गर्भाच्या नाळेपासून काढण्यात आलेल्या मूलपेशींपासून कृत्रिम त्वचा तयार करण्यात वैज्ञानिकांना प्रथमच यश आले आहे. ग्रॅनडा विद्यापीठाच्या रक्तशास्त्र विभागातील उती अभियांत्रिकी संशोधन गटाने हे मोठे यश मिळवले आहे. त्यांनी व्हार्टन जेली मेसेनशिमल मूलपेशी वापरून त्यापासून तोंडातील श्लेष्मल आवरण तयार केले, तसेच एपिथेलिया ही कृत्रिम त्वचाही तयार केली. कृत्रिम त्वचा तयार करताना संशोधकांनी यात फायब्रिन व अगारोज या जैवघटकांचा वापर केला असून, संशोधकांच्या याच पथकाने यापूर्वी व्हार्टन मूलपेशीपासून कृत्रिम त्वचा पेशी तयार करता येतील असे म्हटले होते. आताचे संशोधन म्हणजे त्यावरचे शिक्कामोर्तब आहे. अनेकदा जेव्हा अपघात होतात, तेव्हा अशाप्रकारे कृत्रिम त्वचा व तोंडातील श्लेष्मल आवरणाची गरज असते. अनेकदा रुग्ण भाजतात, तेव्हा त्यांच्यात कृत्रिम त्वचेचे रोपण केले जाते, पण सध्या कृत्रिम त्वचा तयार करण्यास कित्येक आठवडय़ांचा कालावधी लागतो. कारण ती त्वचा रुग्णाच्याच चांगल्या त्वचेपासून तयार करावी लागते. आता कृत्रिम त्वचा तयार करण्यासाठी मूलपेशींचा वापर शक्य असल्याने ही त्वचा उती पेढीत जतन करूनही ठेवता येईल व जेव्हा जरूर पडेल तेव्हा ती जखमी रुग्णावर वापरता येईल. त्याचा फायदा असा, की रुग्णाला तातडीने कृत्रिम त्वचा उपलब्ध होईल असे ग्रॅनडा विद्यापीठातील रक्तशास्त्र विभागाचे प्रा. अँटोनियो कँपोस यांनी म्हटले आहे. स्टेम सेल ट्रान्सलेशनल मेडिसीन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.