News Flash

विचित्र सवयींचे आजार

१७ वर्षांच्या रिटाला सतत डोक्यावरून रुमाल बांधूनच बाहेर जावे लागते. त्याचे कारण म्हणजे तिच्या डोक्यावरचे केस खूपच कमी झालेले आहेत.

| August 29, 2015 08:08 am

१७ वर्षांच्या रिटाला सतत डोक्यावरून रुमाल बांधूनच बाहेर जावे लागते. त्याचे कारण म्हणजे तिच्या डोक्यावरचे केस खूपच कमी झालेले आहेत. अभ्यास करताना, टीव्ही बघताना नकळत केस उपटायची सवय तिला गेल्या चार ते पाच वर्षांपासून लागली. केस आणि डोक्यावरील त्वचा निरोगी आहे, पण केस ओढण्याचे थांबवले पाहिजे, असा सल्ला त्वचाविकारतज्ज्ञांनी दिला. केस उपटण्यासारख्या विचित्र सवयी काहींना असतात. इतरांनी समजावले आणि स्वत:लाही अशा सवयी बंद करायच्या असल्या तरी ते त्यांना जमत नाही. नैराश्य, स्क्रिझोफ्रेनिया, ऑबसेसिव्ह कंपल्सिव डिसोर्डर यांसारखे मानसिक आजार असताना काहींना या सवयी लागतात. या समस्या इतक्या विचित्र आणि अतार्किक असतात की त्या व्यक्ती आणि कुटुंबीयांना काय करावे तेच उमजत नाही.
केस उपटणे
काही बौद्धिक काम करताना, विचार करताना, झोप लागण्याआधी डोक्यावरचे, भुवयांचे किंवा मिशीचे केस ओढले जातात. कधी कधी हे केस गिळले जातात. क्रमाने केसांचा गोळा पोटात तयार होतो. शस्त्रक्रिया करून तो गोळा बाहेर काढावा लागतो. ही सवय स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसते. क्वचित वेळी त्वचेवरील पुटकुळ्या फोडणे, खपली काढणे अशाही सवयी असतात. या समस्येसाठी गोळ्या, समुपदेशन आणि हाताचे व्यायाम शिकवले जातात.
आग लावणे
ही अत्यंत धोक्याची सवय बालपणापासून सुरू होते आणि पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. त्या व्यक्तीला आग लावण्याची सवय असते, पण आग नियंत्रणात राहीलच असे नाही. अशा व्यक्तींनी आगी लावून मोठय़ा प्रमाणावर वित्त व प्राणहानी केल्याची नोंद पाश्चात्य देशात आहे. या व्यक्तींना काही कारणासाठी रुग्णालयात ठेवणेही धोक्याचे, कारण तेथेही आग लावण्याचे प्रयत्न ते करतात. या व्यक्तींचा शोध लावणे आणि त्यांच्यावर उपचार करणे खूप कौशल्याचे आणि जोखमीचे काम असते.
सामान पळवणे
ही सवय स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असते. या व्यक्ती काहीही गरज नसताना दुकानातून हळूच समान पळवतात. याला चोरी म्हणता येत नाही. कारण त्या सामानांची त्यांना गरज नसते किंवा स्वत:च्या पशांनी सहजपणे ते सामान खरेदी करू शकतात. कुणाच्या नकळत पळवणे, हे निदानासाठी महत्त्वाचे. वस्तू पळवल्यावर त्यांना वाईटही वाटते, पण त्या स्वतला थांबवू शकत नाही. अमेरिकेतील सुप्रसिद्ध नटी विनोना राइडरला वस्तू पळवल्याने शिक्षा झाली होती. नराश्य, एकटेपणा, दुर्लक्ष किंवा मारहाण- शोषण अशी कारणे यामागे असण्याची शक्यता असते.
प्रचंड खर्च करणे
काही व्यक्तींना खूप जास्त खरेदी करण्याची सवय असते. कुठलीही वस्तू गरजेची असो वा नसो, ती परवडत नसली तरीही ती व्यक्ती खरेदी करते. हल्लीच्या काळात ऑनलाइन खरेदी, तेही क्रेडिट कार्ड वापरून करता येते ही बाब या लोकांसाठी खास धोक्याची असते. ही सवय पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असते. एखादी गोष्ट घेतल्यानंतर त्याचा आपल्याला काही उपयोग नाही, किंवा पटकन कंटाळा येतो म्हणून हे लोक ती गोष्ट इतरांना भेट देतात. अगदी श्रीमंत व्यक्तींमध्येही ही सवय त्रासदायी ठरते.
उगीचंच औषध खाणे
काही व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची औषधं खाण्याची सवय लागते. काहीही तक्रारी नसल्या तरी ते असे करतात. घरी एखाद्याला अर्धी गोळी द्या असे डॉक्टरांनी सांगितले असेल, तर उरलेली गोळी ‘वाया’ न घालवता हे लोक खातात. सतत काही औषध घेत असल्यावरच त्यांना समाधान वाटते. या गोळ्यांमुळे अंमली पदार्थासारखी नशाही मिळत असण्याची शक्यता मांडली जाते. ताप, पित्त, पोट साफ होण्यासाठी, जीवनसत्त्व, अंगदुखीसाठी गोळ्यांचा सातत्याने वापर केला जातो. यामुळे काही वर्षांनी या व्यक्तींना मूत्रिपडाचे किंवा पोटाचे आजार होतात.अशा सवयींमुळे व्यक्तीचे जीवन अस्थिर तर होतेच शिवाय कुटुंबालाही त्रास होतो. त्यामुळे याला आजार मानले जाते. त्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय किंवा काही संकट आल्याशिवाय याचे निदान होणे कठीण असते. पण व्यक्तीचे स्वत:वरील नियंत्रण सुटलेले असते, म्हणून हा मानसिक आजारच आहे आणि त्याचे मानसिक उपचार करणेच योग्य आहे.

डॉ. वाणी कुल्हळी vanibk@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 8:08 am

Web Title: strange illness practices
टॅग : Health It
Next Stories
1 रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि परिणाम
2 संकटांमुळे येणारे आजार
3 झोप सुखाची
Just Now!
X