शिशाचे समस्थानिक कर्करोगावर गुणकारी
अणु औषधांमध्ये अनेक प्रकारच्या कर्करोगांशी लढण्याची ताकद असते, असे फ्रान्समधील अरिव्हा कंपनीच्या वैद्यक शाखेने म्हटले आहे. अरिव्हा मेडिसिनचे प्रमुख पॅट्रिक बोरडेट यांनी सांगितले की, अंडाशयाचा कर्करोग, आतडय़ाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग यावर उपचारांसाठी सध्याची औषधे फार प्रभावी नाहीत त्यामुळे आम्ही अणु औषधांचा चांगला वापर होऊ शकेल असा प्रयत्न करत आहोत. कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी शिशाचे किरणोत्सारी समस्थानिक उपयोगी आहे. त्याचे नाव पीबी २१२ असे असून ते थोरियम या दुर्मीळ धातूपासून वेगळे काढले जाते. फ्रान्ससह काही मोजक्या देशांकडे थोरियमचा साठा आहे. २००३ मध्ये संशोधकांनी थोरियमपासून पीबी २१२ हा शिशाचे समस्थानिक वेगळे काढण्याची कल्पना मांडली, त्याचा कर्करोगावर प्रभावी उपयोग होऊ शकतो. त्यानंतर २००९ मध्ये अरिव्हा कंपनीने अमेरिकेत त्याच्यापासून वैद्यकीय दृष्टीने उपयोगी औषध तयार केले आहे.

नोकरी करणाऱ्या स्त्रियांत स्तनाचा कर्करोग अधिक
नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शक्यता ही ७० टक्क्य़ांनी अधिक असते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. स्त्रियांना मिळणारी सापत्नभावाची वागणूक, ताणतणाव यामुळे स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते असा निष्कर्षही यात काढण्यात आला आहे.
ज्या स्त्रिया नोकरी किंवा व्यवसाय करतात त्यांच्यात इतर स्त्रियांच्या तुलनेत कर्करोगाची शक्यता ७० टक्के अधिक असते. किमान ५५ वर्षांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. १९७० च्या सुमारास वयाच्या तिशीत असलेल्या स्त्रियांचा अभ्यास यात केला असून त्यात नोकरी, ताण व कर्करोग यांचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. स्त्रिया जितका जास्त काळ नोकरी करतील, तितका हा धोका अधिक असतो असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. यात १९७५ मध्ये वयाच्या पस्तिशीत असलेल्या चार हजार महिलांचा अभ्यास करण्यात आला. १९७० च्या सुमारास ज्या स्त्रियांनी नोकरी करण्यास सुरुवात केली त्यांना जे ताणतणावाचे त्रास होते, तेच आजच्या स्त्रियांमध्येही दिसून येतात. त्या काळात व्यवस्थापकीय स्वरूपाचे काम स्वीकारलेल्या महिलांना सापत्नभाव, पूर्वग्रह अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता, पुरुषच स्त्रियांपेक्षा अधिक चांगले नेतृत्व करू शकतात असा तेव्हाचा समज होता असे डॉ. तेत्याना प्रुडोव्हस्का यांनी म्हटले आहे. काही प्रमाणात स्त्रियांना अजूनही हाच दुजाभाव सहन करावा लागतो व त्यामुळे त्यांच्यावर आणखी ताण वाढत जातो, असे प्रुडोव्हस्का यांचे म्हणणे आहे.

कॉफीमुळे वाढते आयुष्य
हजारो वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या कॉफी या पेयातील अनेक गुण वेगवेगळ्या संशोधनातून पुढे आले आहेत. अलिकडच्या एका संशोधनानुसार कॉफीचे अनेक फायदे आहेत. राष्ट्रीय कर्करोग संस्थेने ५० ते ७१ वयोगटातील चार लाख स्वयंसेवकांवर प्रयोग केले. १९९५ च्या सुमारास या सर्वाना कुठलाही आजार नव्हता. २००८ च्या सुमारास त्यांच्यातील पन्नास हजार जणांचा मृत्यू झाला. ज्या लोकांनी रोज दोन ते तीन कप कॉफी सेवन केली होती त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण ज्यांनी कॉफी सेवन केली नव्हती त्यांच्या तुलनेत दहा टक्क्य़ांनी कमी होते. ज्या महिलांनी एवढीच कॉफी सेवन केली होती त्यांच्यात हे प्रमाण १३ टक्क्य़ांनी कमी होते. कॉफीचा दीर्घायुष्याशी नेमका काय संबंध आहे हे मात्र अजून समजलेले नाही. दुसऱ्या एका संशोधनानुसार रोज दीडशे मि.लि.चे तीन ते चार कप कॉफी सेवन केल्याने टाइप २ मधुमेह, त्वचेचा कर्करोग, पुरस्थ ग्रंथीचा कर्करोग, मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग यांचे प्रमाण कमी झालेले दिसून आले. प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले, की कॅफिनमुळे मेंदूतील जैवरासायनिक स्थिती बदलते परिणामी डिमेन्शियाला अटकाव होतो.

एचआयव्ही चाचण्यांमुळे लाखोंचे प्राण वाचतील
भारतासारख्या अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशात दर पाच वर्षांनी एचआयव्ही चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर लाखो लोकांचे प्राण वाचू शकतील, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. एचआयव्हीची किफायतशीर चाचणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मॅसॅच्युसेटस जनरल हॉस्पिटल हार्डवर्ड व चेन्नईतील एक संस्था यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार भारताच्या १.२१ अब्ज लोकसंख्येचा विचार करता एचआयव्ही चाचणी करून घेणे हे या रोगाला आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अगदी ८० कोटी लोकांची तपासणी दर पाच वर्षांनी केली तरी मोठय़ा प्रमाणात एचआयव्हीला आळा घालता येईल, असे ब्राउन युनिव्हर्सिटी अँड विमेन अँड इनफँट हॉस्पिटलचे डॉ. कार्तिक व्यंकटेश यांनी म्हटले आहे. उपचार महागडे आहेत असे गृहीत धरले तरीही विशिष्ट कालावधीने केलेली तपासणी बराच फरक पाडू शकते असेही त्यांचे म्हणणे आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रीसर्च इन टय़ूबरक्युलोसिस या संस्थेच्या संचालक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी असे सांगितले की, आम्ही मांडलेल्या प्रारूपाच्या आधारे जगातील जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असलेल्या भारताला चांगला फायदा होऊ शकेल. एचआयव्ही लागणीचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी चाचण्यांना प्राधान्य दिले पाहिजे.

श्वासाच्या विश्लेषणातून मधुमेहाचे निदान
संवेदक तंत्रज्ञानाच्या मदतीने श्वासाचे विश्लेषण करून मधुमेहाचे निदान करण्याची नवीन पद्धती विकसित करण्यात आली आहे. पिटसबर्ग विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञांनी ती शोधली आहे. प्रचलित पद्धतीत रक्ताच्या ग्लुकोजशी संबंधित विविध चाचण्या करून निदान केले जात असते, त्याचबरोबर रोज या चाचण्या करून रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे लागते. या चाचण्या खर्चिक आहेत त्याशिवाय अनेकदा त्यात सुयाही टोचाव्या लागतात. नवीन चाचण्यात श्वासाच्या माध्यमातून मधुमेह ओळखला जातो, कारण जर रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर श्वासात फळाच्या वासाचे अ‍ॅसिटोन हे रसायन येते. ते बायोमार्करच्या मदतीने ओळखता येते. मुख्य संशोधक अलेक्झांडर स्टार यांनी सांगितले की, मधुमेहाचे निदान झाल्यानंतर वेळोवेळी ही चाचणी करता येते. स्टार व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात सोल जेलचा वापर केला असून यात काही छोटे रेणू घन पदार्थ निर्मितीसाठी वापरले जातात. हा संवेदक तयार करताना मेकअप साहित्यात वापरल्या जाणाऱ्या टिटॅनियम डायॉक्साइडचा वापर कार्बन नॅनोटय़ूबसमवेत केला आहे. कार्बन नॅनोटय़ूब या स्टीलपेक्षा मजबूत व सिलिकॉनपेक्षा लहान असतात. या पद्धतीला ‘टिटॅनियम डायॉक्साइड ऑन स्टिक’ असेही गमतीने म्हटले जाते. अशा प्रकारे त्यातील संवेदक तयार केला आहे. त्याच्यामदतीने अ‍ॅसिटोनच्या वाफांचे मापन अतिनील किरणांच्या सान्निध्यात करता येते. फक्त हे संवेदक अजून व्यावसायिक पातळीवर तयार करता आलेले नाहीत.

आरोग्य पानासाठी माहितीपर लेख पाठविण्याचा पत्ता- निवासी संपादक, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्र.१२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे ४११००५ अथवा sampada.sovani@expressindia.com