सुंठ आणि आले अगदी उत्तम घरगुती औषध आहे. आल्याचा अर्धा चमचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून दोनदा किंवा तीनदा घेतले तर फ्लूमध्ये लवकर आराम पडायला मदत होते. पावसाआधीच्या विषम वातावरणात फ्लूसदृश आजारांना प्रतिबंधक औषध म्हणूनही आपण हे घेऊ शकतो. एकतृतीयांश चमचा सुंठपूड मधाबरोबर घेतली तरी चालू शकेल. आले आणि सुंठीचा ‘कफघ्न’ म्हणजे कफ कमी करणारा गुण मधामुळे वाढतो.

ज्येष्ठमध
पावसाळी वातावरणातील घसा खवखवण्याच्या तक्रारींवर ज्येष्ठमध हा चांगला उपाय आहे. ज्येष्ठमधाच्या लहान- लहान काडय़ा घरात आणून ठेवून गरज पडल्यास त्या चघळाव्यात. मात्र अधिक प्रमाणात ज्येष्ठमध चघळल्यामुळे काहींच्या शरीरावर सूज येऊ शकते. त्यामुळे त्याचा वापर घसा खवखवण्याचा त्रास झाल्यावरच करावा, त्रास नसताना शक्यतो करू नये. पण ज्येष्ठमध हे फक्त खोकला आणि धरलेला घसा यावरचेच औषध नाही. पित्त होणे (अ‍ॅसिडिटी), अन्न नीट न पचणे असा त्रासही पावसाळ्यात होत असतो. त्यावरही ज्येष्ठमधाच्या काडय़ा चघळून उपयोग होतो. ज्येष्ठमधाच्या थोडय़ाशा काडय़ांचे लहान तुकडे करून ते एक कप पाण्याबरोबर उकळून त्याचा काढा करता येतो. हा काढा दिवसातून तीन वेळा थोडा थोडा प्यायला तर पित्ताच्या तक्रारीवर आराम पडतो.

Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?

गवती चहा
पावसाळ्यासाठी तयारी करताना गवती चहाचे कंदही घरात कुंडीत लावता येतील. लहानशा कुंडीत लावूनदेखील काहीही कष्ट न घेता गवती चहाची पाने चांगली वाढतात. पावसात कधी तरी आल्याबरोबर गवती चहाची लहानशी जुडी चहात घालून तो वाफाळता चहा प्यायची मजा औरच! या ऋतूत घरात एकदा तरी गवती चहाचा काढा होतोच. गवती चहादेखील कफ कमी करणारा आहे. त्याबरोबरच वात कमी करणारा म्हणूनही तो उपयुक्त ठरतो, पण चहात किंवा काढय़ात घालण्याव्यतिरिक्त गवती चहाचे घरगुती तेलही तयार करता येते हे फार जणांना माहीत नसेल. पावसाळ्यात अनेकांचे सांधे दुखतात, गुडघेदुखीही उफाळते. त्यावर गवती चहाचे तेल लावून आराम पडतो. गवती चहाची पाने चुरगाळून ती तेलात अगदी थोडा वेळ उकळावीत. हे तेल गार झाल्यावर ते गाळून बाटलीत भरून ठेवावे. तिळाचे तेल ‘वातघ्न’ असल्यामुळे ते यासाठी वापरले तर उत्तमच. पण साधे खोबरेल तेल वापरूनही चालेल.

तुळस
तुळस तर अगदी बारा महिने घराच्या गॅलरीत किंवा अंगणात थोडय़ा मातीत चांगली वाढणारी वनस्पती. या वनस्पतीचे ‘अ‍ॅण्टिव्हायरल’ गुण उत्तम आहेत. विषाणूजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचा चांगला उपयोग होतो. आजारांना प्रतिबंध करणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी तुळशीची पाने रोज खाता येतील. तुळशीच्या पानांचा साधारणपणे १ ते २ चमचे रस किंवा तेवढा रस निघेल इतकी कच्ची पाने खावीत. नाक चोंदणे, छातीत कफ साठणे यासाठी तुळशीची पाने गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी.

पुदिना
पावसाळी वातावरण झाले की मंडईत पुदिन्याच्या लहान लहान जुडय़ा मुबलक प्रमाणात येतात. ताजेतवाने करणाऱ्या गंधाचा पुदिना पोटासाठी खूप चांगला. पावसाळा आणि अपचनाच्या तक्रारी हे समीकरणच आहे. या तक्रारी कमी करण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठीही पुदिन्याचा उपयोग होतो. पुदिन्याची पानेही तुळशीसारखीच कच्ची खाता येतील किंवा पानांचा १ ते २ चमचे रस काढून तो पिता येईल. चटण्या आणि सॅलड- कोशिंबिरींमध्येही पुदिन्याचा सढळ हस्ते वापर करावा. पुदिना अग्निप्रदीपन करतो, म्हणजेच भूक वाढवतो. पावसाळ्यात अनेकांना गॅसेस होण्याचा किंवा पोट डब्ब होण्याचा त्रास असतो. यासाठीही पुदिना हे उत्तम घरगुती औषध आहे.