30 October 2020

News Flash

‘पार्किन्सन्स’ ची भीती नको!

‘पार्किन्सन्स डिसिझ’ अर्थात ‘कंपवात’ हा आजार प्रामुख्याने वृद्ध मंडळींत आढळतो. हातांना सुटणारा कंप, शरीराच्या अनियंत्रितपणे होणाऱ्या हालचाली हे याचे प्रमुख लक्षण. या आजाराचा सामना करणे

| June 1, 2013 09:53 am

‘पार्किन्सन्स डिसिझ’ अर्थात ‘कंपवात’ हा आजार प्रामुख्याने वृद्ध मंडळींत आढळतो. हातांना सुटणारा कंप, शरीराच्या अनियंत्रितपणे होणाऱ्या हालचाली हे याचे प्रमुख लक्षण. या आजाराचा सामना करणे थोडे अवघड असले तरी जीवनातील सकारात्मकता आणि मोकळेपणाने जगण्याच्या वृत्तीमुळे तो सुसह्य़ नक्कीच होऊ शकतो.    
‘पार्किन्सन्स डिसीझ’ (कंपवात) या आजारात हालचाली मंदावणे, आवाजाचा खोलपणा, हाताचा कंप, चालताना पुढे वाकून चालणे, तोल जाणे, चालता- चालता एकदम थांबून पुढे पाऊलच न पडणे अशी लक्षणे दिसतात. सामान्यत: हा आजार साठ वर्षांच्या वरील वयोगटात आढळतो. पण तरूणपणीही पार्किन्सन्स आढळू शकतो. तरूण वयातील पार्किन्सन्सची सुरूवात वयाच्या पस्तीसाव्या वर्षी होणे शक्य असते. या वयातील पार्किन्सन्स साठ वर्षे वयानंतर होणाऱ्या पार्किन्सन्सपेक्षा थोडा वेगळा असतो. तरूण वयातील पार्किन्सन्ससाठी आनुवंशिक कारणे असण्याची शक्यता अधिक असते. साठाव्या वर्षांनंतर होणाऱ्या पार्किन्सन्सची कारणे आनुवंशिक असण्याची शक्यता कमी असते. जगातील ३५ वर्षांवरील सुमारे १ टक्का लोकसंख्येत हा आजार आढळतो.
हा आजार नेमका का होतो याचे उत्तर उलगडलेले नाही. पार्किन्सन्समध्ये व्यक्तीच्या मेंदूतील ‘सबस्टॅन्शिया नायग्रा’ या भागातील पेशी हळूहळू कमी होत जातात. यामुळे मेंदूत असणाऱ्या ‘डोपा’ या द्रवपदार्थाची निर्मिती कमी- कमी होत जाते. डोपा हा द्रवपदार्थ मेंदूत ‘केमिकल मेसेंजर’ म्हणून काम करतो. मेंदूत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवण्याच्या कामी हा द्रव मदत करतो. या द्रवपदार्थाचे प्रमाण कमी झाल्यामुळे मेंदूतील यंत्रणा अकार्यक्षम होऊ लागतात, आणि पार्किन्सन्सचा आजार होतो. पण मुळात सबस्टॅन्शिया नायग्रामधील पेशी का मरतात, याचे नेमके कारण अजुन उघड झालेले नाही. मेंदूच्या या भागात नको असलेली प्रथिने निर्माण झाली तर तेथील पेशी निकामी होणे शक्य असते. पेशींवर एक प्रकारचा ताण आल्यामुळे या पेशींमधील ‘मायटोकॉन्ड्रिया’ या भागाची कार्यक्षमता कमी होते आणि पेशी मरू शकतात. पेशी निकामी होण्यास आनुवांशिक कारणेही असू शकतात. कीटकनाशके आणि तणनाशकांसारख्या घातक द्रव्यांच्या नियमित संपर्कात आल्यामुळेही हा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या द्रव्यांचा वापर करताना त्यांच्या वाफा, वास आपल्या नाकात जाऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते.                  या आजाराची सुरूवात हातांना कंप सुटणे, हात थरथरणे, अशा लक्षणांनी होते. पुरूषांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. पूर्वी कधी मेंदूला मार लागला असेल किंवा घरातच पार्किन्सन्सचा इतिहास असेल तर अशा व्यक्तीला या आजाराची शक्यता वाढते.
या आजारात रुग्णाच्या मेंदूतील डोपा या द्रवाबरोबर इतरही काही द्रव्ये कमी होऊ शकतात. त्यामुळे रुग्णाला नैराश्य येण्याची शक्यता असते. त्याला अनामिक भीती, चिंता वाटते. रुग्ण थोडासा आत्ममग्न होतो असे म्हटले तरी चालेल. ‘माझा हात थरथरतोय..हे पाहून चारचौघे काय म्हणतील?..चहा पिताना हात थरथरून चहा सांडणार तर नाही?..लोक माझ्याकडे पाहू लागल्यावर माझा हात आणखीनच हलू लागतो!..’ अशा अनेक चिंता रुग्णाला जाळत असतात. पण रुग्णाने मनात थोडेसे धैर्य बाळगले तर ही भीती मनातून घालवणे नक्की शक्य असते. आपला हात थरथरतो आहे आहे आणि आजूबाजूचे लोक आपल्याकडे पाहताहेत, अशा परिस्थितीत रुग्णाने चलबिचल करून न घेता मिनिटभर डोळे मिटून शांत बसावे. असे केल्याने हाताची थरथर थोडी कमी होते.
या आजाराचा रुग्ण स्वत:भोवती नकळत एक कोष विणत असतो. या कोषात त्याला सुरक्षित वाटते. पण असे झाल्यामुळे त्याचे जगाशी संबंध तुटू लागतात. तो प्रवाहापासून दूर जाऊ लागतो. ‘माझे बोलणे इतरांना समजत नाही..बोलताना माझ्या तोंडात लाळ जास्त येते..चारचौघांत बसलेलो असताना मला जर लघवी लागली तर पटकन उठून जाणे मला शक्य होईल का..’,अशा रोजच्या जगण्यातल्या अनेक शंका या रुग्णांना सतावत असतात. या सगळ्या शंकांचा सामना करीत राहण्यापेक्षा लोकांमध्ये न मिसळलेलेच बरे, असा विचार हे रुग्ण करतात. या चिंता मनातून प्रयत्नपूर्वक दूर करून आपल्या आजूबाजूला आपल्याला समजून घेणारा समाज आहे, ही गोष्ट रुग्णांनी लक्षात घ्यावी. चारचौघांत बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा हात थरथरला म्हणून लगेच कुणी त्या व्यक्तीची टिंगल करीत नसते!  एखाद्याचा रक्तदाब वाढतो, रक्तातील साखर वाढते, तसा तुमचा हात थरथरतो! त्यात लाज का वाटून घ्यावी! त्यामुळे ही भीती घालवणे रुग्णाच्याच हातात असते. पार्किन्सन्सवर वैद्यकीय आणि समुपदेशन उपचार घेणे तर आवश्यकच. पण जोडीने नाटक, सिनेमा, मित्रमंडळींच्या भेटी, लग्नप्रसंग अशा सगळ्या ठिकाणी या व्यक्तींनी अगदी न घाबरता जावे. छंद जोपासावेत. रोज बागेत फिरून यावे, आवडत असेल देवळात जाऊन बसावे. चार जणांशी बोलावे. त्यानिमित्ताने एकमेकांची विचारपूस केली जाते आणि एकटेपणाही दूर व्हायला मदत होते.
या आजारावरील वैद्यकीय उपचारांमध्ये मेंदूतील ‘डोपा’ द्रवाचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधे दिली जातात. त्यामुळे हात थरथरण्यासारख्या होणाऱ्या अनावश्यक हालचाली आटोक्यात आणता येतात. ही औषधे घेतल्यांनतर ३-४ वर्षे सुखद जातात. पण त्यानंतर रुग्णाला या औषधांचे साईड इफेक्ट्स जाणवण्याची शक्यता असते. गोळीचा डोस पूर्वी जर सात- आठ तास काम करत असेल तर तो कमी काळासाठी उपयोगी पडू लागतो किंवा औषधामुळे रुग्णाच्या शरीराच्या आणखी काही अनावश्यक हालचाली होऊ लागतात. त्या आटोक्यात आणणे जिकिरीचे असते. अशा वेळी औषधे घेतली नाहीत तरी त्रास आणि घेतली तरी त्रास अशा कात्रीत रुग्ण सापडतो. या समस्येला सरळसोट उत्तरे नाहीत. अशा रुग्णाला डॉक्टर औषधांचा डोस परिस्थितीनुसार कमी- जास्त करण्याचा सल्ला देतात.  या अवस्थेवर विज्ञानाने काही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ त्यातील एक. यात मेंदूतील विशिष्ट पेशींच्या केंद्रकांना इलेक्ट्रोड्सद्वारे स्टिम्युलेट केले जाते. यामुळे रुग्णाच्या अनावश्यक हालचाली कमी होऊ शकतात. या उपचारांमुळे मेंदूतील डोपा पदार्थ वाढवण्यासाठीचा औषधांचा डोसही कमी करता येऊ शकतो. पण हे उपचार सगळीकडे उपलब्ध असतातच असे नाही. आपल्या मेंदूत तारा घालून काही उपचार केले जाणार आहेत, या कल्पनेने काही रुग्णांना याची भीती वाटते. या उपचारांचा खर्चही अधिक असतो.
पार्किन्सन्स हा आजार अवघड असला तरी त्यामुळे रुग्णांनी खचून जाऊ नये. वैद्यकीय आणि समुपदेशन उपचार घेण्याबरोबरच स्वत:ला एकटे पाडून न घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपण जितके मिळून मिसळून राहण्याचा, मोकळेपणाने जगण्याचा प्रयत्न करू तेवढाच हा आजार सुसह्य़ होईल.
 
        

शब्दांकन- संपदा सोवनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2013 9:53 am

Web Title: should not be afraid to parkinsons disease
टॅग Health It
Next Stories
1 अनेक रोगांचे निदान अवघ्या दहा मिनिटात
2 जागतिक तंबाखू दिनाच्या निमित्ताने..
3 ‘आयव्हीएफ’ला जोड एम्ब्रियोस्कोपची
Just Now!
X