जीवनशैलीमुळे शारीरिक आजारांमध्ये जसे उतार-चढाव येतात, तसे मानसिक आरोग्यामध्येही येतात. शहरातील गुंतागुंतीच्या आयुष्यात ताण, नैराश्य अशा तक्रारी वाढल्या आहेत आणि त्यामागची कारणेही विविधांगी आहेत. अप्रायझल हे त्यापैकीच एक नवे कारण. आपल्याकडे कॉर्पोरेट कंपन्यांची संख्या वाढायला लागल्यावर वर्षांअखेर कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या कामाची होत असलेली मोजमापणी म्हणजेच अप्रायझल ही सर्वाच्या परिचयाची संकल्पना झाली आहे. शिक्षणासोबतच परीक्षांच्या कचाटय़ातून मोकळे होऊन हाश्शहुश्श करणाऱ्या युवापिढीला अप्रायझलच्या रुपाने आयुष्यभराची परीक्षा समोर उभी ठाकली आहे. परीक्षांआधी आणि निकालानंतर विद्यार्थी, पालक जसे तणावात असतात, तशीच काहीशी अवस्था यादरम्यान होते. काही जण त्याला सरावतात व काही जण या काळात निराश होतात.
अप्रायझल सुरू झाले की त्या दोन-तीन महिन्यांच्या काळात रजा घेण्याचा झपाटा मानसी लावत असे. सलग दोन वर्षे असे केल्यावर तिसऱ्या वर्षी ती माझ्याकडे आली. सुरुवातीला ही समस्या कशी सांगावी हेदेखील तिला कळत नव्हते. कंपनीकडून अप्रायझलचे पत्र मिळण्याच्या काळात तिचा ताण प्रचंड वाढत असे व त्यामुळे कार्यालयात जाणेच ती टाळत असे. अप्रायझलचा ताण टाळण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिकदृष्टय़ाही विचार करायला हवा. सर्वात आधी दिवाळी, नवीन वर्ष यामुळे झालेल्या आहाराचे कुपथ्य व बदलत्या हवेमुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती यामुळे उच्च रक्तदाब, मानसिक अस्वस्थता, मधुमेह वाढू शकतो. सर्वात आधी आहाराची व व्यायामाची गाडी रुळावर आणली की ताण तणाव सहन करणे सोपे जाते.
कंपनीला आपली किंमत वाटत नाही किंवा आपण कोणाला आवडत नाही, असा वैयक्तिक निष्कर्ष काढू नका. अपवादात्मक परिस्थिती वगळता हे सर्व निर्णय केवळ व्यावसायिक असतात. अप्रायझल तुमच्या मनाप्रमाणे झाले नाही तरी दीड ते दोन महिन्यात त्या विचारातून बाहेर पडण्याचा निश्चय करा. काहींना इतरांपेक्षा आपले अप्रायझल चांगले झाले नाही, याचा ताण येतो तर काहींना जरूरीपेक्षा जास्त मिळाल्याने इतरांना काय वाटेल, याचेही दडपण येते.
कर्मचाऱ्यांवर जसा ताण असतो तसाच तणाव अप्रायझल करणाऱ्यांवरही असतो. कर्मचाऱ्यांची योग्य माहिती काढणे, अप्रायझलमध्ये प्रत्येकाच्या कामाला न्याय मिळणे आवश्यक असते. त्यामुळे यावेळी एचआर विभागात काम करणाऱ्यांनाही तणाव असतो. उच्च पदावर काम करणारे एक अधिकारी नुकतेच आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधाराने त्यांनी शेरा मारल्यावर कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागली. त्यामुळे ते निराश झाले होते. त्यांच्यामुळेच संबंधित कर्मचाऱ्याची नोकरी गेली, असा आरोप सुरू झाला होता. अप्रायझल करणाऱ्यांचीही या काळात परीक्षा असते. नोकरी गमावावी लागणे हे एका टोकाचे उदाहरण असले तरी एका शेऱ्याचा प्रभाव संबंधित कर्मचाऱ्यांच्या पुढच्या वर्षभराच्या कामगिरीवर पडतो. त्यामुळे योग्य माहिती काढण्याची खबरदारी तर घ्यावीच लागते पण या माहितीवरून देण्यात येणारे अप्रायझल सौम्य शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करावा.
अप्रायझल तर दर वर्षी होणारच. अप्रायझलला घाबरलात किंवा राग धरलात तर तब्येत बिघडून घ्याल. सर्वाना प्रशंसा आणि बक्षिस आवडते. टिका कोणालाही आवडत नाही. अप्रायझलमध्ये सुचवलेल्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला हवा. मागच्या वर्षी जे जमले नाही ते या वर्षी करायचे आहे. त्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे. म्हणतात ना, सिर सलामत तो पगडी पचास..