आग्नेय आशियातील दर तीन प्रौढांमागे एकाला उच्च रक्तदाबाचा विकार आहे, उच्च रक्तदाबामुळे अनेकांचा मृत्यू होत असल्याने या आरोग्य समस्येबाबत जागरूक राहण्याची गरज आहे असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. उद्या म्हणजे ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात असून त्यात उच्च रक्तदाब ही मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जगात किमान एक अब्ज लोकांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे व त्याचे प्रमाण लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढते आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना १९४८ मध्ये ७ एप्रिलला झाली होती त्यामुळे तो जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. आग्नेय आशियात ३६ टक्के प्रौढांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे व भारतात  त्याचे प्रमाण हे ३० टक्के आहे. आग्नेय आशियात दरवर्षी १५ लाख लोक उच्च रक्तदाबाने मरतात, त्यामुळे ह्रदयविकार व पक्षाघाताइतकाच हा विकार घातक आहे. २०११-१५ उच्च रक्तदाबामुळे कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशात ७.३ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होते कारण त्यामुळे लोकांच्या कामावर परिणाम होत असतो. १९६० मध्ये भारतात उच्चरक्तदाबाच्या लोकांचे प्रमाण ५ टक्के होते ते १९९० मध्ये ते १२ टक्के झाले तर २००८ मध्ये ते ३० टक्के झाले. उच्च रक्तदाबाने संपूर्ण जगात दरवर्षी ९४ लाख लोक मरतात तर सध्या १ अब्ज लोकांना उच्च रक्तदाबाचा विकार आहे. आफ्रिकेत रक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे. अमेरिकी प्रदेशात ते कमी म्हणजे ३५ टक्के तर आग्नेय आशियात ३६ टक्के आहे. समतोल आहार, मिठाचे अगदी कमी सेवन, नियमित व्यायाम, अल्कोहोल सेवन टाळणे, धूम्रपान सोडमे या मार्गानी उच्च रक्तदाब कमी होतो.