News Flash

मरणाची भीती!

आपल्याला कधीतरी मरण येणार, हा विचारही अनेकांना खूप नकोसा वाटतो. वयोवृद्धांच्या मनात हा विचार आल्यावर त्यांना काय वाटत असेल बरं?

आपल्याला कधीतरी मरण येणार, हा विचारही अनेकांना खूप नकोसा वाटतो. वयोवृद्धांच्या मनात हा विचार आल्यावर त्यांना काय वाटत असेल बरं? त्यातही एकाकीपणाही सोबतीला असेल तर?..

प्रश्न-
मी ७६ वर्षांचा आहे. माझी पत्नी काही महिन्यांपूर्वी निवर्तली. आमची दोन्ही मुले या शहरात राहात नसल्यामुळे आता मी एकटाच असतो. गेले काही दिवस एकच विचार माझ्या मनात घोळत आहे तो म्हणजे मरणाचा! पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आता लवकरच माझाही क्रमांक कधीतरी येणारच अशी जाणीव मन कुरतडायला लागली आहे. मला आत्ता मरावेसे निश्वितच वाटत नाही. सगळ्यांना असते तशी मलाही अगदी या वयातदेखील जीवनाची आसक्ती आहे. पण तरीही आता ती वेळ जवळ जवळ येत असल्यासारखे वाटते आणि भीती वाटू लागते. माझी मुले हे कदाचित समजून घेऊ शकणार नाहीत असे वाटल्यामुळे त्यांना कधी मनातले बोललो नाही. पण एखाद्या दिवशी अचानक माझा घरातच मृत्यू झाला तर?.. हल्लीच्या फ्लॅट संस्कृतीत सोसायटीमधल्या लोकांच्या ते लवकर लक्षात तरी येईल का?.. मुलांना ती बातमी कळेपर्यंत किती काळ गेला असेल..असे ना ना विचार मनात येतात.
उत्तर-
आताच तुमच्या पत्नी (इतक्या वर्षांच्या) प्रेमळ सहवासानंतर निवर्तल्या आहेत म्हणता. त्यांचं कुठलं काम किंवा इच्छा राहिली असेल, तर ती पुरी करायचा प्रयत्न करू या. त्यानं बरीचशी भीती कमी होईल. कारण त्यानं आपल्या जीवनातली अर्थपूर्णता कदाचित वाढेल आणि बऱ्याचदा आपला कुठेतरी अर्थ हरवलाय, असं वाटल्यानं मरणाची भीती वाटू शकते. मरणाची भीती अन् मरण्याची भीती, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मरणाच्या आधी होणाऱ्या वेदना अन् यातना यांची भीती या स्वाभाविक गोष्टी आहेत- अगदी ‘विश्वाचे आर्त माझ्या मनीं प्रकाशले’ असाच तो अनुभव असणार. जिथे शक्य असेल तिथे अशा परिस्थितीत औषध घ्यायला अजिबात कचरू नये, असं माझं मत आहे. दुसरं असं की जर तुम्हाला चालणार असेल तर थोडं थोडं घरकाम किंवा पाककृती करून बघितलं तर चांगलं वाटू शकेल. तुम्ही सध्या दिवसभर काय करता, अन् त्यातल्या कुठल्या वेळी तुम्हाला चांगलं वाटतं, केव्हा वाईट वाटतं, हे बघणं मोलाचं आहे.
तुम्हाला मरावंसं वाटत नाही, हे किती छान आहे! मरावंसं वाटणाऱ्या इतरांना परावृत्त करण्याचं काम तुम्हाला नक्कीच समाधान देऊ शकेल. तुमची भीती बरोबर आहे. तुमचाच काय, सगळ्यांचाच नंबर येणार आहे, अगदी डॉक्टरांचा पण! तेव्हा अशी एखादी भूमिका बघा कशी वाटते- ‘देवानं नंबर लावून पाठवलंय सगळ्यांना! रांग मोडून मध्ये घुसू नका, अन् नंबर आला की खळखळ करू नका!’ म्हणजे अगतिकतेऐवजी थोडी तरी स्वीकाराची भावना येते का ते बघू या.
खरं म्हणजे आपली खेळी उत्तम झाली तर आउट व्हायची भीती वाटत नाही, तर तुम्हाला असं कुठं वाटतंय की आपली खेळी काही नीट झाली नाही बुवा, त्याचं विश्लेषण करू या. ‘मला पुन्हा जगायला मिळालं तर,’ असा निबंध लिहायला काय हरकत आहे? ‘अजून यौवनात मी’ पासून ‘नसे मुमुक्षू, मुक्त मी’ हे परिवर्तन सुलभ जायला हवे. किंबहुना, चिरतरुणांनाच हे जमू शकते, कारण त्यांनी आयुष्याच्या मर्यादा लक्षात घेतलेल्या असतात आणि हे आयुष्य काय काय देऊ शकते त्याचा आवाका लक्षात घेऊन ते स्वतच्या सुख-दुखांच्या वाटयाबाबत पुरेसे समाधानी असले पाहिजेत. आपण का नाही आहोत? हे आत्मचिंतन प्रकटपणे करायला मदत करणाऱ्या अनेक गोष्टी उपलब्ध असतात- म्हणजे मानसशास्त्र, अध्यात्म वगरे. अर्थात यातल्या कुणीच हमखास मुक्तीचा किंवा अक्सीर इलाजाचा दावा सांगू नये. तुम्हाला अजूनही वेगळ्या एखाद्या गोष्टीत याचे उत्तर मिळू शकते. आत्मचिंतन मोलाचे!
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांशी आपण का बोलू शकत नाही? त्यांना समजणार नाही, असं तुम्ही का म्हणता? केव्हापासून तुटला हा संवाद? तुम्ही इच्छापत्र केलंय का?, यावरही विचार करून पहा. फ्लॅट संस्कृतीचं म्हणाल, तर बरोबर आहे. मी तुम्हाला मित्र जोडायला सुचवीन.
एवढं खरं, की लांबून बघितलं तर कुणाच्या नकळत पुटकन मरून जावं, असं खूप जणांना वाटेल. गरुड म्हणे मरण जवळ आलं की मुद्दाम आपणहून एकांतात राहायला जातो. तुमच्या परिस्थितीत गेल्यावर दुसऱ्या कुणाला कसं वाटेल, हे सांगता नाही येणार, पण ‘अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनं’ हे इच्छा करण्यायोग्य आहे, असं म्हणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 7:02 am

Web Title: scared of death
टॅग : Death
Next Stories
1 हिरव्या पालेभाज्यांची नवलाई!
2 तरुणांनो, हृदय जपा!
3 मज्जासंस्थेवर परिणाम
Just Now!
X