News Flash

‘ताप’दायक!

‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा एकदा सर्वाना घाबरवून सोडले आहे. बरोबरीने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजारही थोडय़ा अधिक प्रमाणात वर्षभर दिसताहेत.

| February 14, 2015 07:23 am

‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा एकदा सर्वाना घाबरवून सोडले आहे. बरोबरीने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजारही थोडय़ा अधिक प्रमाणात वर्षभर दिसताहेत. नेमका कोणता ताप कशाचा हे ओळखणे सामान्यांना गोंधळात टाकणारे आहे शिवाय ताप आला की ताबडतोब तज्ज्ञांना गाठावे की थोडा काळ वाट पाहून डॉक्टरांकडे जावे हे प्रश्नही आहेतच. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न..
मलेरिया
* एखादी व्यक्ती विशिष्ट गावाला जाऊन आली आणि आल्यानंतर मलेरिया झाला असे अनेकदा घडते.  
* सुवातीला हा ताप इतर तापांसारखाच वाटतो. रुग्णाला १००- १०१ पर्यंत हळूहळू ताप येऊ लागतो. तीन-चार दिवसांनंतर ‘एका दिवसाआड एक’ अशा ‘पॅटर्न’ने ताप येऊ लागतो.
* या तापाचे ठरलेले तीन टप्पे आहेत. यातल्या पहिल्या टप्प्यात रुग्णाला प्रचंड थंडी वाजते, हुडहुडीच भरते. त्यानंतर ताप जोरात चढतो आणि ताप उतरताना खूप घाम येतो.
* योग्य उपचार मिळाले नाहीत तर ८ दिवस, १५ दिवस अगदी महिनाभरही मलेरियाचा ताप येऊ शकतो. उपचारांअभावी काही रुग्णांना पोटात दुखणे, थोडेसे अंतर चालल्यावर दम लागणे, डोळ्यांत कावीळ दिसू लागणे आणि डोळे पिवळे पडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
* मलेरियावर उपचार न झाल्यास मूत्रपिंडावर वाईट परिणाम होऊन लघवी कमी होणे, लघवी लाल रंगाची होणे असे परिणाम दिसू शकतात किंवा मलेरियाचा मेंदूवर परिणाम होऊन रुग्ण बेशुद्धावस्थेत किंवा कोमात जाऊ शकतो.
डेंग्यू
* डेंग्यू हा खास शहरी आजार आहे.
* व्यक्ती रोजच्यासारखी नोकरीला गेली आणि अचानक खूप ताप येऊन घरीच यावे लागले, हे लक्षण डेंग्यूत प्रामुख्याने दिसते.
* तीव्र ताप आणि त्याबरोबर थंडी वाजणे हे लक्षण या तापातही दिसते. मलेरियातही थंडी वाजत असल्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया ओळखणे थोडे अवघड जाते.
* डेंग्यूच्या रुग्णाचे अंग तापाच्या अगदी पहिल्या दिवसापासून प्रचंड दुखते. पाठ कुणी मोडून काढावी किंवा अक्षरश: हाडे मोडल्यावर जसे दुखेल तसे या रुग्णाचे अंग दुखते.
* सांधेदुखी, डोकेदुखी आणि डोळे गोल फिरवल्यावर ते दुखणे ही देखील लक्षणे डेंग्यूत दिसतात.
* डेंग्यूचा ताप आल्यावर चार- पाच दिवसांनंतर शरीरावर लाल रंगाचे बारीक- बारीक पुरळ दिसू लागते.
* डेंग्यूत सर्व रुग्णांना घसा दुखण्याचे लक्षण दिसत नाही. पण काही रुग्णांना घसादुखी आणि सर्दी- खोकला होऊ शकतो. स्वाइन फ्लू आणि डेंग्यू ओळखणे यामुळे काही वेळा अवघड जाते.
* डेंग्यूच्या तापात ६ व्या- ७ व्या दिवशी हृदयाचे ठोके कमी होणे, रक्तदाब कमी होणे, उठल्यावर चक्कर येणे, नाकातून किंवा गुदद्वारातून रक्त जाणे, अशी लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसू शकतात.

चिकुनगुनिया
* चिकुनगुनियामध्येही डेंग्यूसारखाच ताप, अंगदुखी, सांधेदुखी होते. पण यातली सांधेदुखी इतकी तीव्र असते की रुग्णांना चालताही येत नाही. विशेष म्हणजे ही तीव्र सांधेदुखी अचानक म्हणजे अगदी २-३ तासांत होऊ शकते. पाय आणि हातातल्या लहान सांध्यांमध्ये प्रचंड दुखते. अनेकांना मूठ वळल्यावर ती उघडता येत नाही. सकाळी उठल्यावर शरीर ताठरते आणि नंतर तो ताठरपणा कमी होतो.
* सांध्यांना सूज येणे हे मात्र चिकुनगुनियाचे वैशिष्टय़ आहे. डेंग्यूत सांधे दुखतात पण सुजत नाहीत. चिकुनगुनियात सांध्यांना सूज दिसून येते. पाऊलही टेकवता येणार नाही इतके सांधे सुजतात.
* चिकुनगुनियाचा ताप आठवडाभर राहतो. या आजाराच्या सहाव्या- सातव्या दिवशीही काही रुग्णांच्या अंगावर पुरळ येऊ शकते.
* चिकुनगुनियाची सांधेदुखी मात्र वेगवेगळ्या काळापर्यंत राहू शकते. काहींची सांधेदुखी १-२ महिने, काहींची ६ महिने तर काहींची सांधेदुखी अगदी दोन-तीन वर्षेही टिकते.

साधा विषाणूजन्य ताप
* साधा ताप सर्वसाधारणपणे ३ ते ४ दिवस टिकतो.
* या तापात घसादुखी, खोकला, डोळे सुजणे, सर्दी झाल्यासारखे नाकातून पाणी येणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
* ताप येण्याबरोबरच तो विषाणू शरीरातल्या एखाद्या अवयवयंत्रणेवरही परिणाम करत असतो. तो ज्या यंत्रणेवर हल्ला करतो तिच्याशी संबंधित लक्षणे रुग्णाला दिसतात. उदा. ताप येण्याबरोबर विषाणूने आतडय़ांवर परिणाम केला असेल तर दोन- चार वेळा जुलाब होतील, स्नायूंवर परिणाम केला असेल तर अंग दुखेल, एक- दोन दिवस सांधे दुखतील इ.
* हा ताप साधारणपणे १००- १०१ पर्यंतच जातो, बरोबरीने दिसणारी लक्षणेही तितकी तीव्र नसल्यामुळे रुग्ण औषधे घेऊन आपली दैनंदिन कामे करु शकतो. स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांमध्ये रुग्णांना कामे थांबवून आरामच करावा लागतो.

स्वाइन फ्लू
* स्वाइन फ्लू हा जास्तीत जास्त ५ ते ७ दिवसांचा आजार आहे.
* लक्षणे : सर्दी, नाकातून पाणी गळणे, घशात खवखव, घसादुखी, तीव्र ताप (१०० किंवा १०१ फॅरेनहाईटच्या वर ताप)
* या लक्षणांच्या बरोबरीने डोकेदुखी, अंगदुखी, स्नायू दुखरे होणे, सांधे दुखणे, पोटात दुखणे, जुलाब होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
* स्वाइन फ्लूच्या जवळपास प्रत्येक रुग्णाला कोरडा आणि त्रासदायक खोकला झालेला दिसतो. कधी- कधी आवाजही बसतो.
* घसादुखी, सर्दी, नाकातून पातळ पाणी वाहणे आणि जबरदस्त खोकला ही स्वाइन फ्लूची वेगळी ओळखण्यासारखी लक्षणे म्हणता येतील.

उपचार काय करतात?
* स्वाईन फ्लूच्या रुग्णाला जी लक्षणे दिसत असतील, त्यानुसार त्याच्यावर उपचार केले जातात. ताप, सर्दीसाठी पॅरॅसिटॅमॉल आणि सर्दीच्या गोळ्या सुरू केल्या जातात. सुरुवातीपासूनच ‘टॅमी फ्लू’सारख्या गोळ्या सुरू केल्या तर पहिल्या दोन-तीन दिवसांतच सर्व लक्षणे नाहिशी होतात आणि रुग्णाला बरे वाटू लागते.
* असे बरे वाटले तरी उपचार पूर्ण झाल्याशिवाय रुग्णाने कामावर किंवा बाहेर जाणे बरोबर नाही. अर्धवट उपचार झालेले असताना बाहेर पडणे म्हणजे इतरांना संसर्ग देण्यासारखेच आहे.
* औषधांचा ५ दिवसांचा डोस पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्ण कामावर जाऊ शकतो.
स्वाइन फ्लू आणि लस
* स्वाईन फ्लूची लस घेतल्यावर या आजाराविरोधात शरीरात रोगप्रतिकारशक्ती येण्याचे प्रमाण ५० ते ७० टक्के आहे.
* उरलेल्या ३० ते ५० टक्के लोकांनी लस घेऊनही त्यांच्यात स्वाईन फ्लूविरोधात प्रभावी प्रतिकारशक्ती निर्माण होत नसल्याचे दिसून येते.  
* त्यामुळे ज्यांनी स्वाइन फ्लूची लस घेतली आहे त्यांनीही स्वाइन फ्लूबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांपासून लांब राहणे, संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक असलेले स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी लस घेतल्यानंतरही कराव्याच लागतात.

ताप आल्यावर सुरुवातीला काय कराल?
* कोणताही ताप आल्यावर सुरूवातीला ताप कोणता हे सामान्य माणसाला ओळखता येईलच असे नाही. आधी घरगुती उपचार करुन पाहण्याकडेच बहुतेकांचा कल असतो.
* आपल्याला दिसणारी लक्षणे सौम्य आहेत की तीव्र हे रुग्णाच्या लगेच लक्षात येते. लक्षणे कमी तीव्रतेची असतील तर दोन दिवस घरी आराम करावा, मात्र आपल्या लक्षणांकडे काटेकोरपणे लक्ष ठेवावे. तापासाठी ‘ओव्हर द काऊंटर’ मिळणारी ‘पॅरॅसिटॅमॉल’सारखी गोळी घेऊनही चालेल. बरोबरीने भरपूर पाणी प्यावे. शक्य तेवढा आराम करण्याकडे कल असावा. अगदीच सौम्य लक्षणे असतील तर हलके काम करण्यासही हरकत नाही.
* दोन दिवसांपेक्षा आजार जास्त टिकत असेल तर मात्र तो अंगावर न काढता डॉक्टरांना त्वरित दाखवावे.
* १००- १०१ च्या वर ताप असेल तर मात्र दोन दिवस थांबणेही घातक ठरु शकते. हा ताप तीव्र स्वरुपाचा असून त्यासाठी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
डॉ. भारत पुरंदरे, संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 7:23 am

Web Title: swine flu 3
टॅग : Health It,Swine Flu
Next Stories
1 मनोमनी – ऑटिझम
2 आकडीवर उपचार शक्य!
3 विचारी मना! : पालकत्व महत्त्वाचे
Just Now!
X