मेंदूची वाढ साधारणत: २५व्या वर्षांपर्यंत सुरू असते. ३५व्या वर्षांनंतर पेशी कमी होऊ लागतात. मेंदूमधील पेशींची संख्या प्रचंड असल्याने अशा रीतीने हळूहळू पेशी कमी झाल्यावर मेंदूच्या कामात फारसे अडथळे येत नाहीत. पण काही व्यक्तींमध्ये या पेशी झपाटय़ाने कमी होतात. या मुख्यत्वे बुद्धी आणि स्मृतीच्या पेशी असतात, या स्थितीला ‘डिमेंशिया’ म्हटले जाते.

याची लक्षणे काय असतात?
क्रमाक्रमाने व्यक्तीची स्मृती कमी होत जाते हे डिमेंशियाचे मुख्य लक्षण आहे. सुरुवातीला ही व्यक्ती याद्या करून काम भागवायला बघते. नुकत्याच घडलेल्या घटना ते लवकर विसरतात. खूप वर्षांआधी घडलेले मात्र त्यांच्या लक्षात राहते, कारण त्या स्मृतीचा खूप सराव झालेला असतो. सामान कुठे ठेवले, जेवलो की नाही तेही लक्षात राहत नाही. घराबाहेर एकटे गेल्याने हरवण्याची शक्यता असते. कुणी तरी दिसल्यासारखे, बोलत असल्यासारखे भास होतात. आपले सामान चोरीला जात आहे, असा भ्रम होतो. काही व्यक्ती ‘हे घर माझे नाही’, ‘तू माझा मुलगा नाही’ किंवा कुणा दुसऱ्यालाच नवरा समजून व्यवहार करू लागतात. जेवणे, आंघोळ करणे ही कामे कशी करावी तेही विसरून जातात.
काही वेळेला स्मृती कमी होण्याआधी व्यक्तिमत्त्वात नकारात्मक बदल होतात. काही व्यक्ती कुटुंब आणि जगापासून अलिप्त होतात आणि कुठल्याही गोष्टीवर त्यांची प्रतिक्रिया नसते. काही व्यक्ती विक्षिप्त वागतात. कचऱ्यातले अन्न खाणे, अश्लील कृती करणे, घाणेरडे बोलणे इत्यादी.
याची कारणे काय आहेत?
बहुतेक वेळेला डिमेंशिया वृद्ध व्यक्तींमध्ये आढळतो. पंचाहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो, असे पाश्चात्त्य देशात आढळते. मात्र डिमेंशिया होण्याचे नेमके कारण माहीत नाही, अल्झायमर हा डिमेंशियाचाच एक प्रकार आहे. यात स्मृती ठेवणाऱ्या पेशी आधी कमी होतात. मेंदूला इजा झाल्यामुळे लहान वयातही डिमेंशियाची सुरुवात होऊ शकते. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यावर, संसर्गामुळे किंवा अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळेही असे घडते. आहारातून जीवनसत्त्व कमी झाल्यावर किंवा द्रवपदार्थ कमी झाल्यामुळे मेंदूचा कर्करोग, कर्करोगाच्या काही उपचारांनीही ही लक्षणे दिसतात.
उपाय काय?
मेंदूच्या पेशी कमी होण्याचे कारण माहीत असेल आणि आजाराची सुरुवात असेल तर कारणांवर योग्य उपचार करून व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते. कारण सापडले नाही किंवा कारणावर उपचार नसेल किंवा आजार पुढच्या पातळीवर गेला असेल तर या आजाराशी वेगळ्या पद्धतीने सामना करता येतो. मेंदूच्या पेशी कमी होण्याची प्रक्रिया थांबवण्याचे उपचार उपलब्ध झालेले नाहीत. पण पेशी नष्ट होण्याची गती कमी केल्यानेही आजाराची लक्षणे नियंत्रित होऊ शकतात.
रुग्णाला सुधारून त्यांची बुद्धी वाढवण्याचे प्रयत्न न करता त्याचे आयुष्य जमेल तितके सोपे आणि आनंदी करण्याकडे लक्ष घालावे. रोजचा दिनक्रम ठरवून तो एकसारखाच ठेवावा, सुट्टीच्या दिवशीसुद्धा. डिजिटल घडय़ाळ दिल्यामुळे वेळ कळणे सोपे होते. कुणी भेटायला आले तर ‘मी कोण आहे, ओळख बरं’ अशी परीक्षा न घेता, ओळख करूनच मग भेटावे. शक्यतो सवयीच्या ठिकाणीच ठेवावे. आíथक आणि कायदेशीर कागदपत्राचे व्यवहार संपुष्टात आणावेत.
टाळण्यासाठी काय करावे?
मेंदूचे आरोग्य चांगले असले तर हा आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यासाठी समतोल आहार, योग्य आराम, अमली पदार्थ टाळणे आणि ताणतणावाचे नियंत्रण महत्त्वाचे. कोडी सोडवणे, नवीन काही तरी शिकणे असे आव्हान देणारे व्यायाम मेंदूला निरोगी ठेवतात. लहान वयात डिमेंशिया झालेल्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबीयाची स्थिती दयनीयच म्हणावी लागते. त्यासाठी मेंदूवर दुष्परिणाम करणारे रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगासारखे आजाराचे योग्य उपचार घेतले पाहिजे. दुचाकी वाहन चालवताना आणि खेळताना (हॉकी, क्रिकेट, इ.) हेल्मेटचा वापर केल्याने मेंदू सुरक्षित ठेवता येतो. मेंदूत पसरणाऱ्या आजारांवर वेळीच उपचार घ्यावेत.
वाढत्या आयुर्मानामुळे डिमेंशिया हे लवकरच एक सामाजिक आव्हान बनणार आहे. त्यातून जोखीमभरल्या राहणीमानामुळे मेंदूच्या आजारांपासून तरुण पिढीही सुरक्षित नाही. स्मृतीबद्दल काही शंका वाटली तर लवकर तपासल्याने त्याचे निदान होऊ शकते आणि वेळीच काळजी घेतल्याने आजार आटोक्यात राहू शकतो.
डॉ. वाणी कुल्हळी – vbkulhalli@gmail.com

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व