News Flash

निमित्त : बहुआयामी कांदा!

कांदा हा सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक. कांद्याच्या भाववाढीमुळे सध्या सगळेच जण हैराण झाले आहेत.

कांदा हा सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक. तो नसेल तर स्वयंपाक कसा करायचा, असाच प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. त्यामुळेच कांद्याच्या भाववाढीमुळे सध्या सगळेच जण हैराण झाले आहेत.

गेले दोन आठवडे देशभर कांद्याच्या प्रचंड, अति प्रचंड भाववाढीमुळे सर्वच राज्ये व केंद्रातील सरकारमध्ये अन्नपुरवठामंत्री हैराण झाले आहेत. आपल्या भारतीय जीवनपद्धतीत अत्यंत अल्पसंख्य असणाऱ्या जैन मंडळींचा अपवाद वगळता सर्वाकरिताच कांदा हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर व अनेकानेक संत होऊन गेले. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ अशी म्हण आहे. मला मात्र ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे सांगणारा सावतामाळी खूप भावतो. जी मंडळी वर्षांनुवर्षे भाजी मंडीत जात असतात, त्यांना सर्वात स्वस्त भाजी कोणती असे विचारल्यावर कांदा हे उत्तर चटकन ऐकायला येते. एक दिवस मी नाशिककडील एक कार्यशाळा आटोपून शिरूर-घोडनदीमधील प्रसिद्ध कांदा बाजारपेठेच्या जवळ आलो. शेजारीच शेतकऱ्यांनी खूप खूप त्रस्त होऊन फेकलेले कांद्यांचे ढीगच्या ढीग पडलेले होते. कारण कांद्याचे भाव त्यावेळेला विश्वास न ठेवण्याइतपत खालच्या पातळीवर म्हणजे ३० पैसे किलो एवढे खाली गेले होते.
तुमच्या-आमच्या सर्वाच्याच रोजच्या जेवणात कांदा व बटाटा हे मस्ट, मस्ट असे पदार्थ आहेत. गंमत म्हणजे हे दोन्हीही पदार्थ मूळ भारतीय नव्हेत. लसूण भगिनी ही पक्की भारतीय आहे. नुकताच चातुर्मास सुरू झाला आहे. या चातुर्मासात विशेषत: श्रावणात सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार, चतुर्थी, एकादशी, धार्मिक मंडळी मोठय़ा संख्येने उपवास करतात. त्यांना परदेशी कांदा व अस्सल देशी लसूण चालत नाही. विनोदाची बाब अशी की त्यांना उपवासाला पूर्णपणे परदेशी असलेला बटाटा वा साबुदाणा चालतो, चीनमध्ये जन्म झालेला चहा चालतो. असो. हा वादाचा विषय बाजूला ठेवून कांद्याच्या व्युत्पत्तीकरिता कंदर्प या शब्दाकडे वळू. ज्याचा वास कधी लपत नाही त्याला कंदर्प म्हणतात. इंग्रजी-ओनियन, लं. अलिअम्, मराठी- कांदा, हिंदी- प्याज, संस्कृत- पलांडू, गुजराती- कान्दो, कानडी-उळ्ळेगड्डे इत्यादी नावे आहेत.
भारतात कांदा सर्वत्र पिकतो. कांद्याचे गड्डे जमिनीत येतात. कांद्याची रोपे सुमारे हातभर उंच वाढतात. ती सरळ असून, त्याच्या पाती बारीक नळ्यांसारख्या असतात. कांद्यांचे बी काळे असून, बंदुकीच्या दारूप्रमाणे दिसते. कांद्यामधून देठ निघतो तो कोवळा असताना त्याची भाजी करतात. कांद्यात तीन जाती आहेत. पांढरा, तांबडा व पिवळा. यापैकी तांबडा कांदा जास्त तिखट असतो. दक्षिण भारतात चेन्नई किंवा जुन्या मद्रास प्रांतात गोड चवीचा छोटा कांदा मोठय़ा प्रमाणावर पिकविला जातो. अशा कांद्याचा वापर कांदा सांबारकरिता तसंच विशेष जेवणाकरिता करत असतात.
आपल्या नेहमीच्या संवादात मित्रमंडळीत, गप्पाटप्पांत ‘तुझ्या डोक्यात काय कांदे- बटाटे भरले आहेत काय?’ असा वाक्प्रचार-टोला ऐकविला जातो. असा हा कांदा भारतात सर्वत्र व महाराष्ट्रात नाशिक लासलगाव या भागात मोठय़ा प्रमाणावर पिकतो. कांदा आणि लसूण यांचे अखिल भारतीय स्तरावर संशोधन केंद्र पुणे जिल्ह्य़ात राजगुरूनगर येथे आहे. तुम्हा-आम्हाला सर्वानाच हव्याहव्याशा असणाऱ्या या कांद्याने तसेच हिमाचल प्रदेशात सफरचंदाने, सार्वत्रिक निवडणुकांत खूपच उलथापालथ केलेली आहे. एक काळ दिल्लीमध्ये अचानक कांद्याच्या भावात प्रचंड वाढ झाली व त्यामुळे एका मोठय़ा अखिल भारतीय पक्षाला नगरपालिकेच्या निवडणुकीत हार खावी लागली. महाराष्ट्रातील थोर साहित्यिक, पत्रकार, राजकारणी व संयुक्त महाराष्ट्राचे अग्रणी नेते आचार्य प्र. के. अत्रे यांच्या प्रचंड विनोदी भाषणात कांदा शब्दाचा उल्लेख झाला नाही असे क्वचितच घडत असे.
आपल्या समाजातील विविध धर्मीयांची लोकसंख्या किती? याची आकडेवारी बुधवार दि. २६ ऑगस्टच्या सर्वच प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली आहे. या वृत्ताप्रमाणे देशातील लोकसंख्येत जैन मंडळीचा हिस्सा फक्त चार दशांश म्हणजे पंचेचाळीस लाख एवढाच आहे. जैन धर्माचे संस्थापक व महानुभाव पंथाचे महान आचार्य चक्रदेव महाराज यांच्या मते; कांद्यामुळे मानवी मनाच्या कामवासना बळावतात. त्यामुळे ज्यांना आपल्या मनावर ताबा मिळवायचा आहे; संतसमागम करावयाचा आहे, त्यांच्याकरिता कांदा हा कटाक्षाने निषिद्ध मानला जातो. याउलट वैद्य खडीवाल्यांच्याकडे जेव्हा एखादा पुरुष रुग्ण आपल्या शुक्र, ओजसंबंधित अति दुबळेपणाची समस्या घेऊन येतो; तेव्हा त्याला ते मधात सात दिवस भिजवलेल्या टोचलेल्या एका कांद्याचा रोज वापर करा, असा सांगावा देतात. त्यामुळे पुरुषांतील नपुंसकता खात्रीने कमी होते.
परमवाचक व खवय्या मंडळींना कांद्याच्या विविध पदार्थाबद्दल मी सांगावयास पाहिजे असे नाही. तरी पण आलटून पालटून कांद्याचे पुढील पदार्थ फक्त कांदेनवमीलाच खा, असे नव्हे तर जरूर रोज खा. दिवसेंदिवस मुंबई, पुणे यांसारख्या मोठय़ा किंवा लहान शहरात खूप खूप ‘खाऊ गल्ल्या’ दिसून येतात. बहुतेक खवय्या मंडळी कांद्याची भजी खात असतात. मुंबईतील दादर पश्चिम येथील मामा काणे यांच्या ‘स्वच्छ उपाहारगृहात’ कांद्याचे थालीपीठ व कांदेभाताला खूप मोठी मागणी असते. आपल्या दैनंदिन जीवनात सायंकाळी ज्वारीची भाकरी व त्याबरोबर कांद्याचे पिठले असा प्रघात आहेच. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे या भागांतील शेतमजुरांना दुपारच्या जेवणात भाकरी, चपातीबरोबर वांग्याचे भरीत आठवणीने दिले जाते. त्यात शेंगदाणे व कांद्याची पात असतेच. कांद्याचे उपीट, उपमा, कांद्याचे पोहे हे अनेकांच्या सकाळच्या न्याहरीचा अविभाज्य भाग बनून गेलेला आहे. तुमच्या जेवणाचे बजेट छोटे असले तर ज्वारी, बाजरीच्या भाकरीबरोबर दह्य़ातील कांद्याची कोशिंबीर किंवा कांदा, चिंच आणि लाल तिखट असलेली चटणी काय रंगत आणते, हे मी सांगावयास हवे का? जेव्हा मोठमोठय़ा लग्न, मुंज, वाढदिवस अशा समारंभात दुपारचे पक्वानांचे जेवण झाले की, रात्री खूप काही जेवण्यापेक्षा कांदे-बटाटा रस्सा, ओल्या खोबऱ्याची चटणी व ज्वारीची भाकरी पुरेशी असते. इति कांदा पुराण! समस्त श्रमसंस्कृती जपणाऱ्या, कांदा पिकवणाऱ्या बळीराजाला या वैद्याचे सहस्र प्रणाम!
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:19 am

Web Title: onion
टॅग : Onion
Next Stories
1 विचित्र सवयींचे आजार
2 रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि परिणाम
3 संकटांमुळे येणारे आजार
Just Now!
X