25 November 2017

News Flash

मणक्यांचे आजार- उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय

डॉ. मनीष सबनीस (मेंदू व मणक्यांचे तज्ज्ञ), शब्दांकन- संपदा सोवनी ‘स्लिप डिस्क’ अर्थात

मुंबई | Updated: February 2, 2013 6:03 AM

डॉ. मनीष सबनीस (मेंदू व मणक्यांचे तज्ज्ञ), शब्दांकन- संपदा सोवनी  
‘स्लिप डिस्क’ अर्थात मणक्यांची चकती घसरण्याच्या आजाराचे निदान झाले की त्यावर कोणते उपचार करावेत याबाबत रुग्णांच्या मनात शंका असतात. आता शस्त्रक्रियाच करावी लागेल का, ट्रॅकशन लावून काही उपयोग होईल का असे अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरेही ‘ओपीडी टू ओपीडी’ बदलतात. काही रुग्णांना व्यायामाचा सल्ला दिला जातो. काही रुग्णांना ‘ताबडतोब शस्त्रक्रिया केली नाही तर चालता येणार नाही’ अशी भीतीही घातली जाते!
ज्याला नस दाबली जाऊन मणक्याची चकती घसरण्याचा आजार झाला आहे त्याचे दुखणे प्रचंड असते. अशा रुग्णाला जर पाठ दुखण्याव्यतिरिक्त पायांत बधिरपणा जाणवत नसेल, किंवा पायांतील ताकदही कमी झालेली नसेल तर त्याने कमीत- कमी दहा दिवस शब्दश: ‘बेड रेस्ट’ घ्यायला हवी. ऑफिसला सुट्टी घेऊन घरी खाटेवर टीव्ही बघत बसणे म्हणजे बेड रेस्ट नव्हे. दिवसभर शिस्तीत विश्रांती घेऊन रात्री बसून एखादी मालिका बघू, असेही चालणार नाही! घसरलेल्या चकतीवर शरीराचे वजन पडल्यास चकतीच्या आजूबाजूला असणारे पाणी चकतीच्या फाटलेल्या आवरणातून बाहेर पडू लागते. असे होऊ नये म्हणून विश्रांतीचा उपयोग होतो. सतत काम करण्याची सवय असणाऱ्या माणसासाठी दहा दिवस झोपून राहणे अवघड आहे. पण जे रुग्ण नेट लावून ही विश्रांती घेतात त्यांना दुखण्यात लक्षणीय फरक पडलेला दिसतो.
शंभरपैकी साठ रुग्णांना केवळ दहा दिवसांच्या बेड रेस्टने निम्म्याहून अधिक आराम पडतो. असे बरे वाटू लागले की या रुग्णांना पुढे करावयाचे व्यायाम सांगितले जातात. हे व्यायाम सातत्याने आणि योग्य पद्धतीने केले असता सरासरी तीन महिन्यांत चकती घसरण्याचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजेच साठ टक्के रुग्णांना ऑपरेशनचा ‘अ’ देखील पाहावा लागत नाही!  दुखणे कमी करण्यासाठीच्या गोळ्या घ्याव्यात की न घ्याव्यात, हादेखील रुग्णांचा नेहमीचा प्रश्न असतो. मात्र सुरूवातीच्या बेड रेस्टच्या काळात या गोळ्या घ्याव्या लागतात. दुखणे कमी करण्याची आणि सूज कमी करण्याची औषधे वेगळी असतात हे लक्षात घ्यायला हवे. उदा. काँबिफ्लॅम हे सूज कमी करण्याचे औषध आहे. चकती घसरण्याच्या आजारात सूज या घटकाचा फारसा समावेश नसतो. त्यामुळे सूज कमी करणारी औषधे या विशिष्ट आजारात उपयोगी पडत नाहीत. ही औषधे किडनीकडून शरीराबाहेर टाकली जातात. त्यांच्या दीर्घकालीन वापराने किडनीवर काही विपरित परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे दुखण्यावर डॉक्टरांकडून ‘अ‍ॅनाल्जेसिक’ प्रकारची औषधे सुचविली जातात. ही औषधे साधारणपणे दहा- पंधरा दिवस घ्यावी लागतात. त्यानंतरही रुग्णाला दुखणे कमी करण्यासाठी औषधांची गरज भासत असेल तर त्याचा चकती घसरण्याचा आजार बेड रेस्टमुळे बरा होणाऱ्यातला नाही हे समजावे. पण म्हणून लगेच पुढचे पाऊल शस्त्रक्रियाच असेल असे नाही! गैरसमजामुळे आणि शस्त्रक्रियेच्या भीतीने असे रुग्ण आजार अंगावर काढत राहतात. चालढकलीमुळे प्रत्यक्षात आजार वाढत जाऊन पायात बधिरपणा येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. हळू- हळू पायांतील ताकदही कमी होऊ शकते. मग मात्र नाईलाजाने रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तयार व्हावे लागते. या परिस्थितीत शस्त्रक्रिया जरी केली तरी रुग्णाच्या पायांतील आधीच खूप कमी झालेली ताकद शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे भरून येईलच याची ग्वाही देता येत नाही. ज्यांना औषधे आणि विश्रांतीने बरे वाटते त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यायाम आहेत. मात्र या रुग्णांना व्यायाम नियमितपणे करावेच लागता. ‘दोन महिने व्यायाम करून बरे वाटते आहे, आता व्यायाम थांबवू’, असे म्हणून चालणार नाही. व्यायामातील अनियमितपणामुळे चकतीचा आजार पुन्हा उद्भवू शकतो. मणक्यांचे आजार म्हणजे पाठीचे व्यायाम असा सगळ्यांचा समज असतो. पण फक्त पाठीचेच स्नायू बळकट करून (पॅरास्पाईनल स्ट्रेंथनिंग) पुरत नाही. मणक्यांसाठीचे व्यायाम करताना पोटाला विसरून कसे चालेल! त्यामुळे पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठीचे ‘अबडॉमिनल स्ट्रेंथनिंग’ व्यायाम आणि पोटाच्या आत मणक्याला चिकटून असणाऱ्या स्नायूंसाठीचे ‘कोअर स्टॅबिलिटी’ व्यायामही रुग्णांना सांगितले जातात. वेगवेगळ्या गटातील स्नायूंना एकाच वेळी व्यायाम मिळाला तरच आजाराला दीर्घकालीन आराम पडू शकतो.
‘व्यायाम केल्याने आमचे दुखणे वाढते’ अशी तक्रार अनेक रुग्ण करतात. व्यायाम केल्यावर दुखणे वाढण्याचे दोन अर्थ होऊ शकतात. एकतर रुग्ण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करत असेल किंवा सांगितलेले व्यायाम रुग्णाला मानवणारे नसतील. अशा वेळी वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यायामांत बदल सुचविले जातात. मान, पाठ दुखू नये म्हणून झोपताना बारीक उशी वापरावी की जाड उशी चालेल, अशी विचारणाही रुग्ण करतात. एका कुशीवर झोपल्यावर जमिनीच्या बाजूचा कान आणि झोपण्याचे अंथरूण यांतील अंतर नैसर्गिक राहिणे आवश्यक आहे. फार जाड उशी वापरली तर त्यावर डोके टेकविल्यावर मान विचित्र पद्धतीने वळविली जाते. फार पातळ उशी वापरली तरी कुशीवर झोपल्यावर मान खालच्या बाजूस अधिक झुकविली जाते. त्यामुळे सरळ झोपल्यानंतर खांदे आणि मान यांत जेवढे नैसर्गिक अंतर असेल तेवढीच उशीची जाडी हवी.
बसण्याच्या चुकीच्या पद्धतींतही बदल करणे आवश्यक आहे. सरळ व ताठ बसणे आवश्यक आहे. पण सरळ बसणे म्हणजे मान मागे ओढून ‘मिलिटरी’ पद्धतीने ताठ बसणे नव्हे. असे बसल्यावर पाठीवर प्रचंड ताण येतो. मणक्यांचे बाक न बदलता, पायांवर अवाजवी ताण न देता बसावे. संगणकावर काम करतानाही संगणकाचा स्क्रीन व्यक्तीच्या डोळ्यांच्या खाली किंवा वर नव्हे तर नजरेसमोर असावा.
धूम्रपान बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटीनचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. अति धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना रक्तवाहिन्या बारीक होऊन ह्रदयविकार होण्याची शक्यता वाढते हे सर्वाना माहिती असते. पण निकोटीनच्या परिणामामुळे मणक्यांतील घट्ट आवरणाला अन्नपुरवठा करणाऱ्या केशवाहिन्याही बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आवरण खराब होऊ लागते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत दहा वर्षे अगोदरच मणक्यांचे आजार उद्भवतात.
मणक्यांचे आजार टाळण्यासाठी ‘कॅलरी कॉन्शस’ होण्याची गरज नाही.  पण आहारात कबरेदकांचे प्रमाण कमी ठेवून प्रथिनांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात मुळातच प्रथिनांचा अभाव असतो. पण शरीराचे ‘बिल्डिंग ब्लॉक्स’- अर्थात स्नायू बळकट राहावेत यासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करणे आवश्यक आहे. स्नायू कमकुवत राहिल्यास मणक्यांचे नैसर्गिक आधार कमकुवत होण्याची शक्यता असते.
‘ट्रॅकशन’ लावण्याचा मणक्यांच्या आजारांसाठी काही उपयोग होईल का, असा रुग्णांचा प्रश्न असतो. या बाबतीत मात्र तज्ज्ञांचे दुमत आहे. काही ठिकाणी ट्रॅकशन घ्यायला सांगितले जाते. काही ठिकाणी घेऊ नका असे सांगतात. एक साधी बाब येथे विचारात घ्यायला हवी. पाठीच्या शस्त्रक्रियेदरम्यान मणके एकमेकांपासून बाजूला करण्याचे काम किमान तीन शल्यचिकित्सकांना मिळून करावे लागते. तीन शल्यचिकित्सकांनी प्रयत्न करूनही मणका लवकर जागचा हलत नाही, मग पाच किलोंचे लहानसे वजन पायाला टांगल्यामुळे मणका आपली जागा कशी सोडेल! १९८७ सालानंतर युरोपियन देशांमध्ये ट्रॅक्शनचा वापर बंद करण्यात आला. एका वैद्यकीय अभ्यासानुसार ट्रॅकशन दिलेले रुग्ण आणि ट्रॅकशनऐवजी बेड रेस्ट सांगितलेले रुग्ण यांना सारखाच आराम पडल्याचे दिसून आले. फरक फक्त एवढाच की, घरी विश्रांती घेतल्यानंतरही रुग्णाचा खिसा भरलेलाच राहतो. दहा दिवस ट्रॅकशन घेतल्यानंतर मात्र तो रिकामा झालेला असतो! सांगण्याचा हेतू असा की, चकती घसरण्याच्या विशिष्ट आजारात ट्रॅकशनचा फारसा उपयोग होत नाही. पण ट्रॅकशन घेण्याच्या काळात रुग्णाला सक्तीची बेड रेस्ट घ्यावी लागते आणि या विश्रांतीचा मात्र रुग्णाला फायदा होतो. अर्थात ट्रॅकशन म्हणजे सक्तीची विश्रांतीच समजावी!  
(समाप्त)

First Published on February 2, 2013 6:03 am

Web Title: spinal cord desease treatement method and precautional remedy