दहा वर्षांपूर्वी मीनल कविश्वर यांनी सुरू केलेली ‘अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन’ ही संस्था मुंबई, पुणे, दिल्ली आणि अहमदाबादमध्ये कार्यरत आहे. थेरपिस्ट, स्वयंसेवक आणि त्या-त्या पाळीव प्राण्यांचे मालक संस्थेबरोबर काम करतात. हे प्राणी आपापल्या मालकांच्याच कुटुंबात राहतात. संस्थेला पुणे आणि मुंबईत समुपदेशन सत्रांसाठी इच्छुक स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.
प्राण्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचं नि:स्वार्थ प्रेम! एखाद्या एकटय़ा पडलेल्या किंवा आजारी व्यक्तीला प्राणी जेवढं नि:स्वार्थ प्रेम देऊ शकतात, तेवढं कोणताच माणूस देऊ शकत नाही. त्यामुळे काही प्राण्यांचा वैद्यकीय उपचारांना पूरक अशा समुपदेशन उपचारपद्धतीत समावेश करून घेतला जातो. आपल्याकडे प्रामुख्याने कुत्रा, मांजर, ससे, बुलबुल किंवा पोपटासारखे पाळीव पक्षी आणि मासे हे प्राणी समुपदेशन उपचारांसाठी वापरले जातात. परदेशांत घोडा, डॉल्फिन मासे, ‘फेरेट’ नावाचा मुंगसासारखा दिसणारा प्राणी यांचाही समुददेशन सत्रांमध्ये समावेश करून घेतला जातो. एकटेपणा, अपंगत्व, स्वमग्नता, दैनंदिन ताणतणाव, कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करताना मनावर आलेला ताण, जीवनात एखादी आकस्मिक, विचित्र घटना घडल्यामुळे वाटणारी भीती किंवा आलेलं नैराश्य अशा समस्यांवर रुग्णांना समुपदेशन करताना अखाद्या विशिष्ट प्राण्याला बरोबर घेणं खूप प्रभावी ठरतं.            
आपल्या सान्निध्यातल्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, याचा अंदाज प्राण्यांना लगेच येतो. उदा. एखाद्या चिमुरडय़ाला कोणत्यातरी गोष्टीचा मानसिक धक्का बसल्यामुळे त्याने बोलणेच साडून दिले आहे. अशा परिस्थितीत त्याला बोलतं करण्यासाठी, भावनिक आधार देण्यासाठी समुपदेशक एकटा पुरा पडत नाही. ‘तू मला नको सांगू, या कुत्र्याला तर सांग!’ अशा प्रकारे मुलांना चुचकारून त्यांची समुपदेशनात सहभागी झालेल्या प्राण्याशी मैत्री करून दिली जाते. ही मैत्री व्हायलाही फारसा वेळ लागत नाही आणि आख्खं समुपदेशन सत्र त्या एका प्राण्याभोवती गुंफलं जातं! कुत्र्याशी बोलता- बोलता लहान मुलगा त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो, कधी त्याला मिठी मारून शांत बसतो. बघणाऱ्या व्यक्तीला या कृतीत काही विशेष वाटणारही नाही. पण कुत्र्याला साधी मिठी मारल्यानेही त्या चिमुरडय़ाला किती मोठा मानसिक आधार मिळतो हे फक्त समुपदेशकच जाणू शकतो! मानसिक ‘ट्रॉमा’तून जाणाऱ्या रुग्णाला असंख्य प्रश्नांचा सतत सामना करावा लागत असतो. या प्रश्नांची उत्तरे त्याने द्यावीत अशी अपेक्षाही त्याच्याकडून ठेवली जात असते. अशा वेळी ‘मला एकही प्रश्न न विचारता हा माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे.’ ही आधाराची भावना रुग्णाला प्राण्याकडून मिळते. रुग्ण आणि प्राणी यांच्यातला हा संवाद पुढे नेण्यात समुपदेशक मार्गदर्शकाची भूमिका बजावतो.
समुपदेशनात वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांना त्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण देणं आवश्यक असतं. समोरच्या रुग्णाच्या भावना समजून त्याला प्रतिसाद देणं त्या प्राण्याला आत्मसात करावं लागतं. प्राण्यांचेही अंगभूत स्वभाव असतात. कुत्र्यांमध्ये लॅब्रेडॉर, गोल्डन रिट्रिव्हर, बीगल, या प्रजातींची कुत्री मुळातच मैत्रिपूर्ण, प्रेमळ असतात. त्यांचा समुपदेशनात प्रामुख्याने वापर केला जातो. विशिष्ट कुत्रा वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श, वास, आवाज या गोष्टींना कसा प्रतिसाद देतो हे आधी तपासले जाते. त्यातून त्या कुत्र्याला पुढे समुपदेशनासाठी प्रशिक्षण देता येईल का हे डॉग ट्रेनर्स ठरवतात. अशा कुत्र्याला विशेष मुलांच्या शाळेत नेल्यावर वर्गातली सगळी मुलं त्याच्या भोवती बसणार असतात, त्याच्याशी खेळायचा प्रयत्न करणार असतात. अशा वेळी कुत्रा भुंकायला नको, त्याने घाबरून एखाद्या मुलावर उडी घ्यायला नको, किंवा एखादा मुलगा समोरून एकदम पळून जायला लागला, तर कुत्र्याने त्याच्या मागे पळायला नको, यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरते. विशेषत: रुग्णालयात भोवताली विशिष्ट वास येत असतात, शेजारून व्हील चेअर्स किंवा स्ट्रेचर्स जात असतात. अशा वातावरणामुळेही कुत्र्याने विचलित होणे समुपदेशन सत्राच्या दृष्टीने चांगले नसते. प्रशिक्षणात कुत्र्याला विविध प्रकारचे स्पर्श, वास आणि आवाजांची ओळख करून दिली जाते.           
कधीही नजरेला नजर न देणारं, न हसणारं स्वमग्न मूल जेव्हा कुत्र्याला शेपूट हलवताना बघून त्याच्याकडे एकटक बघतो, हसतो, चक्क त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला बोलवतो, तेव्हा त्या मुलाच्या आई-बाबांना होणारा आनंद शब्दांत व्यक्तच करता येत नाही. मुंबईतील डेव्हिड ससून बालगृहातल्या मुलांबरोबर काम करताना आलेला अनुभव सांगण्यासारखा आहे. यातली कित्येक मुलं फार भीषण परिस्थितीतून आलेली असतात. पहिल्या सत्रात समुपदेशकांचे अनोळखी चेहरे पाहून पुढेही न येणारं मूल दहाव्या सत्रात ‘कुत्र्याशी आणखी खेळायचंय’, म्हणून स्वत:हून पुढे आलं, बोलू लागलं! पुण्यातल्या विकलांग मुलांसाठी काम करणाऱ्या बालकल्याण संस्थेत ससे आहेत. दृष्टिहीन, विकलांग आणि विशेष मुलंही इथे येतात. ससा आकाराने तुलनेनं मोठा असल्यानं लहान वयाच्या दृष्टिहीन मुलांना त्याचे ‘डायमेन्शन्स’ समजून घेणं काही वेळा अवघड जातं. अशा वेळी सशाला त्यांच्या मांडीवर दिलं जातं. मऊ-मऊ सशाच्या अंगावरून साधा हात फिरवूनही या मुलांना एक प्रकारचा ‘कम्फर्ट झोन’चा अनुभव मिळतो.
मांजर अप्पलपोटी, धूर्त असते असं म्हटलं जातं, पण हे खरं नाही! मात्र कुत्र्यासारखी ती जेव्हा बोलवाल तेव्हा तुमच्याजवळ येणार नाही! याच कारणामुळे मांजराशी रुग्णाची खरीच मैत्री व्हावी लागते. त्यातही सर्वच मांजरांना हाताळलं जाण्याची सवय असेलच असं नाही. समुपदेशन सत्रांसाठी नवीन जागा, नवीन माणसं आवडणाऱ्या, त्यांच्यात चटकन मिसळणाऱ्या मांजरी निवडल्या जातात. वृद्धाश्रम किंवा कर्करोगाच्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये काम करताना मांजर हा प्राणी उपयुक्त ठरतो.  मांजर रुग्णाच्या मांडीवर येऊन बसते, तिच्या अंगावरून हात फिरवता येतो. घरातल्यांनी नाकारलेल्या वृद्ध व्यक्तींना कुत्रा किंवा मांजरीत ‘आपलं’ कुणीतरी सापडतं!               
पक्षी आणि मासे तुलनेनं कमी ‘इंटरअ‍ॅक्टिव्ह’ असतात. पण मनात सतत सुरू असणारे विचार थांबवण्यासाठी मासे आणि पक्ष्यांच्या हालचालींकडे पाहण्याचा उपयोग होतो. एखाद्याच्या मनावर फार ताण असेल आणि त्यानं माशांच्या अ‍ॅक्वेरियमकडे केवळ काही वेळ एकटक पाहिलं, तरी ताण काही प्रमाणात कमी झालेला जाणवेल. या बाबतीत काही संशोधनंही झाली आहेत. कोणत्याही फिश टँककडे पाहून छान वाटतंच, पण खास समुपदेशनाच्या दृष्टीनं फिश टँक डिझाइन करताना त्यात कोणत्या प्रकारच्या किंवा कोणत्या रंगाच्या माशांचा समावेश करावा हे विचारपूर्वक ठरवलं जातं. काही मासे सलग, शांत चालीने पोहतात, तर काही माशांच्या हालचाली ‘जर्की’ म्हणजे विशिष्ट प्रकारे झटके दिल्यासारख्या असतात. या दोन्ही प्रकारच्या माशांकडे पाहिल्यानंतर रुग्णांना वेगवेगळे परिणाम मिळतात. ‘हायपरअ‍ॅक्टिव्ह’ मुलं शांतपणे पोहणाऱ्या माशाकडे पाहून काही काळ शांतपणा अनुभवतात. तर ज्या मुलांना मानसिक चैतन्याची गरज असते, त्यांना जर्की हालचाली करणाऱ्या माशांकडे पाहून त्या चैतन्याचा अनुभव मिळू शकतो. काही पक्षी आपण बोलू तसाच आवाज काढून आपली नक्कल करतात. एकटेपणा किंवा नैराश्य घालवण्याच्या प्रक्रियेत या गोष्टीचा फायदा होतो.
शब्दांकन- संपदा सोवनी
प्राणी जेव्हा रुग्णाच्या सान्निध्यात येतात, तेव्हा त्यांना ती व्यक्ती काळी आहे, गोरी आहे, अंध किंवा अपंग आहे, तिला कर्करोग आहे किंवा एड्स आहे अशा कोणत्याही गोष्टीचं देणंघेणं नसतं! याच अंगभूत गुणामुळे काही प्राण्यांचा वैद्यकीय उपचारांना पूरक अशा समुपदेशन उपचारपद्धतीत समावेश करून घेतला जातो. ‘समोरचा प्राणी मी जसा / जशी आहे तसा मला आपलंसं मानतोय’, हे एकदा रुग्णाला पटलं, की रुग्णही समुपदेशनाला अधिक चांगला प्रतिसाद देऊ लागतो, आपलं मन मोकळं करू लागतो!