22 January 2021

News Flash

ठिसूळ, ठिसूळ, ठिसूळ किती?

‘ऑस्टिओपोरोसिस’ हा शब्द हल्ली अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतो. ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणजे हाडे ठिसूळ होणे.

| December 30, 2014 06:26 am

त्रास काय होतो?
* अंग दुखणे
* लवकर थकणे
* हाडे ठिसूळ होऊन अगदी लहानशा आघातानेही ‘फ्रॅक्चर’ होणे
‘ऑस्टिओपोरोसिस’ हा शब्द हल्ली अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतो. ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणजे हाडे ठिसूळ होणे. हाडे ठिसूळ होऊन लवकर फ्रॅक्चर होण्याचा हा त्रास बदललेल्या जीवनशैलीबरोबर वाढला आहे. प्रामुख्याने चाळिशीनंतर होणारा हा त्रास कसा टाळता येईल आणि त्रास सुरू झालेल्यांनी काय करावे, याविषयी जाणून घेऊ या..
हाडे ठिसूळ कशी होतात?
हाडांचा गाभा प्रथिनांपासून बनलेला असतो. या गाभ्याला बळकटी देण्यासाठी त्यावर नैसर्गिकरीत्याच कॅल्शियमच्या क्षारांचे थर चढवले जातात. हाडांना व्यायाम जितका चांगला होत राहील, तितका त्यातील प्रथिने आणि कॅल्शियमचा साठा चांगला होतो. म्हणूनच ज्या हाडावर वजन पडत नाही, त्या हाडाची ताकद हळूहळू कमी होत जाते. तात्पर्य असे की, हाडांचा वापर जितका अधिक तितकी हाडे ठिसूळ होण्याची शक्यता कमी.

म्हातारपणी अधिक धोका का?
चाळिशी उलटल्यावर शरीरात स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या पातळीत बदल होतात. त्यामुळे हाडांवर साचणारा प्रथिने व कॅल्शियमचा साठा कमी होत जातो. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांची किंवा साधारणपणे त्याच वयात पुरुषांचीही हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते. वयस्कर व्यक्तींमध्ये व्यायाम आणि हालचाल कमी होत असल्यामुळे त्यांची हाडे लवकर ठिसूळ होण्याचा धोका असतो. वय वाढल्यावर व्यायाम कमी केला किंवा केला नाही तरी चालेल ही समजूत या अर्थाने चुकीची आहे. चलनवलन जितके सुरू राहील, तितकी हाडे मजबूत राहतात. त्यामुळे वयस्कर व्यक्तींनीही सोसवेल तितका व्यायाम नियमितपणे करणे आवश्यक आहे.
आहार, कोवळे ऊनही महत्त्वाचे
हाडे ठिसूळ होण्यापासून बचाव करण्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच योग्य आहाराचीही आवश्यकता आहे. आहारात प्रथिने आणि कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्त्व यांचे पुरेसे प्रमाण असायलाच हवे. दूध हा कॅल्शियमचा एक स्रोत आहे, तर काही मांसाहारी अन्नपदार्थामधून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. अन्नातून किंवा औषधी गोळ्यांच्या स्वरूपात ‘ड’ जीवनसत्त्व शरीरात गेल्यानंतर त्याचे शरीरात आवश्यक घटकात रूपांतर होण्यासाठी कोवळे ऊन अंगावर घेणे आवश्यक असते. सकाळी ७ ते १० या वेळातले कोवळे ऊन उत्तम. हे वाचून ‘उन्हात बसायला वेळ कुठे असतो’ अशी सबब अनेक जण पुढे करतील. पण व्यायामाच्या निमित्ताने उन्हात फिरण्यासाठी वेळ काढता येऊ शकेल.
ऑस्टिओपोरोसिस झालेल्यांसाठी..
ऑस्टिओपोरोसिस होण्यावर वैद्यकीय उपचार आहेत. यात औषधी गोळ्या आणि इंजेक्शनच्या स्वरूपात काही औषधे उपलब्ध आहेत. तसेच वर सांगितल्याप्रमाणे रुग्णांना योग्य आहाराबरोबर कॅल्शियम व ‘ड’  जीवनसत्त्वाच्या गोळ्याही सुचवल्या जाऊ शकतात. रुग्णाच्या प्रकृतीनुसार या औषधांचे प्रमाण बदलत असल्यामुळे ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
कॅल्शियमच्या गोळ्या
स्वत:च्या मनाने घेऊ नयेत
अनेक जण अगदी लहानपणापासून किंवा चाळिशीनंतर अचानकपणे स्वत:च्या मनानेच कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास सुरुवात करतात. पण अशा गोळ्या घेण्याचा सर्वाना फायदा होईलच असे नाही. विशेषत: मुतखडा होण्याची प्रवृत्ती असलेल्यांना कॅल्शियमच्या गोळ्यांचा त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांना कोणत्या प्रकारचे, किती कॅल्शियम द्यावे, किती दिवसांनी ते बंद करावे या गोष्टी डॉक्टर ठरवू शकतात. त्यामुळे अशा गोळ्या स्वत:च्या मनाने घेणे टाळावे.
– डॉ. मिलिंद गांधी, अस्थिरोगतज्ज्ञ
docmilind@gmail.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2014 6:26 am

Web Title: osteoporosis
टॅग Health It
Next Stories
1 इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली
2 योनिस्रावाच्या गुजगोष्टी..
3 कॅन्सर प्रतिबंध व आयुर्वेद – २
Just Now!
X