01 October 2020

News Flash

गरज ‘बेबी फ्रेंडली’ प्रसूतिगृहांची!

सुरुवातीपासून आईचं दूध मिळणं हा बाळाच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. ते न मिळाल्यामुळे लाखो मुलांचं आरोग्य धोक्यात येतं. म्हणूनच स्तनपानाचं महत्त्व बिंबवण्यासाठी...

| August 20, 2013 06:44 am

आरोग्य, सौजन्य –
सुरुवातीपासून आईचं दूध मिळणं हा बाळाच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. ते न मिळाल्यामुळे लाखो मुलांचं आरोग्य धोक्यात येतं. म्हणूनच स्तनपानाचं महत्त्व बिंबवण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात (१ ते ७ ऑगस्ट) स्तनपान आठवडा साजरा केला जातो.
रेखा आपल्या एक महिन्याच्या बाळाला पूर्णत: वरचेच दूध पाजते. कारण तिचे दूध खूपच कमी झालंय आणि बाळ तर आता स्तनपान करायला नाकारत आहे. माझ्या क्लिनिकमध्ये आली तेव्हा खूप उदास होती डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या. आपण बाळासाठी कुठेतरी कमी पडत आहोत, असं सारखं तिला वाटत होतं. तिचे सिझेरियन झाले होते. पहिल्या तीन दिवसांत तिच्या बाळाला सुरुवातीचे चीक दूध अजिबात मिळाले नव्हते. ऑपरेशन झाले आहे, सलाइन चालू आहे, पोटात काही नाही व हलता येत नाही अशा अनेक कारणांनी ती बाळाला पाजू शकणार नाही असे त्या प्रसूतिगृहात तिला सांगण्यात आले होते. बाळाला जन्मल्यानंतर लवकरच वरचे दूध देण्यास सुरुवात झाली आणि बाळ बहुतेक वेळा पाळण्यात किंवा आजीच्या मांडीवर असायचं. नंतरही बाळाने स्तनपान नीट केलेच नाही आणि एका आठवडय़ातच बाटली चालू झाली.
पल्लवीचे बाळंतपण पंधरा दिवसांपूर्वी झालंय. हॉस्पिटलमधील नर्सने ‘तुझे निपल चपटे आहेत, त्यामुळे तू स्तनपान करू शकणार नाहीस’ असे सांगितले. सििरजने स्तनातून दूध काढून थोडे थोडे बाळाला द्यायला चालू केले. साहजिकच बाळाला काहीसे वरचे दूध पण मिळायला लागले. पल्लवीला चौथ्या दिवसापासून स्तन दाटण्याचा (Engorgement) खूप त्रास झाला. हॉस्पिटलमधील मावशीबाई, तिची आई, आत्या ते घरी मालिश करणाऱ्या बाई अशा सात-आठ जणींनी तिच्या स्तनातून चुकीच्या पद्धतींनी दूध काढण्याचा प्रयत्न केला. गरम पाण्याच्या पिशवीचा वारंवार शेक दिल्याने त्वचा अक्षरश: भाजून निघालेली. स्तनाग्रावर चिरा (crack nipples) पडलेल्या व शेवटी स्तनांमध्ये जंतूसंसर्ग होऊन ते लाल झाले (mastitis) तिच्या डॉक्टरांनी गोळ्या देऊन दूधच बंद करून टाकले.
अशा कितीतरी रेखा व पल्लवी आपल्या समाजामध्ये आहेत ज्यांना स्तनपानासाठी आधार, पािठबा, मार्गदर्शन व मदत मिळत नाही. चुकीचा सल्ला आणि गरसमज यामुळे बाळाला आपले दूध यशस्वीरीत्या देऊ शकत नाहीत.
आईच्या दुधातून बाळाला योग्य पोषण व रोगप्रतिकार शक्ती तर मिळतेच, पण दमा, अॅलर्जी, काही प्रकारचे कर्करोग पुढे जाऊन स्थूलता, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या भयानक रोगांपासून संरक्षण मिळते. आईला स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून (osteoporosis) संरक्षण मिळते. वजन कमी व्हायला मदत होते. असे अनेक फायदे बाळाला व आईला होतात. कुटुंबाचा वरच्या दुधाचा व बाळ वारंवार आजारी पडल्यामुळे होणारा खर्च कितीतरी पटीने वाचतो.
बाळाची मानसिक व बौद्धिक वाढ चांगली होते. स्तनपानाला वंचित राहिल्यामुळे लाखो मुलांचे आरोग्य धोक्यात येते. त्यांना जंतूसंसर्गाना सामोर जावे लागते. कुपोषणामुळे त्यांची योग्य वाढ व विकास होत नाही. स्तनपान व योग्य पुरक आहार दिल्यास एकपंचमांश पाच वर्षांखालील मुलांचे बालमृत्यू टाळता येतील.
यशस्वी स्तनपान होण्यासाठी प्रसूतिगृहाची खूप महत्त्वाची भूमिका असते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) व युनिसेफ (UNICEF) या जागतिक आरोग्य संघटनांनी १९८९ मध्ये प्रसूतीसेवांसाठी एक मार्गदíशका तयार केली, ज्यामध्ये यशस्वी स्तनपानाची दशपदी लिहिलेली आहे. या दशपदीचे यशस्वी स्तनपानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. स्तनपानाची सुरुवात प्रसूतिगृहांमध्येच होते. सुरुवातीच्या काळात आईला स्तनपानाबाबत मदत करणे, आधार देणे व तिचा आत्मविश्वास वाढविणे ही पूर्णपणे प्रसूतिगृहांची जबाबदारी असते. या काळात जर आईला चुकीचा सल्ला किंवा मार्गदर्शन मिळाले तर स्तनपानाचे प्रमाण कमी व्हायला वेळ लागत नाही.
जी प्रसूतिगृहे स्तनपानासंबंधीच्या दशपदी स्वीकारून त्यांचे तंतोतंत पालन करतील त्यांना ‘बेबी फ्रेंडली हॉस्पिटल’ (Baby Friendly Hospital Initiative) असे प्रमाणपत्र देण्याची योजना युनिसेफ, केंद्र सरकार, आरोग्य खाते, भारतीय प्रसूती तज्ज्ञांची संघटना (FOGSI) भारतीय बाल आरोग्य संघटना आणि ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (BPNI) या नामवंत संघटनांनी १९९२ मध्ये आखली. अशा बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये यशस्वी स्तनपानाचे प्रमाण लक्षणीय वाढते असे सिद्ध झाले आहे.
या दशपदी काय आहेत ते आपण पाहू या.
१. स्तनपानविषयक लिखित धोरण असावे.
२. प्रसूतिसेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना स्तनपान व शिशुपोषणाबद्दल प्रशिक्षण द्यावे. त्यांना माहिती असेल तरच ते मातांना चुकीचा सल्ला न देता योग्य मार्गदर्शन करतील, मातांना मदत करण्याची कौशल्ये त्यांच्याकडे असतील. डॉक्टर आहे याचा अर्थ त्यांना स्तनपानाबद्दलचे ज्ञान असते असे नाही. स्तनपान हा एक स्वतंत्र विषय असून त्यावर विशेष प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. प्रसूतिगृहातील नस्रेस व मावशीबाई याच पुष्कळदा आईला स्तनपानासाठी मदत करत असतात. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण होणे खूप आवश्यक आहे.  
३. गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाइकांना स्तनपान, शिशुपोषण व बालसंगोपनाबद्दल योग्य माहिती द्यावी. (antenatal classes) ज्यामध्ये त्यांना स्तनपानाचे फायदे, शिफारशी, पद्धती, येणाऱ्या अडचणी इ. गोष्टींची माहिती करून द्यावी. त्यामुळे आई प्रसूतीनंतर स्तनपान करण्यास प्रोत्साहित होते. जरी अडचण आली तरी कुठे मार्गदर्शन होईल हे तिला माहीत होते व शक्यतो वरचे दूध देण्याचे टाळते. आपल्याकडे घरातील ज्येष्ठ मंडळी महत्त्वाचे निर्णय घेतात. ते पण मग प्रसूतीनंतर स्तनपानासाठी प्रोत्साहन, पुरेसा वेळ व पोषक वातावरण मिळेल याकडे लक्ष देतात. त्यांचे बरेचसे गरसमज दूर होतात.
४. बाळाच्या जन्मानंतर इतर कुठलेही पेय किंवा खाद्यपदार्थ न देता, एक तासाच्या आत प्रथम स्पर्श व स्तनपानाची सुरुवात करावी. यावेळी बाळ स्तनपानास उत्सुक असते व त्या काळात ते स्तनपान छान घेते. सुरुवातीचे चीक दूध कमी असले तरी ते फार पौष्टिक असते व बाळाला पुरेसे असते. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर असल्याने बाळाचा जंतूंपासून बचाव करते आणि एका अर्थाने ती बाळाची पहिली लसच असते.
किती प्रसूतिगृहे एका तासाच्या आत स्तनपान करण्यास आईला प्रोत्साहित करतात? (सिझेरियननंतर रेखाचं काय झालं ते आपण पाहिलंच आहे). सिझेरियननंतर निदान चार तासांच्या आत स्तनपानाची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असते. आई जरी बाळाला धरू शकत नसली तरी नातेवाइकांना शिकविल्यास ते आईला व बाळाला दर दोन-दोन तासांनी स्तनपानास मदत करतील. या काळात बाळाला दुसरे काही पेय दिले (मध, साखरेचे पाणी, वरचे दूध इ.) तर बाळाला जंतूसंसर्गाचा धोका संभवतो. चीक दूध न मिळाल्याने प्रतिकारशक्ती नसते. शिवाय बाळाचे पोट भरल्यामुळे ते स्तनपानासाठी निरुत्साही होतं. पहिल्या दोन-तीन दिवसांत आईने व नातेवाइकांनी संयम पाळणे, वारंवार बाळाला आईचे दूध पाजणे व बाहेरील दूध पाजण्याचे कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. हा काळ जर नातेवाइक व आई यांची प्रसूतिपूर्व मानसिक तयारी झाली असेल व प्रसूतिगृहातील आरोग्य कर्मचारी प्रशिक्षित असतील तरच समर्थपणे पार पडतो.  
५. प्रत्येक मातेला प्रसूतीनंतर स्तनपानाची योग्य स्थिती व पकड, दूध काढण्याची व साठवण्याची पद्धत याचे प्रशिक्षण द्यावे. जर बाळ आईपासून दूर असेल तर बाळापर्यंत दूध पोहोचविण्याची व्यवस्था करावी.
सुरुवातीच्या चार-पाच दिवसांत स्तनपानास अनेक समस्या उद्भवू शकतात. (पल्लवीला झाल्या तशा). वेळेवर त्याचे निरसन झाले तर स्तनपान हा एक सुखदायी अनुभव होतो. या काळात बाळाची स्थिती, पकड इ. गोष्टींसाठी स्तनपानतज्ज्ञांकडून निरीक्षण झाले पाहिजे.
६. सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला पूर्णपणे निव्वळ स्तनपान द्यावे. बाळघुटी, ग्राइपवॉटर, बाळकडू इ. देण्याची आवश्यकता नसते. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर स्वच्छतापूर्वक योग्य ताजा रूचकर मऊसर घट्टसर असा घरी बनवलेला पूरक आहार बाळाला चालू करावा. मात्र पूरक आहाराबरोबर कमीत कमी दोन वर्षांपर्यंत स्तनपान चालू ठेवावे.
७. बाळाला सतत आईच्या कुशीतच ठेवावे. त्यामुळे बाळाच्या गरजेनुसार आईला दूध पाजता येते, बाळ उबदार राहते व जंतूसंसर्गाचा धोका कमी होतो. बाळाला पाळण्यात किंवा दुसऱ्या बिछान्यात ठेवणे योग्य नाही. प्रसूतिगृहामध्य पाळणा न ठेवता आईचा बिछानाच मोठा असावा.
८. बाळाच्या मर्जीनुसार पाहिजे तेव्हा व पाहिजे तेवढा वेळ स्तनपान द्यावे. त्याला घडय़ाळाचे बंधन नसावे.
९. बाटली, चोखणी पावडरचे दूध आणि डबाबंद बालान्न यांची कोणतीही जाहिरात, प्रचार करू नये. कळत नकळत आईचा आत्मविश्वास कमी करण्यास या गोष्टी कारणीभूत होतात. मी असंही बघितलं आहे की प्रसूतीनंतर बाकीच्या औषधांबरोबर पावडरच्या दुधाचा डबापण नातेवाइकांना आणण्यास सांगण्यात येतो. नस्रेसच्या काऊंटरमागील भिंतीवर किंवा बेबीकार्डवर उल्लेखिलेल्या वस्तूंची जाहिरात असते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रसूतिगृहांनी ‘फ्री सॅम्पल’च्या स्वरूपात किंवा स्वस्त किमतीमध्ये या वस्तू देऊ नयेत.
१०. आईला स्तनपानासाठी कुटुंबात व समाजात पोषक वातावरण, मदत, माहिती व पािठबा मिळेल याची व्यवस्था करणे ही प्रसूतिसेवांची जबाबदारी आहे.
घरी गेल्यावर आईला बऱ्याच अडचणी येऊ शकतात, त्यावेळी तिला स्तनपानतज्ज्ञांकडून मदत मिळण्याची व्यवस्था प्रसूतिगृहाने केली पाहिजे. मुंबईमध्ये ‘मदर सपोर्ट ग्रुप’ अशा मातांना मदत करतो. असे गट सगळीकडे असणे खूप गरजेचे आहे.
सध्या १५६ देशांमध्ये वीस हजारहून जास्त प्रसूतिगृहे ‘बेबी फ्रेंडली’ प्रमाणपत्रे असलेली आहेत. भारतात फक्त दहा टक्के प्रसूतिगृहे सध्या बेबी फ्रेंडली आहेत. जोपर्यंत हे प्रमाण वाढत नाही तोपर्यंत यशस्वी स्तनपानाची चळवळ यशस्वी होणार नाही. जर सरकारनेच प्रयत्न केले तर त्याला वेळ लागणार नाही. समाजातच स्तनपानाच्या महत्त्वाची जाणीव वाढली व सर्व गर्भवती महिलांनी अशाच बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्येच बाळंतपणाचा आग्रह धरला तरच या प्रसूतिगृहांना हे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.
भावी माता-पिता बाळाची चाहूल लागली की प्रसूतिगृहाची पायरी चढतात. प्रसूतिगृहाची निवड करताना आपण बऱ्याच गोष्टींचा आढावा घेतो. आपल्या मत्रिणींनी, शेजाऱ्यांनी किंवा नातेवाइकांकडून एखाद्या नामवंत डॉक्टरचं नाव सांगितलं जातं. ते घरापासून किती लांब आहे, तिथे स्वच्छता किती आहे, खर्च किती येईल, ते फाइव्ह स्टारसारखे दिसते का? अशा अनेक गोष्टी बघितल्या जातात. पण दुर्दैवाने त्या प्रसूतिगृहात स्तनपानाचे धोरण काय आहे, तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्तनपानाबाबतचे प्रशिक्षण झालेले आहे का, तेथे स्तनपानतज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते का? हे आपण विचारात घेत नाही. स्तनपान हे नसíगक आहे, पण प्रत्येक आईला ते जमेलच असे नाही. माझ्या मते स्तनपान ही कला आहे, शास्त्र आहे आणि ते शिकूनच आत्मसात करावे लागते. त्यासाठी स्तनपानतज्ज्ञांची आवश्यकता असते. समाजाची मानसिकता बदलली की, आपोआपच आपली भावी पिढी ही निरोगी, सुदृढ व सक्षम होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2013 6:44 am

Web Title: need for baby friendly maternity home
Next Stories
1 महिलांमधील लठ्ठपणा
2 स्मार्टफोन लहान मुलांना हानिकारक
3 मानसस्वास्थ्य : लक्षवेध
Just Now!
X